मुंबई : गेल्या २० वर्षांत लाखो कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रेडाई) यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनातून पूर्ण केले आहे. क्रेडाई-बीएएनएमच्यावतीने २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात नवी मुंबईतील शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या घरापासून अत्याधुनिक लक्झरी फ्लॅट सदर प्रदर्शनात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर मागील वर्षी २० वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत झाले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सुमारे १५० बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभागासाठी नोंदणी केली आहे. नवी मुंबई, सिडकोच्या नैना प्रकल्पात तयार झालेल्या त्याच प्रमाणे निर्माणाधीन तसेच भविष्यात निर्माण होणारे प्रकल्पातील घरे बांधकाम व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती हरीश छेडा यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला क्रेडाईचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, धर्मेंद्र कारिया, सुरेंद्रभाई ठक्कर, हरिश छेडा, सचिन अग्रवाल, भूपेन शहा, ए.आर.खत्री, प्रकाश बाविस्कर, जिगर त्रिवेदी, मनिष शाह आदी बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.