मुंबई : सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका केली हेाती. त्याला कडू यांनी प्रत्युत्तर दिले. "अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने मला मदत केली. माझ्या विरोधात शिवसेनेकडून अनंत गुडे उभे होते, त्यांना १९ हजार मते मिळाली आणि डिपॉझिट जप्त झाले, हे सुषमाताईंना माहिती नाही." असे कडू म्हणाले.
सुरेखा ठाकरे माझ्याविरोधात शिवसेनेकडुन लढल्या, त्यांना ३५०० मतं मिळाली. त्यांचंही डिपॉझिट जप्त केलं. त्यानंतर शिवसेनेकडून लढलेल्या सुनीता फिसके यांचंही डिपॉझिट जप्त केलं. असं असूनही सुषमा अंधारे म्हणतात, बच्चू कडूंना शिवसेनेने मदत केली. शिवसेनेचे उमेदवार उभा करून आम्हाला मदत करता का?" असा उलट सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
तसेच फिनले मिलसंदर्भात बच्चू कडूंनी अंधारे ययांच्यावर निशाणा साधला. फिनले मिलसंदर्भातही सुषमा अंधारे यांचा अभ्यास कमी आहे. फिनले मिलच्या वेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवार यांनी आम्हाला मदत केली होती. स्वतः आर. आर. पाटील हे दिल्लीला आले होते. त्यावेळी शंकरसिंह वाघेला हे वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांना भेटून शिफारसपत्र आणले, त्यावेळी ती मिल सुरू झाली."
"उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी ती मिल बंद पडली. त्यासंदर्भात मी ठाकरेंना भेटलो. केंद्राशी संपर्क साधा. एखाद्या बैठक घ्या, असे मी त्यांना सुचविले होते. मात्र ठाकरे यांनी तसे काहीच केले नाही." असं बच्चू कडू यांनी सांगितले.