ठाकरेंच्या अडचणीत वाढ ! पक्षनिधी शिंदेंना देण्यासाठी न्यायालयात याचिका

तर याचिकेशी आमचा संबंध नाही - नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण

    10-Apr-2023
Total Views |
shiv-sena-shinde-faction-stakes-claim-to-sena-bhavan-and-funds-of-party

मुंबई
: पक्ष आणि चिन्ह हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मागे सुरु झालेली संकटांची मालिका अजूनही कायम आहे. त्यात आता आणखी एका संकटाची भर पडली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातातील शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी मूळ शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना कुणाची या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष असून त्यांनाच पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन्ही अधिकृत आणि नोंदणीकृत गोष्टी देण्यात आल्या होत्या. तोच धागा पकडून आता ऍडव्होकेट आशिष गिरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ''शिवसेना कुणाची हा निर्णय केन्द्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची चल अचल संपत्ती देखील शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात यावी. तसेच शिवसेना भवन, शाखा आणि बँकांमधील पक्षाच्या नावावर असलेला सर्व पक्षनिधी देखील शिंदेंच्या पक्षाला द्यावा,'' असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

निधीसह कार्यालयावर वापरावरही रोक लावा

शिवसेना पक्षाचा निधी कुठेही जाऊ नये, अशी माझाही इच्छा आहे. त्यासाठी न्यायालयाने आवश्यक ती कारवाई करून ही मालमत्ता ताब्यात घ्यावी. हा निधी इतर कुणाच्याही हातात जाऊन नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कोर्टाने याबाबत निर्णय घेऊन निर्णयानंतर मालमत्ता शिंदेंकडे सोपवावी अशी माझी भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत केवळ पक्षनिधीच नव्हे तर शिवसेना भवन व शिवसेनेच्या शाखांच्या वापरावरही रोक लावण्यात यावी.''

- ऍडव्होकेट आशिष गिरी, याचिकाकर्ते


याचिकेशी आमचा संबंध नाही - नरेश म्हस्के

''शिवसेनेच्या चल आणि अचल मालमत्तेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे.''

- नरेश म्हस्के, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, शिवसेना