श्रीमलंग जागरण धर्मसभा, आदेश! आदेश! आदेश!

    04-Mar-2023   
Total Views |
Shrimalang Jagran Dharmasabha


रविवार, दि. ५ मार्च रोजी सकल हिूंद समाज श्रीमलंग जागरण धर्मसभा नेवाळीपाडा, कल्याण येथे होत आहे. श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या ४० गावांतले हजारो श्रद्धाळू या सभेत सहभागी होत आहेत. प.पु. श्री नरेंद्रचार्यजी महाराज, आ. श्री राजा सिंह ठाकूर आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वशंज ह.भ.प. शिरीषजी महाराज मोरे या धर्मसभेला आशीर्वचन देणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमलंग जागरण धर्मसभा का? याचा मागोवा घेणारा हा लेख...

 
”ताई, तुम्ही आलात, ठीक आहे धर्मसभेवर लेख लिहाल तेही ठीक. पण, त्यामध्ये ‘श्रीमलंगगड’ असाच उल्लेख करा ‘हाजीमलंग’ नको.” समोर उभे असलेले ते ३० ते ४० तरुण सांगत होते. हिंदू समाज श्रीमलंग जागरण धर्मसभेची पूर्वतयारी करण्यासाठी नेवाळीपाड्याच्या सभास्थानी हे सर्व तरुण उपस्थित होते. त्या सर्वांच्या चेहर्‍यावर जे निर्भय भाव होते, ते अविस्मरणीय! कुठून आली ही निडरता, हा उत्साह? तर त्यांचे म्हणणे ”कुठून म्हणजे धर्मातून, नाथपंथाचे पावन स्थान श्री मलंगगड आहे. त्याला कुणीतरी उठून दर्गा म्हणतो, तिथे वहिवाटीपासून चाललेली पूजा प्रथा अव्हेरली जाते. हा धर्म आणि धार्मिक स्थानावरचा अन्याय का सहन करायचा? आमच्या धार्मिक स्थानाला ‘हाजीमलंग दर्गा’ का म्हणतात? आमच्या श्रद्धा-भावना यांचा काही विचार होतच नाही. आमच्या आस्थेचीप्रतीक श्रद्धास्थान यावर किती काळ आक्रमण होत राहणार आणि ती आम्ही मुकाट सोसत राहणार?” या किशोरवयीन मुलांना आणि तरुणांना श्रीमलंगगडाचा पूर्ण ऐतिहासिक आणि धार्मिक लेखाजोखा माहीत होता. याच तरुणांमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य शाम पाटीलही होते. या धर्मसभेच्या प्रयोजनाबात त्यांना विचारले. ते म्हणाले, ”२०२१ साली महाविकास आघाडीचे सरकार होते. श्रीमलंगगडाला मुस्लीम स्थान ठरवण्याचा प्रयत्न करणारी चौकडी आणि त्यावेळचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे सौख्य आहे, असे सगळीकडे म्हटले जायचे.


२०२१ साली पौर्णिमेला श्रीमलंगगडावर गावातले तरुण नेहमीप्रमाणे रितीरिवाजानुसार, पूजाआरती करायला गडावर गेले. कोरोना असल्यामुळे पूजास्थळी पाच जणांनाच आत सोडायचे. पाच-सहा लोक आरती करत असताना ६० ते ७० जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी ‘नारे ए तदबिर’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. श्रीमलंगगडावर पूजा करू नये, यासाठी त्यांनी ही दहशत माजवली होती. त्यानंतर काय झाले ते सगळ्यांनाच माहिती आहे. पूजास्थानी दंगा करू इच्छिणार्‍या त्या जमावावर कारवाई झाली का? माहिती नाही. मात्र, गावातल्या अरुण साळवी, गणेश फुलोरे, रमेश पाटील, अजय भंडारी, देविदास परब, शिवनाथ गायकर या सहा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी चार जणांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली. हे सहा जण काही गुन्हेगार नव्हते. पूजा-आरती करणे हा गुन्हा आहे का? तेव्हाच आम्ही पंचक्रोशीतल्या गावकर्‍यांनी ठरवले होते की, बस झाला हा अन्याय. या धर्मअन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. तेव्हापासून या धर्मसभेची तयारी करत आहोत.”तर धर्मसभा आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेले पराग तेली म्हणाले, ”श्रीमलंगगड हा इथल्या पंचक्रोशीतला दशकोन दशकाचा ज्वलंत विषय आहे. या संदर्भातील कितीतरी दावे न्यायालयात प्रबंबित आहेत. या धर्मसभेत आमची मागणी आहे की, या दाव्यांचा निकाल पुरावे आणि तथ्य समजून तत्काळ व्हावा. जर न्यायालयीन कामात दीर्घकाळ लागत असेल, तर तोपर्यंत श्रीमलंगगडावर प्रशासकीय नियंत्रण यंत्रणा नियुक्त करावी. कारण, श्री मलंगगडावर सध्या छुप्या समाजकंटकांद्वारे अनेक समाजविरोधक काम होत आहेत. श्रीमलंगगडाला तीर्थस्थान घोषित करावे,” अशीही आमची मागणी आहे.


