उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री उशिरा पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात माफिया डॉन अतिक अहमद, तसेच त्याचा भाऊ अशर्रफ यांची तीन मारेकर्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलीस अतिकला प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना अचानक पोलीस आणि माध्यम प्रतिनिधींच्या समोरच मारेकर्यांनी अतिक आणि अशर्रफवर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातले विरोधी पक्ष पोलीस प्रशासनावर तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद हा दोन दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत मारला गेला होता. कुख्यात दहशतवादी अतिक याच्या नावावर शंभरहून अधिक गुन्हे दाखल होते. खासदार म्हणून तो लोकसभेवर निवडूनही गेला होता.
म्हणून त्याने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही. प्रयागराज येथे जे झाले, त्या घटनेचे समर्थन होऊ शकणार नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यातून सत्य समोर येईलच. म्हणून कुख्यात दहशतवादी धर्मांध अतिक याच्या मृत्यूबद्दल जो आक्रोश व्यक्त होत आहे, तो चिंतनीय असाच आहे. शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या अतिकला आज ना उद्या त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून फाशी ही होणारच होती. उद्याच्या ऐवजी तो आज मेला इतकेच.
मात्र, दुर्दैवाने या हत्येला जो धार्मिक रंग दिला जात आहे, त्याचे राजकारण केले जाते, हे मात्र निंदनीय असेच आहे. आपल्या देशाचे हेच तर दुर्दैव आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाते. दहशतवादी मेमनसाठी ती उघडलीही जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सनदशीर मार्गाने प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यानंतर अभिनेता अमीर खान तसेच त्याची पत्नी या दोघांना भारतात राहणे असुरक्षित वाटते. ज्या देशात त्यांना मानसन्मान मिळाला, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, त्या देशाबद्दल ते अशा प्रकारची भावना व्यक्त करतात. माध्यमे, डावे विचारवंत यांनी आजवर हेच तर केले आहे. अतिक हा कुख्यात दहशतवादी धर्मांध मुस्लीम होता, हे कोणीही विसरून चालणार नाही. मात्र, तरुणाईला अशा धर्मांध दहशतवाद्यांचे आकर्षण वाटते. याची कोणालाही काळजी वाटत नाही.
‘रॉयटर्स’सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने झाल्या घटनेचे वार्तांकन करताना कुख्यात दहशतवादी धर्मांध मुस्लीम अतिक याचा उल्लेख माजी खासदार असा उल्लेख केला आहे. त्याच्या नावावर दाखल असलेल्या शंभराहून अधिक गुन्ह्यांची तसेच ‘आयएसआय’ या पाकी गुप्तचर संघटनेशी असलेले लागेबांधे याबाबत एका शब्दानेही ही वृत्तसंस्था उल्लेख करत नाही. यातूनच डाव्या माध्यमांची विचारसरणी स्पष्ट होते. अतिक याने केलेल्या गुन्ह्यांना का लपवले जात आहे? त्याने न्यायालयात आपल्याला उत्तर प्रदेशात प्राणाचे भय आहे, असे म्हटलेले आज का वारंवार सांगितले जात आहे? त्याने गेली दोन दशके जी संघटित गुन्हेगारी चालवली, त्याचा परिणाम म्हणून त्याचा बळी प्रतिस्पर्धी गुन्हेगारांनी घेतला, असा विचार का केला जात नाही? एका आमदाराच्या हत्येप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल होता आणि नव्यानेच या गुन्ह्याचा जो एकुलता एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, त्याचीही हत्या अतिकने केली होती.
खंडणी मागणे, हत्या घडवून आणणे असे गंभीर गुन्हे तो इतकी वर्षे करत होताच, त्याशिवाय काश्मीरमधील दहशतवाद्यांना हत्यारे पुरत असल्याचेही उघड झाले होते. या सर्व गोष्टींना हेतूत: बाजूला ठेवून आज उत्तर प्रदेश प्रशासनावरती ताशेरे ओढणे कितपत योग्य आहे? याचा विचारही व्हायला हवा. विरोधी पक्ष नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये संघटित गुन्हेगारी जेव्हा फोफावत होती, त्यावेळेला हे नेते काय करत होते? राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच तेथील गुन्हेगारी वाढीस लागली होती, तिला राजाश्रय मिळाला होता, म्हणूनच अतिक लोकसभेवर निवडून गेला, हे कडवट असले, तरी सत्य आहे. या संघटित गुन्हेगारीला समूळ उखडून टाकण्याचे काम योगी आदित्यनाथ यांनीच हाती घेतले आहे. गेली सहा वर्षे ते अथकपणे संघटित गुन्हेगारीवरती कठोर प्रहार करत आहेत. गुन्हेगारांच्या अवैध बांधकामावरती त्यांनी चालवलेला बुलडोझर त्यांना ‘बुलडोझर बाबा’ अशी ओळख करून देता झाला.
त्यांच्या गुन्हेगारी विरोधातील कारवाईचे सर्वसामान्य जनतेने स्वागतच केले. तेथील जनता या गुन्हेगारीमुळे त्रस्त झाली होती. त्यामुळेच तेथील बाहुबली जेव्हा पोलिसांना अक्षरशः शरण जाऊ लागले, तेव्हा सामान्य जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस चकमकी हा कोणत्याही परिस्थितीत अंतिम उपाय नव्हे. गुन्हेगारांना शासन देण्यासाठी कायदा व सुव्यवस्था देशात अस्तित्वात आहेत. मात्र, दहशतवादी गुन्हेगार जेव्हा कायद्यातील पळवटांचा वापर करून घेऊन स्वतःला शिक्षेपासून सुरक्षित ठेवतो, तेव्हा सामान्यांचा या व्यवस्थेवरील विश्वास उडतो. म्हणूनच हैदराबाद येथे एका युवतीवर जेव्हा सामूहिक अत्याचार झाले त्यावेळेस त्या सर्व आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर त्याचे देशभरात स्वागत झाले होते.
‘निर्भया’ प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला कायद्याचे संरक्षण मिळाले. त्याला कोणतीही शिक्षा न होता सन्मानाने समाजात राहण्याचे स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा कायदा काही वेळेला कसा अगतिक होतो, याचे नकोसे उदाहरण पाहायला मिळाले. आरोप सिद्ध झालेला आरोपी जेव्हा ताठ मानेने न्यायालयाच्या बाहेर पडतो, तेव्हा कायद्याच्या अंमलबजावणी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा कसाब कारागृहात चिकन बिर्याणीवरती ताव मारतो, तेव्हा सामान्यांमध्ये तो संतापाची तिडीक निर्माण करतो. प्रयागराज येथे नेमके काय झाले? याचे उत्तर चौकशीत मिळेलच. पण या घटनेचे राजकारण करून समाजात दुही माजवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर तो मात्र हाणून पडला पाहिजे, हे मात्र नक्की!