मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून जाणार सुट्टीवर

    30-Mar-2023
Total Views |
mumbai-dabbawala-will-go-on-a-six-day-holiday-from-april-3

मुंबई
: मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले ३ एप्रिलपासून ते ८ एप्रिलपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या सहा दिवसाच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
 
गावाकडून मुंबईत येणारा नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून असतो. पंरतू आता डबेवाले ३ एप्रिलपासून सुट्टीवर जाणार आहेत. मुंबईतील डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावा कडील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ३ ते ८ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. मात्र, या सहा दिवसांच्या सुट्टीत महावीर जयंती, गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले चार दिवस सुट्टी घेणार असून सोमवार, १० एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे.

मात्र या सगळ्यामुळे मुंबईतील नोकरदारांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्याबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ग्राबकाकडे केली आहे.