मुंबई : विद्यार्थ्यांना वाढत अभ्यासक्रम आणि वह्या पुस्तकांमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या होत्या. पालकांकडूनही विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि इतर बाबींचे देत त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करावेत अशी विनंती अनेकदा राज्य सरकार आणि प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या संदर्भात विधायक पाऊल उचलले असून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके करण्याच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ३ री ते इयत्ता १० वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्याची पाने समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाकडून जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार, ''राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वयांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार असून या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता या घटकांच्या शेवटी वहीची एक ते दोन पान जोडण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाठपुस्तकाच्या मागे जोडण्यात येणाऱ्या पानांवर विद्यार्थ्यांनी वर्ग कार्यांमध्ये अध्यापन सुरु असताना महत्त्वाच्या मुद्द्याच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. या बरोबरच महत्त्वाचे शब्दार्थ - सूत्र, महत्वाची संबोधने आणि महत्त्वाची वाक्य इत्यादींचा समावेश असावा असे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकांमधील ही पाने ''माझी नोंद'' या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयावर पालकांनीही समाधान व्यक्त केले असून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिक्षक संघटनांकडूनही सकारात्मक प्रतिसाद
सरकारने विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि स्वागतार्ह आहे. विविध विषयांच्या पुस्तकांसोबत त्याच्या वह्या, स्वाध्याय पुस्तिका, गृहपाठाच्या वह्या असा मोठा बोजा विद्यार्थ्यांच्या पाठीवर वर्षानुवर्षे ठेवण्यात आला होता. त्याला पर्याय म्हणून सरकारने पुस्तकांच्या मागेच वह्यांची पाने जोडून त्या कोवळ्या जीवावर होणारा ओझ्याचा भार हलका केला आहे. विद्यार्थ्यांप्रती सरकारने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचे शिक्षक संघटनेचा पदाधिकारी म्हणून या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करत आहे.
- अनिल बोरनारे, सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी
निर्णयात स्पष्टता येणे आवश्यक
सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर हा निर्णय घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. परंतु, हा निर्णय घेताना सरकारने कुणाशी चर्चा करून हे निश्चित केले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर पुस्तकांच्या मागेच विद्यार्थ्यांना लिहायचे असेल तर मग जेव्हा विद्यार्थी आपला गृहपाठ शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवतील तेव्हा ती पुस्तके विद्यार्थ्यांकडे राहणार की शिक्षक आपल्याकडे ठेवून घेणार यावर काहीसा संशय पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सरकारने या निर्णयाबाबत स्पष्टता करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेले संशयाचे धुके साफ होण्यास मदत होईल.
- सुशील शेजुळे, समन्वयक,
मराठी अभ्यास केंद्र संलग्न
मराठी शाळा संस्थाचालक संघ, महाराष्ट्र