साई रिसॉर्ट प्रकरणी परब पुन्हा निशाण्यावर

किरीट सोमय्यांची अनिल परबांवर टीका

    31-Mar-2023
Total Views |
former-cabinet-minister-anil-parab-vs-bjp-leader-kirit-somaiya-on-dapoli-resort


मुंबई
: दापोलीतील साई रिसॉर्ट आणि तेथील अनधिकृत बांधकामावरून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा समोर आले आहेत. सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर नव्याने आरोप केले असून परबांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला आहे.किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणी सध्या अनिल परब यांना न्यायालयीन संरक्षण मिळालेले असून सदरील प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सोमय्यांनी परबांना या प्रकरणावरुन डिवचलं आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, ''अनिल परब यांनी दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड, ना विकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) मध्ये बांधलेले साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. अनिल परब यांनी स्वतःच्या आमदारकीचा, मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्ट पद्धतीने सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोनमध्ये हे रिसॉर्ट बांधले आहे अशी कबुली २० साक्षीदारांनी दिली आहे. या २० साक्षीदारांमध्ये अनिल परबांच्या निकटवर्तीयांसह त्यांचे मित्र, भागीदार, काही सरकारी अधिकारी आणि इतर मंडळींचा समावेश आहे,'' असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

''ईडीने तसेच आयकर खात्याने अनिल परब यांचे हे रिसॉर्ट जप्त केले आहे. आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट व फसवणूक, फ्रॉड, फोर्जरी करून बांधलेला आहे म्हणून हा रिसॉर्ट जप्त केला आहे.'' अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

दहा कोटी कुठून आले ? अनिल परब जवाब दो !

''अनिल परब आणि त्यांच्या सहकार्यांनी या पूर्वी हे मान्य केले होते की साई रिसॉर्टच्या कामासाठी त्यांनी एकूण साडे अकरा कोटींचा खर्च केला होता. मात्र आता ते त्यांच्या विधानावरून मागे हटत आहेत. पूर्वी या सगळ्या गोष्टी मान्य करणारे परब आता तो मी नव्हेच असं म्हणत असून या प्रकरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ५ ते ६ कोटींचा खर्च रिसॉर्टच्या बांधकामासाठी खर्च झाले हे अनिल परब आणि सदानंद कदम यांनी स्वतः मान्य केले असून तपास यंत्रणांना दिलेल्या जबाबाची कॉपी मी माहिती अधिकाऱ्याच्या अंतर्गत मागवलेली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात एकूण साडे अकरा कोटींचा खर्च झाला असून त्यापैकी एक ते दीड कोटी रुपये चेक द्वारे देण्यात आले होते. त्यामुळे रोखीने खर्च करण्यात आलेले दहा कोटी अनिल परबांकडे कुठून आले ? हे पैसे सचिन वाझेंने वसुली करून दिले होते की परिवह खात्यातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करून हा पैसा गोळा केला हे परबांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना दिले आहे.