प्रबोधनातून समाधान शोधणारा धर्मवेडा

    03-Mar-2023
Total Views |
गोरक्षण, लव्ह-जिहाद, धर्मांतरणावर प्रबोधन करण्यासह तरुणांच्या मनात छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पेरणार्‍या समाधान हणमंत राजपुरे याच्याविषयी...
 
 
Hanmant Rajpure
 
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कणूर गावी जन्मलेल्या समाधान हणमंत राजपुरे याचे बालपण हलाखीतच गेले. शेतीला पाणी नसल्याने घरच्या शेतीत पावसाळी पिके घेतली जात किंवा आई-वडील दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत. कणूर जि. प. शाळेत त्याने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बालपणी वडील हणमंत त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गोष्टी व माहिती सांगत. शेतीची विशेष आवड असल्याने तो आई-वडिलांना शेतीत मदत करत असे. रविवारी तो मोलमजुरी करण्यासाठी जात असे. शाळेत बागकाम करणे, झाडांना पाणी देणे ही कामेही तो समाधानाने करत. पुढे द्रविड हायस्कूलमधून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. पहिले चित्र त्याने अफजलखान वधाचे काढले होते.
 
2011 साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने शेतीविषयक शिक्षण घेण्याचे ठरवत रामचंद्र धोंडिबा खंडागळे कृषी महाविद्यालयात पदविकेसाठी प्रवेश घेतला. 11 हजार रूपये एका वर्षाचे शुल्क होते, जी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे भरणे शक्य नव्हते. तेव्हा नाईलाजाने दुभती म्हैस विकून ते शुल्क भरले. पुढे भाऊ मुंबईत नोकरीला लागल्याने नंतर फारशी अडचण आली नाही. डिप्लोमानंतर पुढे एका कंपनीत त्याने नोकरी केली. नोकरीसोबत त्याने कृषी विज्ञानाची आणि बीएचीही पदवी घेतली. आसपासच्या परिसरात ‘दुर्गामाता दौड’, ‘बलिदान मास’ या उपक्रमांविषयीची माहिती त्याच्या कानावर पडत होती. तेव्हा त्यानेही या उपक्रमांमध्ये वेळेनुसार सहभाग घेण्यास सुरुवात केली. गड-किल्ले संवर्धन संस्थेसोबतही तो जोडला गेला. 2016च्या प्रारंभी गाडीवरून प्रवास करताना त्याची संभाजी भिडे गुरूजींसोबत भेट झाली. अनवाणी फिरणारे गुरूजी इतके विरक्त जीवन कसे जगू शकतात, असा प्रश्न समाधानला पडला आणि त्याने त्याचक्षणी चहा पिणे कायमचे सोडून दिले. जे शरीराला हानिकारक आहे, त्या सर्वांचा त्याग करण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. शेतीत दुर्लक्ष होत असल्याने त्याने गावापासून जवळील कंपनीत नोकरी सुरू केली.
 
नोकरीसोबत त्याने दुसर्‍यांकडून पाणी घेऊन त्याच्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. पुढे कणूर गावी ‘श्री शिवप्रतिष्ठान’अंतर्गत त्याने प्रबोधन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पाच ते सहा जणांच्या मदतीने किशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले. गावात त्याने धर्मवीर बलिदान मास, व्यसनाधिनता हटवणे, रक्तदान शिबीर, एक गाव एक शिवजयंती, भारतीय जवानांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. 2017 साली सहकार्‍यांच्या मदतीने गावात वर्गणी काढून रस्त्यालगत 400 नारळाची झाडे लावण्यात आली. आठशेहून अधिक शिवचरित्राचे वाटप करण्याबरोबरच दर रविवारी गावात सायंकाळी 8 ते 9 या वेळेत शिवचरित्राचे पारायण सुरू करण्यात आले. गाईंची कत्तल थांबविण्यासाठी पुढे समाधानने गोरक्षणाचे कार्य हाती घेतले. 25हून अधिक गोवंशाची त्याने सुटका केली, तर प्रबोधन करून 70हून अधिक गोवंश गोशाळेला दिला. कारवाईऐवजी त्याने प्रबोधन आणि मतपरिवर्तन करण्यावर भर देण्याचे ठरवले. त्याने गावोगावी प्रबोधनपर बैठका घेण्यास सुरूवात केली. मध्यंतरी त्याने कृषी सेवा केंद्र सुरू करून व्यावसायातही पाऊल टाकले. त्याचबरोबर 11 मित्रांनी एकमेकांना सहकार्य करून प्रत्येकाला व्यवसाय उभा करून दिला. दुकान बंद केल्यानंतर त्याने बैठका घेण्यास सुरुवात केली. वर्षभरात 150 हून अधिक बैठकांमध्ये तो मार्गदर्शन करतो. गावाच्या जवळील धरणाच्या बाजूला तरुणांसाठी व्यायामाची सुविधा, सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार, दि. 31 डिसेंबर रोजी मसाला दूध वाटप अशा अनेक गोष्टी समाधान पुढाकाराने करू लागला.
 
छत्रपती शिवरायांचा संघर्ष, संभाजी महाराजांचे विचार, एकतेची गरज, ‘लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ अशा अनेक मुद्द्यांवर समाधान प्रबोधन करतो. ‘लव्ह जिहाद’संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वेळ पडल्यास कायदेशीर पावलेही उचलली जातात. सद्य:स्थितीत परिसरात ‘लव्ह जिहाद’ आणि गोवंश कत्तलीला देण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. हिंदू धर्मीयांना धर्मांतरणाचे आमिष दाखवणार्‍यांवरही करडी नजर ठेवली जाते. तरूण स्वतःच्या पायावर उभे राहून धर्मासाठी कार्य कसे करतील, यासाठी समाधान आग्रही आहे. या कार्यात त्याला किशोर भोसले, काशिनाथ शेलार, ओंकार गोळे, विवेक भिडे, आप्पासाहेब मालुसरे, संदीप घोरपडे, विवेक भोसले, संदीप साळुंखे, प्रशांत डोंगरे, निलेश शेवते, मनोज जाधव, अक्षय राजपुरे, सुरज जाधव, दिनेश जाधव यांसह वाई पोलीस ठाण्याचे विशेष सहकार्य लाभते.
 
‘’वाममार्गाला जाणार्‍या व्यक्तीला थांबवून सन्मार्गाला आणणे, घर सुदृढ करून गाव, तालुका बलशाली करणे यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोणतेही कार्य करताना यश-अपयशाची पर्वा न करता ते करावे. ते करताना जिद्द, चिकाटी असावी,” असे समाधान सांगतो. गोरक्षण, लव्ह-जिहाद, धर्मांतरण यांवर प्रबोधनासह तरुणांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार रूजवणार्‍या आणि पेरणार्‍या समाधानला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.