आपल्या त्वचेच्या स्थितीवर भावनांचा प्रभाव पडतो, हे समजल्यावर, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आशावादी वृत्ती काळाची गरज आहे. त्याविषयी...
आपण अशा समाजात राहतो जिथे आपल्या अंतरंगातल्या सौंदर्यापेक्षा बाह्य स्वरूपाचा सतत उदोउदो केला जातो. आपण सोशल मीडियावर असलो, ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सहकर्मचार्यांशी भेटत असलो किंवा बाजारातून फिरत असलो, तरी आपण आपल्या दिसण्याबद्दल आणि आपल्या त्वचेबद्दल आत्म-जागरूक असतो. आपल्याला सर्वांचे डोळे आपल्यावर वेढलेले जाणवू शकतात. आपण सगळेच सामान्य लोक आरशात पाहतो आणि पाहिल्यावर आपल्याला काय दिसते? तुमचा तेजस्वी, भावपूर्ण चेहरा तुमच्याकडे परत स्मित हास्य करताना दिसतो का? किंवा चेहर्यावरील सुरकुतलेपणा व अपूर्णता तुम्हाला दिसत आहे का? या प्रश्नाचे तुमचे उत्तर काहीही असले तरी वस्तुस्थिती अशी आहे, तुमची त्वचा अनेकदा पृष्ठभागाच्या खाली मनात काय चालले आहे, ते अचूक प्रतिबिंबित करू शकते.
जीवन कधीच परिपूर्ण नसते. परंतु, कठीण परिस्थितींवर आपली प्रतिक्रिया बदलून आपण तणावाचा नकारात्मक प्रभाव थांबवू शकतो. आपण जे नियंत्रित करू शकतो, ते आपण नियंत्रित करतो. जीवनातील सकारात्मक दृष्टिकोनाचा आपल्या एकूणच आरोग्यावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि हो, त्यात आपल्या त्वचेचाही समावेश होतो. धकाधकीचे जीवन जगण्यामुळे तुम्हाला जाणवते त्यापेक्षा जास्त परिणाम होतात. दुसरीकडे आपली त्वचा हा आपला शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, हे लक्षात घेऊन, सकारात्मक विचारसरणी तुमच्या शरीराला आतून पुनर्जीवित करण्यासोबतच, तुमच्या बाह्य स्वरूपावरही आश्चर्यकारक परिणाम करू शकते ही शक्यता जाणून घेतली पाहिजे. काळी वर्तुळे, वयाचे डाग, सुरकुत्या, बारीक रेषा यासारख्या त्वचेच्या पसरलेल्या अपूर्णतेची मनाची प्रसन्न स्थिती निराकरण करण्यात मदत करू शकते का? आपल्या सर्वांना माहीत आहे की, जे लोक तणावग्रस्त असतात, त्यांच्या चेहर्यावर तेजस्वी, निरोगी चमक नसते.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दीर्घकालीन तणावामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. उच्च पातळीच्या तणावामुळे तुमचे ‘कॉर्टिसोल’ आणि ‘एड्रेनालाईन’चे उत्पादन ‘हार्मोन्स’ विकृत करतात. यामुळे त्वचेमधील ‘कोलेजन’ कमी होते. त्यामुळे त्वचा सैल पडते आणि वाढलेले ‘हार्मोन्स’ त्वचेचे निर्जलीकरण प्रवृत्त करतात. तुमच्या ग्रंथींना अधिक तेल तयार करण्यास भाग पाडतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज, तेलकट आणि मुरुमांना प्रवण होते. आपले चेहरे आपल्या सर्व भावनांचे आरसे आहेत. इतकेच नाही, तर त्वचेच्या समस्यांनी ग्रासलेले कोणीही तुम्हाला सांगतील की, त्वचेकडे सर्वात अयोग्य क्षणी आपली कमजोरी दाखवून द्यावयाचे एक विलक्षण कौशल्य आहे. जेव्हा तुम्ही विशेषत: तणावग्रस्त किंवा उदासीन असाल, तेव्हा गालांवरचा पुरळ किंवा मुरुमे खूप जोर धरतात. एक प्रकारे, तुमची त्वचा शारीरिक भाषेतून तुम्हाला ते जाणवत नसले, तरीही तुमच्या भावनिक त्रासाबद्दल सांगत आहे. तीव्र मुरुमांपासून ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा अधिक स्पष्ट अनुभव आहे.
