देहराडून : मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल कॉमेडियन आणि ब्लॉगर यश राठी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या देहराडूनमधील शीला फार्म, नंदा चौकी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी कॉमेडीच्या नावाखाली प्रभू रामाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. “जेव्हा येशूने पहिल्यांदा पाण्यावर चालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो बुडाला. त्याच्या मित्राने त्याला बाहेर काढले आणि मित्र म्हणाला, येवढा अतिआत्मविश्वास तुला धड चालता येत नाही किमान पोहायला तरी शिकायचं.मग येशू म्हणतो की एक छोटीशी चूक झाली आहे. चप्पलवर राम लिहायला विसरलो.", असे वादग्रस्त विधान यश राठीने केले आहे.
त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भगवान रामाचा अपमान केल्याबद्दल विविध राजकीय आणि हिंदू धार्मिक संघटनांनी कार्यक्रमस्थळी निषेध केला. तसेच, दि.१० एप्रिल रोजी स्थानिक प्रेम नगर पोलिस ठाण्यात जाऊन यश राठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर भैरव भवानी संस्थेचे अध्यक्ष सागर जैस्वाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सागर जयस्वाल यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.८ एप्रिलला नंदा की चौकी परिसरात असलेल्या शीला फार्ममध्ये युथ फॉर यू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान यश राठी यांनी भगवान श्री राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.