भास्कर जाधवांच्या 'त्या' विधानाचा केशव उपाध्येंकडून समाचार
10-Apr-2023
Total Views |
मुंबई : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे विधान आमदार भास्कर जाधव यांनी केले. या वादग्रस्त विधानावर केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हणाले की, भास्करशेठ , भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात ?ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले होते. आणि आज भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे. त्यामुळे भास्कर जाधवांनी लक्षात घ्यावे की, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही तर कर्तृत्व बघावं, असा सल्ला ही उपाध्ये यांनी जाधव यांनी दिला.
रंग , रूपाचा माज करू नका. ब्रिटनचा सध्याचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेलाही बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते. राजकारणात टीका जरूर करावी पण एखाद्याच्या रंग रुपावरुन टीका करून भास्कररावांनी आपली ब्रिटिश मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका ही केशव उपाध्येंनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे. तसेच भास्कररावांनी बावनकुळे यांच्या रंगावरून शेरेबाजी करून भागवत धर्माचाच अपमान केला आहे, असे ही उपाध्ये म्हणाले.
भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात. मात्र ते खेळाडू होते तुम्ही कोणासोबत खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका बॉलवर आऊट करतील पत्ता सुद्धा लागणार नाही. असे म्हणत भास्कर जाधव यांनी बावनकुळेंना उपरोधिक टोला लगावला. त्यावर मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांना भास्करावांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती. ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कररावांना अपमानित करून हाकलून दिले गेले त्याच उद्धवरावांची भास्करराव आपल्याला आरती करावी लागत आहे हे आपण लक्षात घ्यावे. तसेच ठाकरेंची विकेट कशी गेली हे महाराष्ट्राला माहिती आहे, अशी टीका ही केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.