तुम्ही कितीही काटेकोरपणे स्वच्छ त्वचेच्या नियमांचे पालन केले तरीही, काहीवेळा, न थांबणारे मुरुम तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात आणि तुमचा पूर्ण दिवस खराब करू शकतात. दुर्दैवाने, तीव्र ताण त्वचेच्या रोगप्रतिकारक शक्तीशी तडजोड करतो, ज्यामुळे त्वचा तणावजन्य परिस्थितीत अधिक विकल होते. ’स्किनकेअर’ कंपनीच्या अलीकडील २,५०० महिलांच्या दुसर्या एका मोठ्या अभ्यासात असे आढळले की, दहा टक्के महिला अपवादात्मक वयोवृद्ध (शुलशिींळेपरश्र रसशीी) आहेत. ‘अपवादात्मक वयोवृद्ध’ ही संज्ञा असे दर्शवते की, त्या स्त्रिया प्रत्यक्ष वयापेक्षा दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी लहान दिसत होत्या आणि या त्यांच्या तरुण दिसणार्या त्वचेचे सकारात्मक दृष्टिकोन हे एक महत्त्वाचे कारण होते. वयाची धारणा ही केवळ शारीरिक नसते म्हणून तुमच्या चेहर्यावर काही सुरकुत्या असल्या, तरीही तुमची वागणूक सकारात्मक व ‘स्टायलिश’ असल्यास, लोक बहुधा तुम्हाला तुमच्या प्रत्यक्ष वयापेक्षा तरुण समजतील. शिवाय शास्त्रज्ञांच्या मते निरोगी दृष्टिकोन असलेले लोक स्वतःची चांगली काळजी घेतात, जे त्वचेसाठी केव्हाही फायद्याचे असते.
तुमची त्वचा तुमच्या भावनांना मुरुमांद्वारे, ‘आर्टिकेरिया’, ‘एकझिमा’ आणि इतर प्रकारांद्वारे प्रतिबिंबित करू शकते. अशावेळी तुम्हाला बहुधा मेकअपच्या जाड थरांखाली त्वचेला लपवण्याचा मोह होईल. जेव्हा तुम्ही सक्रिय आशादायक वृत्ती विकसित करू शकता आणि सकारात्मक विचारसरणीच्या सामर्थ्याचा वापर करून या समस्येचे निराकरण करू शकता, तेव्हा या समस्येला प्रसाधनातून लपवालपवीची क्लुप्ती वापरावयाचा प्रयत्न का करायचा? या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्याग्रस्त भागांना आतून बरे करण्यासाठी अनेक त्वचारोगतज्ज्ञही ध्यान आणि मानसिक उपचारांवर अवलंबून असतात. मानस आणि त्वचा यांच्यातील गहन संबंधाचे समर्थन करण्यासाठी भरपूर वैज्ञानिक पुरावे आहेत. तणावाला तुमच्या जीवनावर ताबा मिळवू देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या मनाला तुमचे शरीर आणि तुमच्या हव्या असणार्या सौंदर्याच्या उद्दिष्टांशी तडजोड करू देऊ नका. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता आणि काय म्हणता, याची नेहमीच काळजी घ्या. कारण, कळत नकळत तुम्ही नेहमी तुमचा आतला आवाज ऐकत असता. त्यामुळे अनेकदा दिवसभरात तयार होणार्या मनातील सुप्त भावना आणि ताणतणाव आपल्या त्वचेतून विकाराच्या रूपाने बाहेर येऊ शकतात.
आपल्या त्वचेच्या स्थितीवर भावनांचा प्रभाव पडतो, हे समजल्यावर, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आशावादी वृत्ती निर्माण करणे, हे एका रात्रीत घडत नाही. परंतु, जाणीवपूर्वक असे करणे आवश्यक आहे. यामुळे आपण स्वत:ला केवळ निरोगी त्वचेसाठीच नव्हे, तर आपल्याला सर्वांगीण कल्याणासाठी तयार करत आहोत. त्वचेची सकारात्मकता आणि त्वचेची स्वीकृती यांसारख्या जागतिक पातळीवरच्या चळवळीच्या वाढीमुळे, बरेच लोक सोशल मीडियावर न लाजता आरामात वावरताना दिसत आहेत. ते त्यांच्या मुरुमांसारख्या त्वचारोगाविषयी कथा शेअर करत आहेत आणि मानवी त्वचा निर्दोष किंवा परिपूर्ण नसते, हे सत्य जगासमोर आत्मविश्वासाने मांडत आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांसाठी, आपला स्वाभिमान थेट आपण आपल्याकडे पाहण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. ध्यान आणि तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याव्यतिरिक्त, तुम्हाला चांगल्या त्वचेसाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व विधायक गोष्टी करणेदेखील आवश्यक आहे. यामध्ये निरोगी खाणे, थोडा व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि शांत राहणे समाविष्ट आहे. सकारात्मक विचार हा तुमच्या संपूर्ण त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येचा एक भाग आहे आणि इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे याला समर्पण आणि वचनबद्धता लागते.
- डॉ. शुभांगी पारकर