अष्टपैलू जगदीश!

    19-Apr-2023   
Total Views |
Jagdish Sansare

अभिनय क्षेत्र ते प्राध्यापक आणि प्राध्यापक ते ‘रेडिओ जॉकी’ असा प्रवास करत ‘जीवनात आनंदी राहा, आनंद लुटा’ असा संदेश देणार्‍या जगदीश संसारे यांचा जीवनप्रवास...

जगदीश अनंत संसारे यांचा जन्म मंडणगड, रत्नागिरीचा. त्यांचे मूळगाव साखरपा. संसारे यांचे शालेय शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मंडणगड येथे झाले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड येथून वाणिज्य शाखेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तसे बघायला गेले, तर संसारे यांना दहावीनंतर ‘सिव्हील इंजिनिअरिंग’ला प्रवेश मिळाला होता. मात्र, घरातील बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी ‘इंजिनिअरिंग’चा विचार सोडून दिला. परंतु, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वाणिज्य शाखेतून घेत असताना संसारे ‘गणित’ या विषयात अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे एक वर्ष वाया गेल्यानंतर संसारे यांनी वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कला शाखेतून घेण्याचा निर्णय घेऊन ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदवी मिळवली. महाविद्यालयात शिकत असताना त्यांना नाटकांची गोडी निर्माण झाली.

संसारे यांनी लहानपणी ‘इथे ओशाळला मृत्यू’, ’जिथे गवतास भाले फुटतात’ अशी नाटके गावात पाहिली होती. त्यामुळेच नाटकात काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. यामुळेच नाटकांच्या पुस्तकांसोबत ‘ययाती’, ‘युगंधर’, ‘छावा’ यांसारख्या पुस्तकांची जणू पारायणेच संसारेंनी केली. तसेच ‘चोरी झालीच नाही’, ‘नवर्‍यांनो एक व्हा’, ‘न्याय’ अशा एकांकिकांमध्ये महाविद्यालयीन जीवनात संसारेंनी अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर नाटकात करिअर करायचे आणि बेपत्ता असलेल्या वडिलांना शोधायचे म्हणून संसारे मुंबईत आले. मुंबईत आल्यावर ‘सरनोबत’ हे प्रायोगिक नाटक आणि ‘सिंहासन घाला चुलीत’ या व्यावयायिक नाटकाबरोबर २०पेक्षा अधिक हौशी रंगभूमीवरील मराठी नाटकांतून संसारेंनी अभिनय केला.

तसेच, मुंबईत आल्यावर संसारे यांनी दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून एम.ए. अर्थशास्त्र पूर्ण केले. परंतु, त्यावेळी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या संसारेंनी भाषेच्या अडचणीमुळे ‘डिक्लेरेशन’ दिले आणि मग मराठी साहित्याची आवड असल्याने संसारेंनी ‘मराठी’ या विषयात ‘एम.ए’ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कौटुंबिक कारणास्तव संसारेंनी नाटकात काम करणे सोडून दिले. शेवटी ‘मराठी’ या विषयातच ‘करिअर’ करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानंतर ‘मराठी’ विषयात ‘एम.ए’ ला प्रथम श्रेणी मिळवत संसारे उत्तीर्ण झाले. तसेच पहिल्याच प्रयत्नात ‘मराठी’ विषयात ‘सेट’ परीक्षादेखील संसारेंनी उत्तीर्ण केली.

संसारे सुरुवातीला मुंबईत कोचिंग क्लासमध्ये ‘अर्थशास्त्र’ हा विषय शिकवत. त्यामुळेच “पोट आपल्याला जगायला शिकवतं म्हणून पोटाचं ऐकायला शिका,” असे संसारे म्हणतात. त्यानंतर ‘मराठी’ विषयाचे प्राध्यापक म्हणून रूईया महाविद्यालय, खालसा महाविद्यालय, भवन्स महाविद्यालय येथे संसारेंनी अध्यापन केले. सध्या संसारे सेंट जोसेफ महाविद्यालय, विरार येथे ‘मराठी’ विषयाचे पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर एकदा प्रा. रमेश कुबल यांनी संसारेंना अभिनय प्रशिक्षक म्हणून नवी जबाबदारी सोपवली आणि येथून अभिनय प्रशिक्षक म्हणून संसारेंनी पुन्हा नाट्यक्षेत्रात पदार्पण केले.

आज २०० हून अधिक महाविद्यालयांत पथनाट्य शिबिरांत प्रशिक्षक म्हणून संसारेंनी काम केले आहे. संसारेंनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले व्यसनावर आधारित वेगळा बाज असणारे ‘आईच्या गावात’ हे पथनाट्य सह्याद्री वाहिनीने प्रदर्शित केले. त्यानंतर संसारे पथनाट्यांच्या लिखाणाकडे वळले आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर पथनाट्यं करू लागले. त्यामुळे पथनाट्यकार, पथनाट्य प्रशिक्षक म्हणून संसारेंना प्रसिद्धी मिळाली.

त्यांच्या याच पथनाट्यांतून सामाजिक विषयाला हाताळण्याचे कसब पाहून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून संसारेंची नियुक्ती महाविद्यालयाने केली. त्यानंतर काही कालावधीने संसारेंच्या कामाची दखल जिल्हास्तरावर घेतली गेल्याने त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे पालघर जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी पथनाट्यातून मनोरंजन करत समाजसेवेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे काम संसारेंनी केले.

आज संसारे हे ‘अलकची झलक’ या कार्यक्रमात ‘रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ एफ.एम’वर ‘रेडिओ जॉकी’ म्हणूनदेखील काम करतात. तसेच ‘विश्वभान प्रतिष्ठान’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ‘विश्वभान’ वार्षिकांचे संपादनही संसारेंनी केले आहे. ‘लोकमानसातील पारंपरिक कोळीगीते’ या पुस्तकाचे संपादनही संसारेंनी केले आहे. हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या ‘एम. ए मराठी भाग-२’च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

तसेच शैक्षणिक संस्थांसाठी ‘अध्यात्म आणि आपण’, ‘करा व्यक्तिमत्त्व सुंदर’ यांसारख्या विविध विषयांवर १०० हून अधिक व्याख्याने संसारेंनी केली आहेत. कोरोनावर आधारित ’चला नारायण अस्त्राला शरण जाऊया’ या संसारेंच्या लघु नाटिकेला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. संसारेंना अभिनंदन शिक्षण संस्था, मुंबईद्वारे दोन वेळा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘बहुउद्देशीय पर्यावरण समिती’चा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळालेला आहे. तरी अशाच उत्तमोत्तम प्रगतीसाठी अष्टपैलू जगदीश संसारेंना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!

९३५९६९२४५४

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.