समाजप्रबोधनपर पुस्तकांचे अमृतविचार

    01-Apr-2023   
Total Views |
Abhang Granthdalan

‘अभंग ग्रंथदालना’ची स्थापत्यविशारद प्रमोद जोशी यांनी लिहिलेली दोन पुस्तके नुकतीच वाचनात आली आणि आपल्या सनातन धर्माविषयी माहितीत भर पडली. ‘सनातन म्हणजे पुरातन’ असा सहज एक समज आपण करतो. पण, ‘सनातन’ या शब्दाचा खरा अर्थ काय, तर ‘नित्यनूतन ते सनातन.’ ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आपले धर्मतत्त्व आहे. ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असे आपणांस सांगण्यात येते. त्यानिमित्ताने ही दोन्ही पुस्तके समाज प्रबोधन करण्यास मार्गदर्शक ठरतात.

‘संतांचा आनंदपथ’ या पुस्तकातून संतमाहात्म्य, त्यांची प्रवचने, तसेच ‘अष्टदल स्तोत्रावली’ या पुस्तकातून आठ महत्त्वाची स्तोत्रे व त्यांची माहिती आणि भावार्थ विशद केला आहे.या आठ स्तोत्रांमध्ये श्रीरामरक्षा, श्रीमारुती स्तोत्र, श्रीगणपती अथर्वशीर्ष, मातृभूमी वंदन, मंत्रपुष्पांजली, स्वतंत्रता स्तोत्र, वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत या आठ स्तोत्रांचा पुस्तिकेत समावेश आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला आपले हृद्गत मांडताना प्रमोद जोशी म्हणतात, “प्रत्येक मनुष्याने आपला स्वधर्म निर्दोषपणे आचरावे आणि तसा आदर्श इतरेजनांच्या समोर उभा करून त्यांना त्यांचा धर्म शिकवावाही.” सनातन वैदिक हिंदू धर्माची शिकवण आहे. बुद्ध कौशिक ऋषीलिखित रामरक्षास्तोत्राचा भावार्थ सांगताना त्यांनी उपास्य देवतेसोबत काव्यप्रकारही विशद केले आहेत. हे स्तोत्र अनुष्टुप छंदांमध्ये असून मंत्रशक्ती सीता आहे, तसेच देवता श्रीराम आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.


 खरेतर आपण पाहावयास गेलो, तर श्रीरामच आपले सर्वार्थाने रक्षणकर्ते आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच या मंत्रवत् स्तोत्राला ‘रामरक्षा’ असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकांतात किंवा लोकांतात आपण ज्या प्रकारे वागतो, त्या वागण्यात रामाचा आदर्श ठेवायला हवा. आपण कर्तव्यनिष्ठ, दानशूर, भक्तिभावाने परमार्थ करणारे असायला हवे. सर्वात श्रेष्ठ असे धर्मविचार जनमानसात बिंबवा म्हणून लक्ष-लक्ष साधूसंत रामाची भक्ती करतात, हेच रामरक्षेचे यश आहे. द्वितीय पुष्प म्हणजे, श्रीमारुती स्तोत्र. या स्तोत्राची सुरुवातच समर्थ रामदासांनी आपल्या मधुर शब्दांतून मारुतीरायाच्या गुण आणि रूपाने करतात. रामदासांचे शब्द म्हणजे मधुर शब्दांचा ओघच. त्यांतून अर्थसमवेत भावनांचे मिश्रण ते इतक्या सहज वाचकांपर्यंत पोहोचवतात की, आपण नतमस्तक होतो. मारुतीस्तोत्राची माहिती सांगताना जोशी म्हणतात, “वैभव आणि संपन्न साम्राज्यावर परकीय आक्रमणाने झाली त्यांनी स्वधर्माची गरिमा धुळीस मिळवली. अशावेळी राष्ट्रधर्म आणि ईश्वरधर्म दासांनी आवर्जून सार्‍या विश्वाला सांगितली.

गणपती अथर्वशीर्षाचा त्यांनी गणांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक ओळीचा सविस्तर अर्थ सांगून भावार्थ विशद केला आहे. सोप्या शब्दांत गण म्हणजे समूह. मनुष्य, पशुपक्षी, चरचर, सजीव, निर्जीव, देहादी इंद्रियसमूह, जाणते व अजाणते या सर्वांचा समूह म्हणजे ’गं.’ त्या गणांचा अधिपती तो गणपती. त्याचे शीर्ष. नरहरी नारायण भिडे लिखित ‘मातृभूमी वंदन’ ही रा. स्व. संघाची प्रार्थनासुद्धा जोशींनी आपल्या पुस्तकात समाविष्ट केली आहे. ज्ञान व जीवन देणार्‍या मातृभूमीला वंदन करून तिच्या चरणी मागणे मागताना काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होऊन या पुण्यभूमीची प्रार्थना करायला हवी. मंत्रपुष्पांजलीचा भावार्थ सांगत ते म्हणतात, “आत्मिक उन्नतीच्या मार्गात देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रजेला राष्ट्रीय स्थैर्य उपासना स्वातंत्र्य असणे गरजेचे.” सावरकरांनी लिहिलेले स्वतंत्रता स्तोत्र आपल्या पुस्तकात घेऊन जयोऽस्तुते गीताचा गौरव त्यांनी केला आहे. सावरकरांच्या लेखनशैली आणि वैचारिकधारेच कौतुक करत त्यांना समजलेला भावार्थ त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.

बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित ‘वंदे मातरम्’ गीत आणि रवींद्रनाथांच्या राष्ट्रगीताने आपल्या पुस्तकाचा शेवट त्यांनी केला आहे. यानिमित्ताने ते लिहितात, “राष्ट्र म्हणजे केवळ एक भाग नव्हे, तेथे नांदणार्‍या लोकांची मूळ सांस्कृतिक, पारंपरिक, जीवनपद्धतीचा जपणूक केलेली, ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती, साधणारी सर्वसमावेशक जीवनपद्धती होय.”‘संतांचा आनंदपथ’ या पुस्तकातून प्रमोद रिाठ यांनी ३९ मुद्द्यांवर आपली मते मांडत त्या-त्या संज्ञेचा भावार्थ समजावून सांगितला आहे. सूक्ष्म दृष्टिक्षेप, कर्मस्वातंत्र्य, दृश्यभ्रमितकल्पनात्याग, आश्रम, भगवंताचा प्रियभक्त, भागवतीगती, ईश्वराशी ऐक्य, हरिरूपसगुणब्रह्म, हरीचे रूप हेच आमचे सर्वस्व, आधी प्रपंच करावा नेटका, समग्र साधनेद्वारे सत्फल, विश्वाचा मालक, ईश्वराचा कार्यकर्ता तोच पुरुषोत्तम, गुरुसाक्षात् परब्रह्म, तर राजा विष्णूचा अंश, संयमित राज्यव्यवस्था, देवाच्या प्रियभक्ताची देहातीत अवस्था, संसार छेदून सार तेवढेच घ्यावे, अभ्यासयोग, पुरुषाची सिद्धीकडे वाटचाल, स्वसंवेद्य गुरू, शास्त्र व शास्त्रींची नितांत गरज, सत्पथावर देवशोधन, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अलक्ष्मी ब्रह्म लक्षी येते.

दिव्य देहधारी ज्ञानी पुरुष, शरीरात असून शरीररहित, गुरुची अहैतुकी कृपा, जीवन्मुक्त, सांगून रूपातून परमेश्वराचे कार्य, अखंड सावधानता, आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ, गूढ कर्मगती, भाग्यवतीकडे वाटचाल, दिव्य पुरुषाची दयाळू वृत्ती, सांत असूनही अनंताकडे, प्राप्तव्य लक्षी ठेऊन संगत्याग, भागवत साहाय्याशिवाय पारंगती अशक्य, सगुणाचेनि योगे, निर्गुण पाविजे निर्धारे आणि संसारी वासनाच मुक्ती बनते अशा एकूण ३९ विषयांना हात घालत प्रबोधनपर लेखन त्यांनी केले आहे.कार्यश्रम व्यवस्थेने केलेली रचना ही आश्रमात्मक अवस्था समजली जाते. ज्यांना मुक्ती हवीच आहे, त्यांनी ऋषिमुनी, सज्जनांनी पुरस्कारलेला शास्त्रसंमत मार्गच स्वीकारावा. भक्त जेव्हा पुरुषोत्तमाशी ऐक्य पावतो, त्याचवेळी तो मूळ स्वरुपस्थितीला येतो, हेच सत्य आहे. प्रमोद जोशी म्हणतात, “मनुष्याचा पूर्वायुष्यात जरी असंख्य पापं घडली असली, तरी गुरूंच्या आश्रयात शुद्ध पवित्र कर्म, भक्ती, ज्ञानोपासनेच्या अभ्यासयोगाने तीही सर्व नाहीशी होतात. एवढा विलक्षण, आश्चर्यवत परिणाम अभ्यासाने घडतो. ज्याला अखंड संसारचक्रातून सुटायचे आहे, त्याच्यापुढे एकाच उपाय आहे, तो म्हणजे प्राय संसाराविषयीची व्रक्ती ठेवून क्रमाक्रमाने संसार क्षीण करीत जाणे होय.”

पुस्तकाचे नाव : अष्टदल स्तोत्रावली, प्रवचनातून संतांचा आनंदपथ

लेखक : प्रमोद जोशी

प्रकाशक : अभंग ग्रंथदालन



 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.