नवी दिल्ली : वाराणसी न्यायालयात प्रलंबित असलेल्या ज्ञानवापी - काशी विश्वनाथ वादाशी संबंधित सर्व खटल्यांवर एकत्र सुनाणवीसाठी हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २१ एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे.
ज्ञानवापी – काशी विश्वनाथ प्रकरणात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीच्या सुनावणीसाठी मंगळवारी या प्रकरणाचा उल्लेख केला होता. याप्रकरणी प्रलंबित सर्व खटल्यांविषयी वाराणसी जिल्हा न्यायालय आदेश देत नसल्याचे जैन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर, याप्रकरणी पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होईल असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
मुघल आक्रमक औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिराचा विध्वंस करून त्यावर मशिद उभारली होती. कथित मशिदीच्या आवारमधील श्रृंगारगौरीची नियमित पूजा करण्याचा हक्क द्यावा, यासाठी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने तेथे सर्वेक्षणाचा आदेश दिला होता. सर्वेक्षणात कथित मशिदीतील वजुखान्यामध्ये शिवलिंग असल्याचे आढळून आले होते. मात्र, ते पाण्याचे कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षाने केला होता.