हडपसर : पुण्यातील हडपसर भागात दि .२७ मार्च रोजी आईनं चार वर्षीय पोटच्या पोरीची चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर असे मृत झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. या संबंधी त्या मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सिद्धिविनायक दुर्वांकूर सोसायटी, ससाणे नगरमध्ये रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या चार वर्षीय मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. २७ मार्च रोजी आरोपी महिला कल्पना वाडेर ही ते भाड्याचे घर खाली करणार होती. यासाठी घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. काहीवेळाने जेव्हा घरमालक आणि शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा चार वर्षीय चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर रहिवाश्यांनी तात्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.
त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. तर आरोपी महिला कल्पना वाडेर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. या महिलेने नेमकं कोणत्या उद्देशाने हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हडपसर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.