सकारात्मक बदलासाठी ‘ऊर्जा फाऊंडेशन’चा खारीचा वाटा

    28-Mar-2023   
Total Views |
Urja Foundation

कल्याण-डोंबिवली शहरात कचरा, प्लास्टिक यांसारख्या अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या दिसून येतात. त्यासाठी महापालिका आपल्या परीने काम करीत आहे. मात्र, त्यांच्या या कामात ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने ही खारीचा वाटा उचललेला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणत, नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी फाऊंडेशन काम करीत आहे. त्यांच्या या कामाचा घेतलेला हा आढावा...

’ऊर्जा फाऊंडेशन’ ही एक नोंदणीकृत सामाजिक सेवाभावी संस्था आहे. या फाऊंडेशनची स्थापना समविचारी महिलांच्या गटाने दि. ३ जुलै, २०१५ रोजी केली आहे. यामध्ये कार्यरत, व्यावसायिक, गृहिणी यांचा समावेश आहे. नियोजित उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे, लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे, हे ‘ऊर्जा फाऊंडेशन’चे उद्दिष्ट आहे. ‘ऊर्जा’ या नावातच स्पंदने येतात. आम्ही सर्वजण एकत्र येऊन समाजात बदल घडवू शकतो, हा विश्वास संस्थेतील पदाधिकार्‍यांना आहे. ’ऊर्जा फाऊंडेशन’ने स्थापनेपासून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मोहिमा सुरू केल्या आहेत. फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट हे शिक्षण आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी ‘ज्ञानदान प्रकल्प’ सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत गरजू मुलांना किमान त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. ही मदत सामान्यत: पाठ्यपुस्तके, मार्गदर्शक, संदर्भ पुस्तके, प्रश्नसंच, होलोग्राम, बारकोड, उत्तरपत्रिका, वैज्ञानिक उपकरणे आणि इतर स्टेशनरी साहित्य यासारख्या स्टेशनरीच्या मूलभूत ‘शिक्षण किट’च्या स्वरूपात असते. या उपक्रमांतर्गत ज्या शाळांना मदत केली जाते, त्यामध्ये बहुतांशी उपनगरातील वाडा आणि पालघर जिल्ह्यातील आहेत.

ज्या शाळांना राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. त्या शाळांना वार्षिक शुल्क भरण्यासाठी मदत केली जाते. याशिवाय शालेय गणवेश, स्कूल बॅग, पुस्तके, वह्या, स्टेशनरी, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी यांसारख्या विविध प्रवाहात पदवी प्राप्त करण्यासाठी शुल्काच्या काही भागांच्या स्वरूपात मदतदेखील दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांचे पालक समाजातील निम्न उत्पन्न गटातील आहेत, त्यांच्यासाठी ही मदत असते.‘ऊर्जा फाऊंडेशन’च्या माध्यमातून एक जबाबदार नागरिक या नात्याने विविध पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा सुरू केल्या आहेत. ‘झाडे लावा-पृथ्वी वाचवा’, ‘पाणी वाचवा’, ‘कमीत कमी प्लास्टिकचा वापर करा’ आणि शक्य असेल तिथे प्लास्टिकचा वापर टाळा, अशा मोहिमा फाऊंडेशनकडून राबविल्या जात आहेत. फाऊंडेशन रोपे लावण्यावर विशेष भर देते, ज्यामुळे नागरिकांनादेखील झाडे लावण्यास प्रोत्साहन मिळते. दरवर्षी कमी होणार्‍या पर्जन्यमान हा एक चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळे पाण्याच्या संवर्धनाबाबतदेखील जनजागृती केली जात आहे. फाऊंडेशनचा दृष्टिकोन हा सहयोगी आहे. वेगवेगळ्या सामाजिक कारणांसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत फाऊंडेशन काम करीत आहे.


Urja Foundation

‘ऊर्जा फाऊंडेशन’ प्लास्टिक संकलन मोहिमेमध्ये नागरिकांकडून ई-कचरा, जुने कपडे, शूज, पिशव्या, चप्पल गोळा करीत असतात. कपडे आणि वेगवेगळ्या वस्तू सामाजिक संस्थांमार्फत ‘रिसायकल’ किंवा गरजूंना वापरण्यासाठी पाठवून दिल्या जातात. ‘माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी’ ही मोहीमदेखील फाऊंडेशनतर्फे चालविली जात आहे. प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य बनला आहे. मनुष्य सकाळी उठल्यापासूनच अनेक प्लास्टिकच्या गोष्टींचा वापर करीत असतो. मग त्यात टूथब्रश, टूथपेस्ट, बिस्किटे आणि इतर अनेक वस्तूंचे ‘रॅपर’ जे प्लास्टिकचे बनलेले असतात, त्यांचा समावेश असतो. या वस्तूंचा वापर करून झाल्यानंतर त्या कचराकुंडीत फेकल्या जातात. या प्लास्टिकच्या वस्तू कचर्‍यात फेकून देऊन आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊन ती महापालिकेच्या ताब्यात देतो. हा कचरा पुढे काय करू शकतो, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, याकडे आपण दुर्लक्ष करतो. हा कचरा मानवासाठी, नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वन्यजीवांसाठी कसा घातक ठरू शकतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे ‘ऊर्जा फाऊंडेशन’च्या सदस्यांचे मत आहे.

