मराठी क्रीडापत्रकारितेचा जनक हरपला

    06-Mar-2023
Total Views | 170




मुंबई : (V.V. Karmarkar)
: महाराष्ट्राच्या मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवार, दि. ६ मार्च रोजी निधन झाले. मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वि. वि. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये, तर अर्थशास्त्रात एम.ए.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले.




आपल्या कारकिर्दीची सुरुवात करमरकर यांनी नाशिकचे रसरंग साप्ताहिकातून केली. दैनिक लोकमित्रमधून मुंबईत पदार्पण केले. १९९२ मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. त्यानंतर खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन आदींनी मराठी वाचक जोडला जाऊ लागला. सर्वच दैनिकांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.



दिल्लीमध्ये १९८२ च्या झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बांधकामात सुमारे १०० मजूर मृत्युमुखी पडले होते. त्यांनी त्याची कैफियत ‘रक्तरंजित’ मधून मांडली होती. क्रीडा संकुलांची उभारणी त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांना वाचा फोडली होती. तत्कालीन सरकारवरही त्यांनी आसूड ओढले होते. करमरकर मुळचे नाशिकचे वडील पेशाने डॉक्टर. आपल्या मुलानेही डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण MA करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली.







त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली. मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, "दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले.त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!."



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121