राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता फक्त फडणवीसांमध्येच - भास्कर जाधव

    03-Mar-2023
Total Views |
Bhaskar Jadhav on Devendra Fadnavis
राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता फक्त फडणवीसांमध्येच - भास्कर जाधव

मुंबई : सत्तांतर आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्षानंतर ठाकरे गटाकडे काही मोजकेच आक्रमक चेहरे शिल्लक राहिले आहेत. त्यात प्रामुख्याने चर्चेत राहणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गुरुवारी केलेल्या विधानांमुळे जाधवांची पाऊलेही युतीकडे पडायला सुरुवात झाली आहे का ? या चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना भास्कर जाधव यांनी फडणवीसांची स्तुती केली असून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे, अशी स्तुतीसुमने भास्कर जाधवांनी उधळली आहेत. जाधवांनी केलेल्या या विधानांमुळे त्यांचीही पाऊले शिवसेनेकडे पडत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजपची नेतेमंडळी आणि भास्कर जाधव यांच्यात उभा राजकीय संघर्ष पेटल्याचे दिसून आलेले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह इतर काही भाजप नेत्यांशी भास्कर जाधवांचा उभा संघर्ष झाल्याच्या घटना नजीकच्या कालावधीत घडल्या होत्या. नुकताच त्यांचा मोहित कंबोज यांच्याशी देखील संघर्ष झालं होता. जाधव हे गुवाहाटीला जाण्यासाठी उत्सुक होते पण शिंदेंनी त्यांना येऊ दिले नाही असा दावा मोहित कंबोज यांनी केला होता. त्यावर जाधव यांनीही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिल्याने हा विषय पेटण्याची चिन्ह दिसू लागली होती. परंतु, जाधव यांनी अचानक फडणवीसांची स्तुती केल्याने आता जाधवांच्या मनात नक्की चाललंय काय असा सवाल विचारला जात आहे.
जाधवांकडून निवृत्तीचे संकेत
गुरुवारी केलेल्या भाषणात भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. ''मागच्या वेळीच मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पवारांनी सांगितल्यामुळे मी त्यांचा शब्द मोडू शकलो नाही आणि मला विधानसभा लढवावी लागली होती. आजवर मला ५ ते ६ वेळा जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आहे. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत मी उभा राहील की नाही याबाबत स्पष्टता नाही,'' असे म्हणत भास्कर जाधव यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
मुलाला राजकारणात टिकवण्यासाठी जाधवांचे प्रयत्न
निवृत्तीविषयी बोलताना जाधवांनी आपल्या मुलाला राजकारणात टिकवण्याचाही प्रयत्न करत असल्याचे बोलून दाखवले आहे. आपण निवडणुकीत असू कि नाही मात्र पवारांनी माझ्यासह माझ्या मुलाला देखील निवडणुकीचे तिकीट दिले होते. आता मी असेल की नाही असे म्हणत त्यांनी मुलाला राजकारणात टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे अप्रत्यक्षरीत्या का होईना पण सूचित केले आहे.
वेगळा निर्णय घेण्याची शक्यता चर्चेला उधाण
शिवसेनेतून राष्ट्रवादी आणि मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेत म्हणावा तसा मान सन्मान मिळाला नाही. अडीच वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळात भास्कररावांना तालिका अध्यक्ष पदाच्या पलीकडे काहीही हाती लागले नाही. मंत्रिपदाची अपेक्षा ठेऊन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सेनेचा भगवा हाती घेतलेल्या जाधवांच्या हाती तेल तूप तर सोडाच पण साधे धुपाटणे देखील आले नव्हते. पक्षात बंड होऊनही भास्कररावांना कुठलीही विशेष जबाबदारी देण्याचे कष्ट ठाकरेंकडून घेण्यात आले नाही. सुषमा अंधारे आणि इतर नवख्या मंडळींना तुलनेने अधिक प्रमाणात दिलेले स्वातंत्र्य यामुळे जाधव नाराज असल्याच्या चर्चाही अनेकदा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे आता जाधव कदाचित शिवसेना किंवा भाजपची वाट धरून वेगळा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.