गुजरात: वडोदरा शहरात गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीत दोन ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पहिली घटना दुपारी फतेपुरा परिसरातील पंजरीगर जवळ घडली, तर दुसरी घटना सायंकाळी जवळच्या कुंभारवाड्यात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहपुरा भागात झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, तर कुंभारवाड्यात रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीत एका महिलेसह काही लोक जखमी झाले आहेत.
पंजरीगर मिरवणूक विश्व हिंदू परिषदेने काढली होती. तर दुसरी मिरवणूक स्थानिक रहिवाशांनी काढली होती.कुंभारवाड्यात दगडफेक करण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा वकील या होत्या. त्या म्हणाल्या, “मिरवणूक शांततेत जात असताना अचानक काही लोकांनी आमच्यावर दगडफेक सुरू केली. काही महिला जखमी झाल्या. काही जखमींनी जवळच्या छतावरून दगडफेक केल्याचे सांगितले." मिरवणूक एका मशिदीजवळ पोहोचली आणि लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी म्हणाले, "वडोदरात रामनवमीच्या मिरवणुकीत फतेहपुरा आणि कुंभारवाडा भागात दगडफेक करण्यात आली. २४ जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे. वडोदरा येथे अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."