केंद्र सरकारचा डिजीटल स्ट्राईक, १२० चिनी आयडी बंद

    11-Apr-2023
Total Views |
Digital Strike-Central Government,

नवी दिल्ली
: केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन महिन्यात १२० चिनी आयडी बंद करण्यात आले आहेत. याद्वारे खोट्या संदेशांच्या आधारे मालवेअर लिंक्स पाठविण्याचे षडयंत्रदेखील उध्वस्त करण्यात यश आले आहे.

इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर अर्थात आय४सीच्या तपासणीनंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. या हेडर्सच्या माध्यमातून बँका, विपणन कंपन्या सेवा प्रदाते आणि अनेक सरकारी कार्यालयांच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठविण्यात येत होते.

बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या ग्राहकांना वीज बिलाशी संबंधिक बनावट संदेश पाठविण्यात आले होते. चिनी हेडरद्वारे पाठवलेल्या या संदेशांमध्ये मालवेअर लिंक्स देण्यात आल्या होत्या. या लिंक्सवर क्लिक केल्यावर ग्राहकांचे बँक अकाउंट हॅक होत होते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान घडविण्याची योजना याद्वारे आखण्यात आली होती.

हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचे आय४सी द्वारे सांगण्यात आले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आय४सीच्या तपासणीनंतर संबंधित आयडी बंद केले आहेत.