हवामान बदलामुळे वाढते आजारपण

    17-Apr-2023   
Total Views |
Climate change increases disease

तीव्र हवामान बदलामुळे आफ्रिकेत रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. आफ्रिका खंडातील मलावी या देशामध्ये १९९८ पासून ‘कॉलरा’ची साथ कायम आहे. ‘कॉलरा’ म्हणजे ‘व्हिब्रिओ कोलेरी’ या जीवाणूने दूषित अन्नपाण्याने होणारा तीव्र अतिसाराचा आजार. या रोगाचा पहिला उद्रेक १९९८ साली नोंदवण्यात आला होता. ‘कॉलरा’चा संसर्ग मालावीतील दक्षिणेकडील पूरग्रस्त जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी सध्या देशाची राजधानी लिलोंगवे ही ‘कॉलरा हॉटस्पॉट’ बनली आहे. गंभीर बाब अशी २०२१ मध्ये दोन वर आलेली रुग्ण संख्या गेल्या महिन्यात पुन्हा लाखोंवर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या वर्षभरात झालेला भयंकर पाऊस, त्यामुळे आलेले पूर आणि चक्रीवादळ हे ‘कॉलरा’ची रुग्णसंख्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे संकेत पर्यावरण अभ्यासकांनी दिले आहेत. एकापाठोपाठ एक तीन उष्णकटिबंधीय वादळे दक्षिण मलावीवर आदळल्यानंतर उद्रेक सुरू झाला. देशभरात पूर परिस्थितीमध्ये एक दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले. त्यांना स्वच्छ पाणी आणि राहण्याची सोय नसल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. जागतिक आरोग्य संघटनेच्या डिसेंबर २०२२ मधील अहवालानुसार, उन्हाळ्यातदेखील रुग्ण संख्या वाढताना दिसून आली.

मलावीचे आरोग्य सचिवांच्या मते, ‘कॉलरा’चा हा असामान्य प्रसार हवामान बदलाच्या परिणामांमुळे झाला आहे. जागतिक तापमानवाढीचा संसर्गजन्य रोगांच्या रुग्णसंख्येवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आपण मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्रकाशित ‘डब्लूएचओ’च्या साप्ताहिक बुलेटिनची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येईल गेल्या पाच वर्षांत रोगाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. ही वाढ लक्षणीय असल्याचे या आकडेवारीतून दिसून आले आहे. फेब्रुवारी २०२३च्या दुसर्‍या आठवड्यात, आफ्रिकन देशांमध्ये तब्बल १२५ रोगांचा प्रादुर्भाव नोंदवला गेला. हेच २०१८ साली याच कालावधीत ‘डब्ल्यूएचओ’ने आफ्रिका खंडामध्ये ४४ रोगांच्या उद्रेकांची नोंद केली होती, तर मार्च २०१७च्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ‘डब्ल्यूएचओ’ने २१ रोगांचा प्रादुर्भाव नोंदविला होता. मलावीतील ‘कॉलरा’नंतर लक्षणीय ठरला तो ‘मलेरिया.’ हा प्रसार हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे झाला आहे.

पूर्व आफ्रिकेतील उंचावर असलेल्या प्रदेशातील झालेली तापमानवाढ ही ‘मलेरिया’ रोगाच्या संसर्गाला कारणीभूत असलेल्या डासांना अभय देत आहे. गेल्या शतकात हवामानबदलामुळे डासांनी आपली जीवन शैली बदलल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘बायोलॉजी लेटर्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. याच दरम्यान ‘मलेरिया’प्रमाणे, ‘गोवर’च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या लहान मुलांचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, लसीने टाळता येऊ शकतो.

जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान, आफ्रिकेत ‘गोवर’ संसर्गामध्ये ४०० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च २०२३मध्ये, दक्षिण आफ्रिकेत या रोगाने उच्छाद मांडला. हवामानबदलामुळे वाढलेला आणखी एक आजार म्हणजे ‘डेंग्यू’ ताप. ‘मलेरिया’प्रमाणेच ‘डेंग्यू’ ताप हा डासांमुळे पसरतो. जसजसे हवामान तापते, ‘डेंग्यू’ डासांची संख्या वाढते आहे. याचे एक कारण म्हणजे दुष्काळसदृश परीस्थितीत लोक कंटेनरमध्ये पाणी साठवतात. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि अधिक लोकांना धोका निर्माण होत आहे. हेच कमी की काय म्हणून आफ्रिकेतील तीन देश-केनिया, इथिओपिया आणि सोमालिया हे सलग सहाव्या पावसाळी हंगामाला मुकले आहेत.

यामुळे निर्वासित झालेल्या लोकांचे हाल होत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही मूलभूत गरजांसाठीदेखील वणवण फिरावे लागत आहे. जगभरातील हवामानातील बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याला सामोरे जाण्यासाठी आपण तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. यामध्ये हरितगृह वायूंचे (ग्रीन हाऊस) उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यातूनच या भीषणतेतून मानव सुरक्षित राहू शकेल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.