मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं बाबरी मशिदीच्या संदर्भात असलेले नाव पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. "बाबरी पाडणारे आमचे शिवसैनिक होते." यावर बोलत असतांना बाळासाहेब ठाकरे बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते असेही म्हणत हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आता यावर डॉ. मिंधे बोलणार का? असा ही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, "बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केलं, हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे भाजपचे किंवा अन्य संघटनांचे कुणी नव्हते ते आमचे शिवसैनिक होते. खरं तर हिंदुत्वावर शिवसेना सोडली असे म्हणतं जे तीर मारतात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. भाजपने ज्या पळपुट्यांना घेऊन सरकार बनवलंय त्यांच्या दैवतांचा अपमान होतोय. भाजपची हिंमत एवढी वाढलीय की ते आमच्या दैवताचा अपमान करत चिखलफेक करु लागले आहेत. याच चिखलात बसून डॉ मिंधे आणि 40 आमदार सत्ता भोगतायत. पण सत्तेतले मिंधे यावर तोंड उघडणार नाही."
"खरंतर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर राजीनामा देण्याची हिंमत नसेल तर त्यांना शिवसेनेचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं राऊत म्हणाले. हातात नकली धनुष्यबाण आणि भाजपच्या चड्डीचे नाडे पकडून शिंदे गट अयोध्येत गेले होते. आता यावर त्यांची भूमिका काय असणार असा सवाल राऊतांनी विचारला आहे. चंद्रकांत पाटील यांना इतक्या वर्षांची बोलण्याची गरजच काय होती?" असंही राऊत म्हणाले.