पुणे : राजगुरुनगर शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेला दि.२८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळुन खाक झाले असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे. तसेच काही कागदपत्र पाण्याने भिजून गेली आहे. मात्र अद्याप किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचा तपशिल समजू शकलेला नाही.
आग लागल्याची माहिती राजगुरुनगर पालिकेच्या फायर ब्रिगेडला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजगुरुनगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर एक तासांत नियंत्रण मिळवले. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवीत हानी झाली नाही.