याचना नहीं, अब रण होगा!

    30-Mar-2023   
Total Views |
Narendra Modi criticizes the opposition party
 
पंतप्रधानांनी अतिशय शांततेत मात्र ठामपणे भाजप विरोधी पक्षांच्या आता कोणत्याही प्रकारच्या आरोपांना जशास तसे प्रकाराने उत्तर देणार असल्याचेही आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे सर्व खासदार, राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनादेखील भाषणातून योग्य तो संदेश पोहोचेल, याची काळजी पंतप्रधानांनी यावेळी घेतली. त्याचप्रमाणे आधुनिकता आणि नावीन्य अशी भाजपची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीयदृष्ट्या अतिशय धामधुमीचे वातावरण आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा पूर्णपणे गदारोळात वाया गेला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द होणार, याची काँग्रेसला पूर्ण कल्पना होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर लोकशाही धोक्यात असल्याचा जुनाच आरोप नव्याने करून काँग्रेसविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. तसा प्रयत्नही काँग्रेसने करून बघितला. मात्र, जनतेचा हवा तेवढा प्रतिसाद लाभलेला नाही. खरे, तर हा मुद्दा काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर तापविता आला असता. मात्र, राहुल गांधी यांनी निलंबित होण्याच्या काही दिवस अगोदरच परदेशात जाऊन केलेल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे जनतेच्या मनात स्पष्ट नाराजी आहे. कारण, राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जनतेला सवय असते.

मात्र, देशविरोधी वक्तव्ये सर्वसामान्य जनतेच्याही पसंतीस पडत नाही. केवळ जनताच नव्हे, तर अन्य विरोधी पक्षांनाही त्यामुळे राहुल गांधी यांचे समर्थन करणे अवघड झाले होते. त्यामुळे काँग्रेसने देशाच्या राजधानीमध्ये राहुल गांधी यांच्या निलंबनाविरोधात केलेल्या आंदोलनांना पक्षकार्यकर्ते वगळता अन्यांचे समर्थन लाभले नाही. मात्र, दाखविण्यासाठी का होईना, विरोधी पक्ष आता एकत्र असल्याचे भासवत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप मुख्यालयाच्या विस्तारित परिसराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणास विशेष महत्त्व प्राप्त होते. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राहुल गांधी अथवा सोनिया गांधी यांचे नाव घेता कठोर टीका केली. ते म्हणाले, “आम्ही जनसंघास चिरडून टाकू, अशी भाषा काँग्रेसचे मोठमोठे नेते करत असत. त्यानंतर भाजपलाही संपविण्याचे प्रयत्न झाले. मलादेखील तुरुंगात टाकण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता,” याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगलप्रकरण खोट्या खटल्यांमध्ये अडकविण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांविषयी पंतप्रधान बोलत होते. या उदाहरणाद्वारे खर्‍या प्रकरणात दोषी ठरून तुरुंंगवास झालेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसला त्यांनी अतिशय स्पष्ट आव्हान दिले आहे.

गुजरात दंगलप्रकरणी आरोप होणार्‍या मोदींना केवळ गुजरातच नव्हे, तर देशभरातील जनतेचा पाठिंबा मिळाला होता. त्या तुलनेत राहुल गांधी यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झालेली नाही, हे व्यवस्थितपणे ओळखून पंतप्रधानांन ही टिप्पणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात अजिबात माघार न घेता, भाजप या मुद्द्यावरून राजकीय लढाई लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनीदेखील कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी यथेच्छ अपशब्द वापरले. मात्र, पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरून काँग्रेसला जनाधार प्राप्त होणार नाही, हे अद्याप त्यांच्या लक्षात आलेले नाही. काँग्रेसने आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्या निलंबनाचा व्यवस्थित उपयोग करण्याचे ठरवले आहे. मात्र, अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करून काहीही हाशिल होणार नाही.


rahul gandhi


दुसरीकडे भाजपतर्फे राहुल गांधी यांच्याविरोधात दररोज एक केंद्रीय मंत्री पत्रकार परिषद घेऊन टीकेची धार वाढवत आहे.याविषयी भाजपच्या संघटनेतील एका वरिष्ठ नेत्याने जे सांगितले ते पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर काँग्रेसने गांधी कुटुंब हे कायद्यापेक्षा मोठा असल्याचा आव आणला. आता हाच आव त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण, गांधी कुटुंबाच्या स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजण्यामुळे जनतेच्या मनात एकप्रकारचा राग निर्माण झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना हुतात्मा बनविण्याचे काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरीही जनता आता त्यास भुलणार नाही आणि दुसरीकडे पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका सुरूच असल्याने जनतेच्या मनातील काँग्रेसची प्रतिमा अधिकाधिकत मलीन होत जाणार, यात शंका नाही.”

राहुल गांधी यांच्या निलंबनाद्वारे विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केले आहे. त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली संसदेत बैठकांचे सत्रही चालविले आहे. राहुल यांच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवालांपासून ममता बॅनर्जींपर्यंत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली, यात शंका नाही. मात्र, या पक्षांनी अशी भूमिका घेतली म्हणजे हे सर्वजण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी करून निवडणूक लढवतील, असे अजिबात नाही. सध्या काँग्रेसला साथ देणारे बहुसंख्य पक्ष हे केवळ ‘टीआरपी’साठी सोबत आहेत. काँग्रेसद्वारे जे थोडेबहुत भाजपविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी थोडी आक्रमकता हे पक्ष दाखवत आहेत. मात्र, ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू होतील, तेव्हा यातील किती पक्ष काँग्रेसचे नेतृत्व मान्य करतील; ही शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. कारण, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खातेही उघडता आले नव्हते.

दुसरीकडे ममता बॅनर्जी, स्टॅलिन, नवीन पटनायक या नेत्यांनी भाजपला आपापल्या राज्यामध्ये यशस्वी आव्हान दिले आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करून आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळू देण्याचा विचार हे पक्ष कधीही करणार नाहीत.त्याचवेळी भाजप मुख्यालयाच्या परिसराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तासाभराच्या भाषणामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपची रणनीती अतिशय आक्रमक राहणार आहे, याची चुणूक दाखवून दिली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचाही अतिशय ठामपणे उल्लेख केला. सध्या काही नेते ‘भ्रष्टाचारी बचाओ’ या अभियानांतर्गत एकत्र येत असल्याचे सांगितले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई होत असल्याने देशातील न्यायव्यवस्थेवर हल्ले होत आहेत, तपास यंत्रणांना लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, सर्वसामान्य जनता भ्रष्टाचारविरोधी कारवाईवर खूश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कालखंडात ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत झालेली कारवाई आणि गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकारच्या काळात झालेल्या कारवाईचा लेखाजोखाच मांडला. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी कारवाई येत्या काळाच अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
पंतप्रधानांनी अतिशय शांततेत मात्र ठामपणे भाजप विरोधी पक्षांच्या आता कोणत्याही प्रकारच्या आरोपांना जशास तसे प्रकाराने उत्तर देणार असल्याचेही आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे सर्व खासदार, राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनादेखील भाषणातून योग्य तो संदेश पोहोचेल, याची काळजी पंतप्रधानांनी यावेळी घेतली. त्याचप्रमाणे आधुनिकता आणि नावीन्य अशी भाजपची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सांगतानाच भाजपच्या कार्यकाळामध्ये देदीप्यमान वारसा आणि प्रगती हे एकत्र वाटचाल करत असल्याचे सांगून हिंदू राष्ट्रवादाचे धोरण अधिक बळकट केले आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.