प्रतिकूल परिस्थिती आणि कुठलेही व्यावसायिक नृत्यवर्ग, शिक्षण न घेता स्वत:च्या अंगभूत नृत्यकलेने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कोरिओग्राफर’ म्हणून करिअरला आकार देणार्या प्रशांत जाधवविषयी...
प्रशांत जाधव नाशिकचा. शाळेत असल्यापासूनच त्याला नृत्याची आवड. शालेय स्नेहसंमेलनातून त्याने अनेकदा नृत्याची चुणूक दाखवली. दुसरीत असल्यापासून त्याची नृत्याशी जमलेली गट्टी करिअरपर्यंत नेऊन पोहोचवेल, असे त्याला आणि त्याच्या पालकांनाही कधी वाटले नाही. मुलाने शिकावे, छानशी नोकरी करुन पटकन जीवनात स्थिरस्थावर व्हावे, अशी सर्वच पालकांची जशी इच्छा असते, तशीच प्रशांतच्या पालकांचीही होती. त्यावेळी नृत्यातून आपले करिअर होईल, असे दिवस निदान नाशिकमध्ये तरी नव्हते. त्यामुळे छंद, आवड म्हणून ठीक. परंतु, करिअरसाठी दुसरे एखादे चांगले क्षेत्र निवडावे, असे प्रशांतच्या पालकांना वाटे. पण, प्रशांतला नृत्याचे वेड स्वस्थ बसू देत नसे. महाविद्यालयामध्ये असताना त्याने लोकनृत्यावर आधारित नृत्य सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यामध्ये प्रशांतने राक्षस होऊन ‘देवी-राक्षस’ असे नृत्य केले. नाशिकमधील ‘रिमझिम डान्स ग्रुप’, ‘दी रायझिंग स्टार’, ’पेसमेकर’ अशा ग्रुपमध्ये मित्रांसोबत प्रशांत नृत्य बसवे. त्याने आयुष्यात कुठल्याही नृत्यप्रकाराचे ‘प्रोफेशनल’ शिक्षण घेतले नाही, हे विशेष. इंटनेटवर, युट्यूबवर बघून प्रशांत नृत्यकला आत्मसात करत गेला.
आपल्याला नृत्यातूनच आनंद आणि समाधान मिळते. इतर करिअरमध्ये आपले मन रमणार नाही, हे त्याला चांगलेच ठावूक होते. १८ वर्षांचा असताना प्रशांतला चीनमध्ये नृत्य करण्याची संधी मिळाली. चीनमध्ये १७ शहरांत त्याने नृत्याचे कार्यक्रम केले. त्यातील दोन नृत्यप्रवेशात ‘लिड आर्टिस्ट’ म्हणून सादरीकरण केले. नंतर, अनुभव, सरावातून त्याने नृत्य अधिकच सफाईदारपणे, कल्पकतेने फुलवले. नोकरी की नृत्य, असा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हादेखील प्रशांतने नृत्यातच करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी नाशिक सोडावे लागणार आणि चित्रपटसृष्टी किंवा डान्स शोज्, ’इव्हेंट’ यासाठी ‘कोरिओग्राफी’ करण्यासाठी काम शोधावे लागणार होते. प्रशांतने नृत्यामध्ये तुलनेने कमी संधी असलेले नाशिक सोडले आणि मुंबईची वाट धरली. मायानगरी मुंबईत नृत्यदिग्दर्शनाचे कामे मिळवणे तसे आव्हानात्मक. ऐन उमेदीच्या काळात प्रशांतला पैशाची प्रचंड चणचण भासे. अनेक रात्री त्याने रेल्वे स्थानकवरही काढल्या. काही काळ झोपडपट्टीत वास्तव्य केले. कधी एक वेळ उपाशी राहून त्याने नृत्यासाठी कामे शोधणे सुरू ठेवले. फुटक्या अंड्याच्या भुर्जी स्वस्त असतात, म्हणून वडा आणि भुर्जी खाऊन त्याने दिवस काढले. “एकदा सडक्या अंड्याची भुर्जी खाताना त्यामध्ये असणारी बीडी तोंडात गेली, तो क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता,” अशी एक मन विदीर्ण करणारी आठवण प्रशांत सांगतो.
