नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केली. आर्य वोहरा असे लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आर्य वोहराने मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर लघुशंका केली आहे. या प्रकरणावर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डीसीपींनी सांगितले की, अमेरिकन एअरलाइन्सकडून एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर लघुशंका केल्याची तक्रार आली होती. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच आरोपीला CISF ने पकडून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.
दिल्ली विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, आरोपी आर्य वोहराला माहित आहे की या घटनेमुळे त्याच्या करिअरवर परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याने पीडित प्रवासी आणि क्रू मेंबरची माफी मागितली आहे. विमान कंपनीने दिल्ली विमानतळाच्या हवाई वाहतूक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे.
भारताच्या विमान वाहतूक नियमांनुसार, जर कोणी प्रवासी असे कृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच त्याच्या गुन्ह्याच्या आधारावर ठराविक वेळ विमानात बसण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.या संपुर्ण प्रकारणावर दिल्ली पोलीस म्हणाले की, “या घटनेबाबत आम्ही एअरलाइन कंपनी (अमेरिकन एअरलाइन्स) च्या संपर्कात आहोत. त्रासलेल्या प्रवाशाला आपले नाव सार्वजनिक करायचे नाही किंवा तक्रारही करायची नाही.”, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
मध्यांतरी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी, शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. तसेच ३० जानेवारी रोजी UK२५६ हे विमान अबुधाबीहून मुंबईला येत होते. यादरम्यान एका मद्यधुंद महिला प्रवाशाने क्रू मेंबरवर हल्ला करून थुंकल्याची घटना समोर आली होती.