लखनऊ : "आता राज्यात कोणताही माफिया कोणालाही धमकावू शकत नाही", असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. तसेच जे एकेकाळी उत्तर प्रदेशच्या अस्मितेसाठी संकट होते. त्यांच्यासाठी आता संकट उभे राहिले आहे, असे ही ते यावेळी म्हणाले. दि.१८ एप्रिल रोजी लखनऊ येथील लोक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. १५ एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांचे हे पहिले जाहीर भाषण होते. त्याआधी, अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले.
उत्तर प्रदेशात ‘पंतप्रधान मित्र’ योजनेंतर्गत टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. राज्यातील लखनऊ आणि हरदोई येथे टेक्सटाईल पार्क स्थापन केले जाणार आहेत.या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना २०१७ परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, २०१२ ते २०१७ या काळात उत्तर प्रदेशात ७०० हून अधिक दंगली झाल्या.२००७ ते २०१२ या काळात ३६४ हून अधिक दंगली झाल्या. पण २०१७ ते २०२३ या काळात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही. दरम्यान, एका दिवसासाठीही कर्फ्यू लावण्याची गरज पडली नाही, असे योगी म्हणाले.
सीएम योगी म्हणाले की, पूर्वी लोकांना काही जिल्ह्यांच्या नावाची भीती वाटत होती. आज त्या जिल्ह्यांच्या नावाने लोकांना घाबरण्याची गरज नाही. ते म्हणाले की, आजचा उत्तर प्रदेश गुंतवणूकदारांचे भांडवल सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये रस दिसून येत आहे.
वस्त्रोद्योगाचा विकास उत्त प्रदेशच्या प्रगतीस गती देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. राज्यात वस्त्रोद्योगाची समृद्ध परंपरा आहे. येथील हातमाग, पॉवरलूम, वाराणसी आणि आझमगडच्या रेशमी साड्या, भदोहीचे गालिचे, लखनौची चिकनकारी आणि सहारनपूरची कलाकुसर हे सर्व जगप्रसिद्ध आहे. एकेकाळी उत्तर प्रदेश हा केवळ औद्योगिकीकरणासाठीच नव्हे तर शहरी नियोजनाच्या दृष्टिकोनातूनही देशाचा महत्त्वाचा प्रदेश मानला जात होता. मात्र, सदोष धोरणामुळे राज्याची ही ओळख पूर्णपणे नष्ट झाली. मात्र, गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी प्रगती केली आहे, त्याचा सर्वाधिक फायदा गेल्या ६ वर्षात उत्तर प्रदेशला मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले आहे.