नोकरी करायची नाही म्हणून नाशिक सोडलेले. हाताशी काम नाही, अशी अनेक वर्षे प्रशांतने काढली. एकदा हताश होऊन प्रशांत नाशिकला परतला. मात्र, विझलेल्या मनात आणि पराभूत स्वप्नांना त्याने पुन्हा उभारी दिली. ‘नृत्यातच करिअर करायचे तर संघर्षाला का घाबरायचे, आता लढायचे’ अशी खूणगाठ मनाशी बांधून तो मुंबईत पुन्हा आत्मविश्वासाने परतला. तब्बल सहा ते सात वर्षे करिअरसाठी संघर्ष करून अखेर प्रशांतला प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या विद्यार्थिनींना शिकवण्याची संधी मिळाली. प्रशांत ‘हिपहॉप’ नृत्यप्रकारात निपुण होताच. त्याच्या कलेला तिथे वाव मिळाला अन् करिअरचे कवाड उघडले. गणेश आचार्य यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली साहाय्यक म्हणून प्रशांतने काम सुरु केले. पुढे अक्षयकुमार, शाहीद कपूर, रणवीर कपूर, वरुण धवन यांच्यासाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून गणेश आचार्य यांच्यासोबत त्याने साहाय्यक ’कोरिओग्राफर’ म्हणून काम केले. रणवीर सिंगसोबत स्वतंत्रपणे एका जाहिरातीसाठी नृत्यदिग्दर्शनही केले. ‘अजय देवगण फिल्म प्रॉडक्शन’निर्मित ’वल्ले’ नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्याचे काम लोकांना आवडले.
आजवर प्रशांतने हिंदी चित्रपटसृष्टीत साहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून ७० हून अधिक चित्रपटांसाठी काम केले. “नृत्याशिवाय मी राहूच शकत नाही. सलग काही दिवस नृत्य केला नाही, तर शरीरातील चैतन्य निघून जाते,”असे तो सांगतो. ‘ब्रह्मास्त्र’, ’पुष्पा’, ‘बच्चन पांडे’ ‘सर्कस’, ‘तानाजी’, ‘गोलमाल-४’, ‘हाऊसफूल्ल-४’, ‘मैं झुटा तू मकार’, ‘सिंबा’, ’खिचडी-२’ आदी हिंदी चित्रपटांसाठी प्रशांतने ‘साहाय्यक कोरिओग्राफर’ म्हणून आपले नृत्यकौशल्य सिद्ध केले.“नृत्यामधील सर्वच प्रकार मला आवडतात. परंतु, भारतीय लोककलेवर नृत्य सर्वांधिक आवडते. तेच सर्व नृत्याचे अधिष्ठान आहे,” असे प्रशांत सांगतो.प्रशांतने आजवर बँकाँक, दुबई, ब्रिटन, स्वित्झर्लंड, जपान या देशांमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून शूटिंगसह ’डान्स शोज’ केले. “हिंदी चित्रपटसृष्टीत ‘टॅलेंट’ला किंमत असते. त्यामुळे इथे ‘टॅलेंटेड’ लोकच टिकून राहतात,” असे तो आवर्जून सांगतो. नृत्याकडे आज पूर्णवेळ करिअर म्हणून पाहिले जाते. कला आता ’एक्स्ट्राकरिक्यिुलर’ म्हणून न पाहता शिक्षणाइतकेच महत्त्वपूर्ण होत आहे, याचे समाधान वाटते,” असे सांगतो. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीचा ‘कोरिओग्राफर’ होण्याचे प्रशांत जाधवचे स्वप्न आहे. त्याच्या या स्वप्नाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा...!