बाबा, तुमच्या जयंतीनिमित्त!

    13-Apr-2023   
Total Views |
dr. babasaheb ambedkar jayanti 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. मानवतेची अभिव्यक्ती जगणार्‍या सगळ्यांसाठीच हा एक मंगल दिवस, मोठा उत्सव. सामाजिक न्यायाची संकल्पना संविधानाने प्रत्यक्ष जगायला लावणार्‍या बाबासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त सभा, संमेलने, जलसा आणि मिरवणुका निघणारच. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासूनच्या काही घटना पाहता सावधगिरी बाळगणे आवश्यक वाटते.गेल्यावर्षी अहमदनगरमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली. समाज अत्यानंदाने या मिरवणुकीमध्ये सामील झाला. मात्र, या मिरवणुकीमध्ये काही लोक गोल टोप्या घालून हिरवे झेंडे घेऊन घुसले. आयाबायांना त्रास देऊ लागले, तर वस्तीपातळीवरही बारीकसारीक घटना घडल्याच होत्या. पण, सामाजिक सौहार्द कायम राहावे म्हणून त्याची वाच्यता झाली नसावी. तसेच, सर्वांत महत्त्वाचे समाजाच्या मनात एकतर्फी ‘जय भीम, जय मीम’ची संकल्पना बळेबळे भरवणार्‍यांमुळे म्हणा काही समाजकंटकांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे समाजातील मुलीबाळींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. चेंबूरच्या रूपाली चंदनशिवेची केस कशी विसरणार? आंबेडकरांच्या विचारांचा तिला खूप अभिमान होता. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची तिला चाड होती. पण, काय झाले तिच्यासोबत? आधीच दोन पत्नी असलेल्या इकबालची तिला तिसरी पत्नी बनावे लागले. बुरखा घालत नाही, त्याच्या धर्माच्या पद्धतीनुसार वागत नाही म्हणून शेवटी इकबालने तिचा गळा चिरला. त्यामुळेच वाटते की, बाबांनी जे भारतीयत्व सांगितले, ते भारतीयत्व जगण्याची आणि तपासण्याची वेळ आता आली आहे. अर्थात हे सांगणारी मी कोणी खूप बुद्धिमान आणि सर्वअनुभवसंपन्न नक्कीच नाही. मात्र, दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याचा मृत्यू आणि त्यानंतर ‘कट्टर आंबेडकरवादी’ म्हणवत काही त्याच त्याच संघटनांनी चालवलेला अजेंडा आठवून हे म्हणते आहे. या संघटना बाबासाहेबांच्या मूल्यवान विचारांना दुर्लक्षित करून, अखंड सामाजिक समतेच्या न्यायाच्या प्रक्रियेलाच विसरून हे सगळे कोणती क्रांती करू इच्छितात? कोणता न्याय प्रस्थापित करू इच्छितात? दर्शनच्या मृत्यूला कारणीभूत कोणत्याही समाजाचा व्यक्ती असता, तर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायलाच हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला सामाजिक न्यायाचा अभूतपूर्व वसा अखंड चालत राहावा, हीच सदिच्छा.

 
कुठे नेऊन ठेवले आम्ही?

 
'मेरे दोस्त फिक्चर अभी बाकी हैं’ राणेंचा नितेश म्हणाला. तो असं पण म्हणाला की, ‘पेंग्विन’ आणि ‘युटी’ने दिशा सालियनच्या केसच्या भीतीने कोणा कोणाचे हात-पाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले. हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच. किती वेळा पोराला समजवतो की, बाबा रे, माझे कुटुंब माझी जबाबदारी. मी लाखवेळा म्हणतो, तू एकदा मी स्वतः माझ्यासाठी जबाबदार असे वाग. काय गरज होती का आताचे मुख्यमंत्री रडले म्हणायची? बरं, तो तर तो, त्याच्यापाठी आमच्या दूरदृष्टीवाल्या संजयने पण लगेचच तेच वाक्य परत म्हटले. काय म्हणता, कर नाही त्याला डर कशाला?अगदी बरोबर आहे. ज्याने काहीही केलेले नाही, त्याला डर असणारच नाही. काय सांगू? ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यापलीकडे मी काय बोलणार? काय म्हणता, २०२२ साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर इतक्या महिन्यांनंतर माझ्या बाळाला एकनाथ शिंदे रडले होते हे बोलायचे का सुचले? तेव्हा मस्त मजेची सत्ता गेली, स्थगिती सरकार पडलं त्यावेळी का बरं हे सगळं माझे बाळ बोलले नाही? आता असं आठवून ठरवून का बोलते? की तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले म्हणून काहीही बोलतो आहे?बरं नितेश तर नितेश, ते बांगर पण म्हणाले की, एकनाथ साहेबांना आम्ही सगळे आमदार म्हणालो की, तुम्ही कमान सांभाळा. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना नेतृत्व करायची गळ घातली. कारण, आम्हाला दाऊदसोबत बसणार्‍यांच्या सोबत बसायचे नव्हते. आता काय म्हणावे? तरी अजून ३९ आमदार गप्प आहेत. ते काय काय म्हणतील? आणि ते जे काय म्हणतील, त्यांच्या उत्तरादाखल आमच्यासोबतचे उरलेसुरले त्यांना काय उत्तर देणार? हं आमच्याकडे संजय आणि सुषमा आहेत. त्यांना लावू बोलायला. काय म्हणता आडात असेल तर पोहर्‍यात कुठून येणार? बरोबर आहे. हे दोघे जे बोलतात त्यांनी आमची बाजू झाकली जाते का, उघडी पडते हाच एक संशोधनाचा विषय आहे. तुर्तास ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणता म्हणता कुठे नेऊन ठेवले आम्हीच आम्हाला असे म्हटले पाहिजे...


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.