ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या तयारीचा आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. या भव्य सोहळ्यासाठी ठाणे महापालिकेनेही शेकडो टीएमटी बसेससह घनकचरा व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवले आहे.
खारघर येथील कार्यक्रम स्थळी झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रशांत ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बनविलेल्या ३० हुन अधिक समित्यांना सोपविलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्था, परिवहन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदीं सर्व मुलभूत सोईसुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आदींची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच नागरिक या ठिकाणी जमणार आहेत. त्यामुळे या नागरिकांना काहीही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणांनी नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच, कार्यक्रम शांततेत व नियोजित पद्धतीने पार पडेल याची सर्वांनीच दक्षता घेण्याच्या सूचना ना. शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत.