चित्रकार अभय मुरलीधर यांच्या कलाकृतींमधील विशुद्ध रंगांची उधळण त्यांच्या स्वयंशिक्षणातून त्यांना प्राप्त झालेली दिसते. त्यांच्या ‘कॅनव्हास’वर ब्रशचे फटकारे आत्मविश्वासपूर्वक आणि अकृत्रिम भासतात. त्यांच्या प्रत्येक ‘कॅनव्हास’वरील रचना ’लेआऊट्स’ याद्वारे त्यांचा अनुभव ध्यानात येतो. त्यांच्या ’कॅनव्हास’वरीलकाही आकार हे निसर्गातील घटकांची आठवण करून देतात.
संभाजीनगरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’वृतपत्रविद्या’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. तेव्हा कुलगुरु होते, प्रा. शिवाजीराव भोसले. त्या काळात त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात ’ज्ञानयज्ञ’ हे अभियान महाविद्यालयीन स्तरावर फार प्रभावीपणे राबविले होते. त्यांची अनेक व्याख्याने मी ऐकलेली आहेत. त्यांचा आवडता विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. एका व्याख्यानाच्या वेळी त्यांनी ‘स्वयंशिक्षण’ या शब्दाचं महत्त्व सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “जगात अशी काही महान व्यक्तिमत्त्वं आहेत की, त्यांनी कोणत्याही शिक्षण संस्थेचा आश्रय घेतला नव्हता.” हेच वाक्य पुढे नेऊन त्यांनी माहिती दिली.
जॉन स्टुअर्ट हा वडिलांच्या सहवासात शिकला. इंदिरा गांधी या नेहरूंच्या विद्यार्थिनी होत्या. स्वामी विवेकानंदांनी बी.ए झाल्यावर शिक्षण थांबवून आणि पुढील ज्ञानसाधना स्वप्रयत्नाने केली. टिळक-आगरकरांची वर्गातील टक्केवारी कमीच राहिली. साहित्यसम्राट केळकरांना परीक्षेत घवघवीत यश कधी मिळालेच नाही. अशी सारी थक्क नव्हे, तर धक्का देणारी संदर्भांसह उदाहरणे ऐकल्यावर मी ही हैराण झालो होतो.
दृश्यकलेतीलदेखील बरीच मोठी नावे, ही कोणत्या आर्ट स्कूलमधून शिकलीत, हा प्रश्न कायम आहे. आज आम्ही वर्गात जे शिकवतो ते विद्यापीठीय अभ्यासक्रमाला समोर ठेवून शिकवतो. प्रत्यक्षात विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रात किंवा आताच्या भाषेत ’कॉर्पोरेट सेक्टर’मध्ये पाय ठेवतो तेव्हा त्याला, स्वतःच्या पायावर उभे राहायला, त्या त्या क्षणाला ज्या-ज्या बाबींशी सामना करावा लागतो; मला वाटते, तेथूनच त्याच्या खर्या शिक्षणाची सुरुवात होत असावी. वर्गात एखाद्या विद्यार्थ्याची एखादी ’स्वाध्यायिका’ म्हणजे ’असाईनमेंट’ ही गुणदानात दहापैकी चार किंवा दहापैकी आठ गुण घेऊन तौलनिक स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी वर्गातील ’ओपन डिफेन्स’च्या वेळी चर्चिली जाते. त्यानंतर सदर स्वाध्यायिकातील सुधारणा सदर विद्यार्थी कदाचित पुढील स्वाध्यायिकेच्या सादरीकरणाचे वेळी करीलही.
परंतु, प्रत्यक्ष व्यवसायात किंवा ’कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सदर विद्यार्थी जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा त्याची त्यावेळची स्वाध्यायिका ही, त्याचं पोट भरायचं साधन बनत असल्यामुळे त्याला वर्गातील शिकत असताना केलेली टंगळमंगळ किंवा सहजपणे ‘करून टाकणं’ हा विचार, येथे ‘कॉर्पोरेट सेक्टर’मध्ये करून चालत नाही. वर्गातील शिक्षकाची भूमिका ‘कॉर्पोरेट सेक्टर’मध्ये ’क्लाएंट’ किंवा ’ग्राहका’ने घेतलेली असते. वर्गात गुण कमी मिळाले, तर सुधारण्याची संधी असते. व्यवहारात हे असे चालत नाही. ‘आर्टवर्क’ चुकले, तर पैसे मिळणार नाहीच, पण पुढचं कामदेखील मिळणार नाही. एवढी मोठी ’रीस्क’ असते. म्हणून ’अकॅडमिक’ शिक्षणात आणि ’प्रत्यक्ष’ कॉर्पोरेटमधील कामामध्ये फार मोठा फरक असतो. म्हणूनच आजच्या लेखात मला आदरणीय प्रा. शिवाजीराव भोसले सरांची सांगितलेल्या स्वयंशिक्षणाच्या महत्त्वाची आठवण झाली. त्याला कारणही तसंच आहे.