Shrimalang Jagran Dharmasabha


ज्यांना धर्मवीर आनंद दिघे यांचे धार्मिक सल्लागार मानले जायचे, ते दिनेश देशमुख यांच्याशी बोलल्यानंतर श्रीमलंगगड मुक्तीचे आंदोलन विस्तृतपणे समोर आले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असलेले दिनेश. ८०च्या दशकापासून श्रीमलंगगड मुक्ती आंदोलनात तन-मन-धन अर्पून सक्रिय आहेत. नाथपंथी मोहनबाबा यांच्या अनुभूती आणि धार्मिक अधिष्ठानयुक्त वास्तव ज्ञानाच्या आधारे श्रीमलंगगड हिंदूंचे देवस्थान कसे? याबाबत दिनेश पुराव्यासहित सांगतात की, ”आम्ही म्हणतो श्रीमलंगगड हे नाथांचे समाधीस्थान आहे, तर प्रतिवादी म्हणतात की, ते दर्गा आहे. पण, दर्गा आणि समाधीमधल्या वास्तू आणि परंपरेचा फरक असतो. समाधी दक्षिण- उत्तर, तर दर्गा पूर्व-पश्चिम असतो, समाधीचे सर्व विधी ब्रह्ममुहूर्तावर होतात, तर दर्ग्याचे सर्व विधी संध्याकाळी होतात, समाधीस गंधलेपन होते, तर दर्ग्याचे चारही बाजूस चंदनाचा भुगा फेरतात. श्रीमलंग स्थानाचे सर्व विधी समाधी संस्कारांनुसार होतात. उत्सवाच्या वेळेचे पूजाविधी पाहा. सोवळ्यात साखर भाताचा नैवेद्य दाखवतात. पीरीचे वेळी फकीर कपाळी भस्म धारण करतो, समाधीस्थानी नगारा-पुंगी वाजवली जाते, पालखी निघते. पालखी सोहळ्यात छत्र चामरे व कणकीचे दिवे मिरवले जातात, पालखी तळोजाचे हिंदू भोई उचलतात. मुख्य दिवशी ब्रह्म मुहूर्तावर समाधीस गंधलेपन होते. वार्षिक स्नान होते. तसेच मुख्य उत्सव हिंदूंच्या माघी महिन्यात साजरा होतो.


दिवाळी, पाडवा, दसरा व हुताशनी पौर्णिमा या दिवशी उपयात्रा होतात. इतकेच काय या श्रीमलंगगडावर हनुमान आणि शंकरासह इतर हिंदू देवतांची मंदिरही आहेत. पण, इथे गडावर पुस्तक विक्रीला ठेवली जातात. त्यामध्ये हाजी पिरच्या कथा लिहिलेल्या आहेत. त्याची आणि त्या राजकन्येची कबर या गडावर आहे, असा सारांश या कथेत असतो. पण, हे खरे की खोटे या भानगडीत न पडता पुस्तकात असे लिहिलेले असते की, या लेखातील माहिती ऐकीव आहे.” दिनेश सांगत होते आणि मला गुगल सर्च करताना श्रीमलंग संदर्भातली माहिती आठवली. त्यामध्ये लिहिले होते की, हाजी अब्दुल रहमान हा हाजीगडाच्या पायथ्याशी आला. त्यावेळी नळराजा राज्य करत होता. त्याची परीक्षा नळराजाने घेतली. राजा त्या परीक्षेने संतुष्ट झाला आणि त्याने आपली मुलगी हाजी अब्दुल रहमानला दिली. याबद्दल दिनेश यांना विचारले, तर ते म्हणाले, ”मुस्लीम धर्माची स्थापना सहाव्या शतकातली, तर नळराजाचा पराभव ६१८ मध्ये झाला. इ.स. ७१८ मध्ये महमद बीन कासीमची पहिली स्वारी हिंदुस्थानावर झाली. महाराष्ट्रात मुसलमानांचा प्रवेश १२व्या शतकातला. मग हाजी अब्दुल रहमान कुठून आणि कसा आला? पेशवेकालीन इतिहासात ‘श्रीमलंग’ असा उल्लेख आहे. तसेच इंग्रजांच्या काळात १९०८ साली कल्याण ते या गडापर्यंत रस्ता बनवण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. त्यावेळी या गडाचा उल्लेख ‘हाजी मलंगगड’ असा नाही, तर ‘बुवा मलंग’ असा आहे.


