जनजागृतीतून गोसेवेचा ‘अभिषेक’

    31-Mar-2023   
Total Views |
Abhishek Mule
 
‘गाईचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत आहे,’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ध्यानी ठेवून गोवंश कसायांना विकला जाऊ नये, यासाठी जनजागृती करणार्‍या अभिषेक मुळे याच्याविषयी...

पुणे शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात १९९६ साली जन्मलेल्या अभिषेक सुनील मुळे याने वयाचे बंधन झुगारत अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. वडील कंपनीत नोकरी करत, तर आई गृहिणी. अभिषेकचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यामंदिरमध्ये झाले. कबड्डीची विशेष आवड असलेल्या अभिषेकने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मोठा मित्रपरिवार, सण-उत्सवांतील सक्रिय सहभाग आणि कबड्डीची विशेष आवड असल्यामुळे साहजिकच त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. गणेशोत्सवात तर दहा दिवस गणपतीच्या मंडपातच त्याचा मुक्काम ठरलेला. दहावीत अभिषेक अनुत्तीर्ण होणार, हा सर्वांचाच अंदाज खोटा ठरवत, तो इयत्ता दहावी उत्तीर्ण झाला. पुढे त्याने मॉडर्न कॉलेजमध्ये कला शाखेला प्रवेश घेतला.

इयत्ता बारावीत सौरभ नामक मित्राकडून मिलिंद एकबोटे करत असलेल्या गोरक्षणाच्या कार्याविषयी माहिती मिळाली आणि तेव्हापासून अभिषेकने एकबोटे यांची भेट घेण्याचा निश्चय केला. दरम्यान, कांजण्या झाल्यामुळे बारावीचे शेवटचे दोन पेपर देता न आल्याने तो बारावीत अनुत्तीर्ण झाला. पुढे गोरक्षक उपेंद्र बलकवडे यांच्याकडे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मिलिंद एकबोटे आले होते. त्यावेळी अभिषेकने त्यांची भेट घेतली. त्यानंतर महाबळेश्वर मंदिरातील कार्यक्रमालाही अभिषेक गेला. त्याठिकाणी ऋत्विक कुलकर्णी यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर अभिषेकला गोरक्षणाविषयीची आवड निर्माण झाली. गाय काय आहे, याविषयी मिलिंद एकबोटे यांनी पाचगणी येथे मार्गदर्शन केल्यानंतर अभिषेकने गोरक्षणासाठी कार्य करण्याचा निश्चय केला. बारावीनंतर तो महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करू लागला.

सर्वप्रथम गोरक्षणासाठी अभिषेक उपेंद्र बलकवडे यांच्यासोबत गेला. यावेळी ९ गोवंशांची सुटका करण्यात यश आले. पुढे तळेगाव-दाभाडे, अहमदनगर, हडपसर, भोर अशा अनेक ठिकाणी गोरक्षणाचे कार्य सुरू झाले. जवळपास एक वर्ष अनुभव घेतल्यानंतर गोरक्षणाचे कार्य आणखी वेगाने सुरू झाले. किकवी बाजार समितीमधील कसायांकडून होणारा व्यावहार थांबविण्यासाठी अभिषेक व सहकार्‍यांनी प्रयत्न केले. गाय कत्तलीसाठी नेताना पकडण्याऐवजी ती विकलीच जाऊ नये, असा विचार करून अभिषेकने गोरक्षणाविषयी जनजागृती करण्यास सुरूवात केली. सर्वप्रथम नवनाथ जागडे यांच्यासोबत तो गेला असता तेव्हा काळी कपिला गाय आठ हजार रूपयांना विकत घेतली. त्यावेळी गाई नेण्यासाठी टेम्पोकरिता मोठा संघर्ष करावा लागला. पुढे अभिषेकने अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या ‘आद्यरक्षक छत्रपती शिवगोरक्षा अभियानां’तर्गत काम करण्यास सुरुवात केली.


वाढदिवसानिमित्त प्रत्येक दिवशी एक रुपया याप्रमाणे ३६५ रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन अभियानांतर्गत केले जाते. यातून संकलित निधीतून कसायांकडे जाणार्‍या गोवंशाला खरेदी केले जाते. गाईची जितकी किंमत कसाई देणार, त्यापेक्षा एक हजार रुपये अधिक किंमत देऊन ती खरेदी केली जाते. त्यानंतर गाईला गोशाळेला सुपूर्द करण्यात येते. त्यामुळे गाय कसायाच्या हाती लागत नाही आणि गाईचे कत्तल होण्यापासूनही संरक्षण करता येते, तेही कुठल्याही तंट्याविना. कत्तलीपासून वाचविण्याबरोबरच गाईचा गोशाळेत सांभाळही होतो. पुण्यातील वेल्हा आणि मुळशी तालुक्यांतील गावखेड्यांसह वस्त्यांमध्ये जाऊन अभिषेक लोकांना जागृत करू लागला. विशेषतः धनगर वस्त्यांमध्ये हे कार्य वेगाने सुरू आहे. ‘आद्यरक्षक छत्रपती शिवगोरक्षा अभियान’ व ‘महाएनजीओ फेडरेशन’च्या सहकार्याने १५० गोवंश कसायांकडे जाण्याआधीच खरेदी करण्यात यश आले.

अभिषेकने ३०हून अधिक गावांमध्ये जाऊन जनजागृती केली असून आजही हे कार्य तो अविरतपणे करत आहे. सुरक्षारक्षकाची नोकरी सांभाळून तो गोरक्षण आणि जनजागृती करतो, यात त्याला पत्नी रोशनी यांचेही सहकार्य मिळते. गोरक्षण कार्यासाठी आर्थिक निधी संकलित करण्यासाठीदेखील अभिषेक मेहनत घेतो. या कार्यामध्ये मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनासह प्रीतम गिते, वेदांग कानडे, विवेक भिडे, अक्षय पवार, उपेंद्र बलकवडे, मंगेश नढे, विनोद जावळकर, सौरभ पाटील यांचे त्याला मोलाचे सहकार्य लाभते. अनेकदा अभिषेकला धमकीवजा फोन आले, परंतु, त्याने त्याची कसलीही तमा न बाळगता आपले कार्य सुरूच ठेवले.

“गाय ही आपली माय असून तिला वाचवणे आपले काम आहे. ज्या गाईचे दूध मी पितो, ती कसायाकडे कत्तलीसाठी जाणे मला आवडत नाही. गोरक्षणाचे कार्य करत असताना त्यातून मला सुख आणि समाधान मिळते. शेवटच्या श्वासापर्यंत गोसेवेसाठीच कार्यरत राहणार,” असे अभिषेक सांगतो.‘गाईचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत आहे,’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ध्यानी ठेवून गोवंश पैशापायी कत्तलीसाठी कसायांना विकला जाऊ नये, यासाठी जनजागृती करणार्‍या अभिषेक सुनील मुळे या गोरक्षकाला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा....





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.