दि. ३ जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवसापासून प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले. ही बाब नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. दि. २६ जानेवारी, २०१६ रोजी प्रथमच ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने अनेक नागरिकांसह स्थानिक भाजी मंडईत बॅनर आणि पोस्टर्सच्या साहाय्याने पर्यावरण स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेतली. भाजीपाला प्लास्टिक पिशवीत घेणे बंद करण्यासाठी नागरिकांशी संवाद साधला. प्लास्टिक पिशव्या बंद करून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने कापडी पिशव्यांचे वाटप केले. ‘माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत फाऊंडेशनने शाळा, महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये जाऊन प्लास्टिकचा वापर आणि त्याचा पुनर्वापर यांच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाते. लोकांना प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून तो ‘ऊर्जा फाऊंडेशन’ला देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या माध्यमातून फाऊंडेशनने १५० टन प्लास्टिक कचरा ’डम्पिंग ग्राऊंड’मधून वाचवला आहे. या उपक्रमाला इतर संस्थांचे सदस्य व नागरिकांनी ही चांगला प्रतिसाद दिला. ही मोहीम स्थानिक आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये आणि दुकानांमध्ये सातत्याने सुरू ठेवली आहे. त्यासाठी फाऊंडेशनने पर्यावरणपूरक संदेशांसह चित्रित स्टॅण्डीज् तयार केल्या. डोंबिवली आणि ठाण्यातील स्थानिक बाजारपेठेतील भाजीपाला, फळांच्या स्टॉलवर ‘व्हेज’च्या मदतीने ते प्रदर्शित केले. फळविक्रेते यावर काम करताना पर्याय शोधणे महत्त्वाचे असल्याचे जाणवले.


Urja Foundation


प्लास्टिकच्या कचर्‍यापासून ‘पॉलिफ्युएल’ बनवता येत असल्याचे फाऊंडेशनच्या कानावर पडले होते. हे काम करणारी कंपनी शोधत असताना ’रूद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन, जेजुरी’ यांच्यासोबत भेट झाली. ही कंपनी प्लास्टिक कचर्‍याचे ‘पॉलिफ्युएल’मध्ये कार्यक्षमतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर करतात. त्यांचा कडोंमपा सोबत सामंजस्य करार ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने घडवून आणला. प्लास्टिक आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ऊर्जा फाऊंडेशन’चे सदस्य शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सोसायटी आणि कॉर्पोरेटमधील नागरिकांसाठी सादरीकरण आणि जनजागृती कार्यक्रम घेत असतात. फाऊंडेशनला डोंबिवली शहरात कडोंमपाने संकलन मोहीम राबवण्यासाठी जागा दिली आहे. डोंबिवली आणि ठाणे येथे डिसेंबर २०१६ पासून ही संकलन मोहीम आणि जनजागृती सत्रे सातत्याने सुरू आहेत. या शहरांमध्ये आणि आसपासच्या उपनगरातील नागरिकांकडून ही प्लास्टिकचा कचरा मिळत असतो. ग्रॅण्टरोड, अंधेरी, मालाड, शहाड, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या दूरच्या ठिकाणांहून येणार्‍या प्रतिसादामुळे आपली शहरे प्लास्टिक कचरामुक्त करण्याचा फाऊंडेशनचा संकल्प वृद्धिंगत झाला आहे. त्यासाठी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, स्वयंसेवक आणि इतर अनेक सामाजिक संस्थांकडून ही मदत मिळत आहे.

साधारण दर ४० ते ४५ दिवसांनी किमान एक प्लास्टिक संकलन मोहीम राबविली जाते. प्लास्टिक वापर जनजागृतीसाठी फाऊंडेशनचे कार्य सुरूच राहणार आहे. प्लास्टिकच्या अतिवापराचे धोके आणि ५० -मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी हानीकारक आहेत. आतापर्यंत ५१ अभियानांतून १५० टनवर प्लास्टिक कचरा भूगर्भात जाण्यापासून वाचविले आहे. त्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने विघटन करीत आहेत. येत्या दि. २ एप्रिलला फाऊंडेशनचा ५२ वा ड्राईव्ह आहे. सणासुदीच्या काळात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकातील महिलांसाठी स्वयंरोजगाराचे मार्ग निर्माण करण्याचे काम फाऊंडेशन करीत असते. त्यांच्या इको-फ्रेंडली ‘ग्रो ग्रीन’ प्रकल्पांतर्गत महिलांनी बनविलेल्या कापडी पिशव्या मिळतात. या पिशव्या विकून त्यांच्या कुटुंबासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी उत्पन्न मिळविण्यासाठी मदत होत आहे. ‘इको-फ्रेंडली सॅनिटरी पॅड्स स्मार्ट डॉट प्रोजेक्ट’मधून नियमित पुरवठा केला जातो. त्याचे ‘डिस्पोझेबल इको फ्रेंडली’ पद्धतीने कसे करावे, हे समजविण्याचे कामही केले जाते. महिलाआरोग्य विषयावर जनजागृती केली जाते. ‘ऊर्जा फाऊंडेशन’ विविध स्तरांतील महिलांना आर्थिक साक्षरतेबद्दल शिक्षित आणि जागरूकता निर्माण करणे, हा मानस ठेवला आहे. भविष्यातील पिढीला आर्थिक नियोजनाविषयी शिक्षित करण्याची नितांत गरज आहे, असेही फाऊंडेशनला वाटते.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.