जर १३व्या शतकात कुणी तरी हाजी गडावर आला असेल, तर मग त्याबाबत १९०८ मध्ये सरकार दरबारी ‘बुवा मलंग’ऐवजी ‘हाजीमलंग’ लिहायला हवे. किती पुरावे आहेत की, हे हिंदू देवस्थान आहे म्हणून.” दिनेश यांच्याशी बोलताना कळले की, १९७९ साली नाथपंथी मोहनबाबाच्या शिष्यांनी ५१ किलोची घंटा श्री मलंगगडासाठी दिली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ती घंटा तिथे बसवण्यात येणार होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते ए आर. अंतुले. प्रशासकीय चक्रे अशी फिरली की पुण्याहून ती घंटा इथे आणण्यासच प्रतिबंध करण्यात आला. पुढे धर्मवीर आनंद दिघे श्रीमलंगगडावर नेहमी यायचे. आनंद दिघे यांनी श्रीमलंगगडावर नाथपंथी दिक्षा घेतली. श्रीमलंगगडाबाबत त्यांच्या धार्मिक भावना खूप तीव्र होत्या. पुढे २००४ साली ‘वक्फ’ बोर्डाने देवस्थानावर हक्क सांगितला. तेव्हा, आनंद दिघे यांचा वारसा चालवत एकनाथ शिंदे यांनी इथे धडक आक्रमक मोर्चा काढला होता. असो. उपस्थित सर्वांशी सवांद साधल्यानंतर त्या सर्वांचे म्हणणे कळले की, ‘लॅण्ड जिहाद’ काय असतो? तसेच टोकाची सहिष्णूता आणि एकांगी सर्वधर्मसमभाव काय असतो? आम्ही अनुभवले. त्यामुळेच धर्मसभेत सहभागी होणार्‍या श्रीमलंग बाबाच्या आम्हा सगळ्या श्रद्धाळूंनी आता ठरवले आहे -हिंदूंची वहिवाट हीच श्रीमलंगगडाच्या मुक्तीची पहाट, आदेश!आदेश! आदेश!
 
श्रीमलंगगडाबाबत दावे आणि प्रतिदावे! मती नक्कीच कुंठित होईल
 
अनेक वर्षे हिंदू आणि मुस्लीम येथे पूजा प्रार्थना करण्यास येत. मात्र, सहिष्णूता, सर्वधर्मसभाव दाखवत गोपाळ केतकर यांनी १९५२ साली संस्था नोंदणी ‘श्री पीर हाजीमलंग साहिब दर्गा’ या नावाने केली. या नेांदणीमध्ये संस्थेला ६० प्रमाणपत्र मिळाले. ऐतिहासिक आणि धार्मिक पुराव्यानुसार हे नाथपंथांचे स्थान होते. मात्र, कालांतराने या ठिकाणी मुसलमानांनी वर्चस्व दाखवणे सुरू केले. त्यामुळे हे हिंदू देवस्थान आहे आणि घोषित व्हावे, यासाठी नाथ सांप्रदायिक प. गुरूवर्य व्यंकटनाथ गुरू मत्स्येंद्रनाथ तथा मोहनबाबा यांनी पुढाकार घेतला. ‘इ ६०’ चे टायटल व विश्वस्त संस्थेला मिळालेले प्रमाणपत्र चुकीचे आहे. यासाठी एम. ए गोखले यांनी ‘इ ६०’च्या नोंदणीऐवजी हे केवळ हिंदूंचे देवस्थान म्हणजे या संस्थेला ‘अ ६०’ द्वारे नोंदणी मिळावी, यासाठी न्यायालयात दावा ठोकला. या दाव्या विरोधात नासिर खान, फाजल खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यांना परत खाली ठाणे न्यायालयात पाठवले. हा खटला न्यायप्रविष्ट असतानाही नासिर खान, फाजल खान यांनी या देवस्थानाची गैरमार्गाने ‘वक्फ’ बोर्डात नोंदणी करून घेतली.


त्या विरोधात मदन बलकवडे यांनी ही नोंदणी चुकीची आहे, म्हणून त्याविरोधात उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका दाखल केली. कारण, श्री मलंगगड काही कोणत्या मुस्लिमाने दान केलेली जागा नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००६ मध्ये ‘वक्फ’ बोर्डाला या नोंदणीसाठी स्थगिती दिली. असे असूनही २००९मध्ये पुन्हा एकदा हे देवस्थान ‘वक्फ’मध्ये रजिस्टर झाले. ‘वक्फ’नेही ते रजिस्टर करून त्याला प्रमाणपत्रही दिले. त्यावर मदन बलकवडे यांनी अवमान याचिका ५०८/२०१५ उच्च न्यायालयात दाखल केली. ती अजून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशा प्रकारे सध्या उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका, १७१८ हा अर्ज आणि ५०८/२०१५ हे तीन दावे प्रलंबित आहेत. तसेच १/१९८२चा खटला ठाणे न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये या देवस्थानावर विश्वस्त नेमण्याची मागणी केली आहे. हा अर्ज सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला आहे. त्या अर्जावर आजवर कोणताही निर्णय झाला नाही.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.