मुंबई : iccr (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) चा ७४ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्ताने शेजारील राष्ट्रांसोबत भाषा सेतू सांधणारा प्रस्ताव iccr चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडला. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्याचप्रमाणे इतर राष्ट्रातील भाषा शिकण्याकडेही भारतीय विद्यार्थ्यांचा कल असतो. साधारणपणे युरोपिय भाषा, फ्रेंच, जर्मन सोबतच काही आशियायी भाषा, जपानी, मँड्रिन या भाषा शिकणारा भारतीय विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर आहे. परंतु, भारताच्या शेजारील राष्ट्रांतील भाषा शिकण्यावर भर देण्यात येणार असल्याचे या प्रस्तावातून स्पष्ट होते.
यासाठी प्राथमिक स्तरावर १० भाषांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात कझाक, उझबेक, भुतानीज, घोटी, बर्मीज, ख्मेर, थाई, सिंहली आणि बहासा या भाषांचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी चर्चेअंती २ शक्यता जाहीर करण्यात आल्या. पैकी संबंधित भाषेचे शिक्षक भारतात येऊन त्या त्या भाषा विद्यार्थ्यांना शिकवतील किंवा iccr तर्फे निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्या त्या देशांत जाऊन स्थानिक भाषेत शिक्षण देण्यात येईल. भारतीय संस्कृतीचे संवर्धन होण्यास यानिमित्ताने मदत होईल अशी आशा आहे.