मागच्या महिन्यात मला खास भेटण्यासाठी चित्रकार अभय मुरलीधर आले. संभाजीनगरच्या ‘शाकम’चे ते १९८१ ते ८६च्या बॅचचे उपयोजित कला विभागाचे विद्यार्थी आहेत. अभ्यासात फारशी गती जरी नसली, तरी इतर कलांच्या कौशल्यांमुळे ‘अभय’ यांना ‘अभय’ मिळत गेले. त्यावेळी कॉलेजच्या गॅदरींगमध्ये ‘आधुनिक रामायण’ या नाटकात केलेली सीतामाईची भूमिका अभयना वरदान ठरली. विद्यार्थी मित्र-मैत्रिणी, समकालिक कलाध्यापक यांच्या स्मरणात ते राहिले. त्यांचाच एक वर्गमित्र जो वर्गात प्रथम, पारितोषिकांमध्ये प्रथम अशा रवीबरोबर अभय यांची मैत्री सर्वश्रुत ठरली.
अशा चित्रकार अभय मुरलीधर यांना, उपयोजित कलाशिक्षणाच्या पूर्ततेनंतर, व्यावसायिक कलाजगतात प्रवेश केला. नव्याने प्रवेश करणार्यांना अशावेळी खूप ठेचा लागतात, अडथळे येतात, अडचणींना सामोरे जावे लागते. अभय यांच्या नावातच ‘अभय’ असल्याने त्यांनी या कथित प्रसंगांना निकराने तोंड दिले. प्रत्येक अनुभव विशेषतः कटू अनुभव हा ’गुरु’ असतो. तो काहीतरी शिकवूनच जातो. येथेच सरांनी सांगितल्याप्रमाणे, स्वयंशिक्षणाला सुरुवात झाली. स्वयंशिक्षणाने अभयला ‘अभय’ बनवले आणि अभय हा एक प्रयोगशील ‘अॅब्स्ट्रॅक पेंटर’ अर्थात ’अमूर्तशैली’त काम करणारा पेंटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकला.
चित्रकार अभय मुरलीधर यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास ते म्हणतात की, “आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पेंटिंगसारखे दुसरे माध्यम नाही. जे मनात असते, ते सरळ ‘कॅनव्हास’वर येते. मी जरी उपयोजित कलाकार म्हणून कार्यरत असलो, तरी पेंटिंगची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या मनातील या दोघांच्या युद्धात पेंटिंग हे माध्यम सरस ठरले आणि ते माझ्या अभिव्यक्तीचे माध्यम ठरले. अमूर्त आकारातून व्यक्त होणारा भावनांचा कल्लोळ माझ्या चित्रांतून व्यक्त होतो, असा माझा ठाम विश्वास आहे. विविध आकार, रंग, पोत यांचे भावविलक्षण चित्रण जसे मला आत्मिक समाधान देऊन जाते, तीच अनुभूती पाहणार्यालादेखील येईल, असा मला विश्वास वाटतो.”
हा गाढा विश्वास मुरलीधर यांच्या मनात- विचारांचे आणि ‘कॅनव्हास’वरदेखील तितक्याच तन्मयतेने व्यक्त होताना दिसतो. त्यांच्या कलाकृतींमधील विशुद्ध रंगांची उधळण त्यांच्या स्वयंशिक्षणातून त्यांना प्राप्त झालेली दिसते. त्यांच्या ‘कॅनव्हास’वर ब्रशचे फटकारे आत्मविश्वासपूर्वक आणि अकृत्रिम भासतात. त्यांच्या प्रत्येक ‘कॅनव्हास’वरील रचना ’लेआऊट्स’ याद्वारे त्यांचा अनुभव ध्यानात येतो. त्यांच्या ’कॅनव्हास’वरीलकाही आकार हे निसर्गातील घटकांची आठवण करून देतात. ज्याला पोहायचे असते, त्याला स्वतःला स्वतःचेच हातपाय हलवावे लागतात. सायकलदेखील स्वतःलाच चालवाची असते. खूपदा पडल्यानंतर मग ‘तोल’ सांभाळायला जमते, ज्यात आपली गुंतवणूक नसते.
त्यात आपल्याला कौशल्य दिसत नाही. अभय मुरलीधर यांनी उपयोजित कलेतून पेंटिंग क्षेत्रात पाय रोवले, ते त्यांच्या स्वयंशिक्षणाच्या जोरावर. अनुभूती ही अभिव्यक्तीत परावर्तित झाली. अभिव्यक्ती ही रंगाकारांमार्फत ‘कॅनव्हास’वर व्यक्त झाली. त्यांचे ‘कॅनव्हास’ पाहताना त्यांचा रंगलेपनातील आत्मविश्वास ध्यानी येतो. ओशोंनी सांगितल्याप्रमाणे, सर्व कलाप्रकारांच्या उपासकांमध्ये चित्रकार हा फार लवकर ‘मेडिटेट’ होतो आणि प्रत्येक कलाकाराला, त्याच्या उत्कृष्ट कलानिर्मितीपूर्वी मोठा अपघात झालेला असतो. खरं आहे, जे जोपर्यंत मनात जिद्द निर्माण होत नाही, तोपर्यंत ’अभय’ होता येत नाही. जीवन हे स्वयंभू, अमर, स्वयंसिद्ध असते. ते गुणांवर अवलंबून नसते. त्यामुळे व्यक्तिगत श्रेय आणि साधना यांच्या सातत्याने व्यक्तिमत्त्व घडते.
चित्रकार अभय मुरलीधर हे स्वयंशिक्षणातून अमूर्त चित्रकार म्हणून बनले आहेत. त्यांची अनेक ‘पेंटिंग्ज’ अनेक ठिकाणची अंतर्गत सजावट समृद्ध करीत आहेत. त्यांच्या कलाप्रवासाला अनेक शुभेच्छा....!
प्रा. डॉ. गजानन शेपाळ