पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'मध्ये गैरव्यवहारप्रकरणी सोमय्यांचे अल्टिमेटम!

उद्धव ठाकरेंसह सुजित पाटकर यांच्या "लाईफलाईन" कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची किरीट सोमय्यांची मागणी

    10-Apr-2023
Total Views |
Somaiya's ultimatum in case of 'Jumbo Covid Center' in Pune

पुणे
: राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. हे सेंटर चालविले जात असताना नागरिकांच्या जीवाशी खेळ करून कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईप्रमाणेच पुढील सात दिवसात पाटकर यांच्या कंपनीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी नगरसेवक दत्ता खाडे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. सोमय्या यांनी सहकाऱ्यांसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी सोमय्या म्हणाले, जुलै २०२०मध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता.

मुंबई येथे मुंबई महापालिकेकडून तसेच पुणे शहरात पीएमआरडीए व पुणे महापालिकेकडून शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हे जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आले होते. हे कोविड सेंटर चालविण्यासाठीचे कंत्राट सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पीएमआरडीएकाडून हे कंत्राट देण्यात आले. मात्र, माहिती अधिकाराचा वापर करून लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने रीतसर केलेला अर्ज, कंपनी केव्हा स्थापन झाली, कंपनीचा अनुभव किती व तीन वर्षाचे ताळेबंद अशी माहिती मागविण्यात आली होती. पंरतु, ही माहिती देण्यात आली नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने केवळ एक सादरीकरण (प्रेझेंटेशन) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले होते. केवळ त्या लवर आधारित ८०० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट त्यांना दिले गेले ही गंभीर बाब असल्याचे सोमय्या म्हणाले. पीएमआरडीए व टास्क फोर्सने तयार केलेल्या नियमावलीकडे लाईफ लाईन हॉस्पिटलने पूर्ण दुर्लक्ष केले. कोरोना अगदी टिपेला पोचलेला असताना अनुभवी डॉक्टर्स नाहीत की अन्य पॅरामेडिकल स्टाफ नाही म्हणून रुग्णांचे हाल झाले.

काही दिवसातच तीन रुग्णांचा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला. त्यावर पुणे महापालिकेने २ सप्टेंबर २०२० रोजी पीएमआरडीला यासंबंधी तक्रार व अहवाल पाठवला होता. तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसमध्ये क्षमता नाही तरी त्यांनी काम चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या सर्व प्रकरणामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झालेला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

लाइफलाईन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या १०० रुग्णांपैकी कोणाची किडनी खराब झाली, तर काहींना हृदयाचा त्रास झाला. काही रुग्णांचा बळी गेला. लाइफलाइन कंपनी ही ब्लॅक लिस्ट करण्यात आल्यानंतरही तत्कालीन सरकारने फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. उलट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात लाइफलाइन कंपनीला काम दिले. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.