निधी ते प्रतिनिधी...

    28-Mar-2023   
Total Views |
Dr. Nidhee Patwardhan


विविध गुणकौशल्य एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात का? याचं उत्तर म्हणजे डॉ. निधी पटवर्धन. मराठी अध्ययन, अध्यापन ते योगशास्त्र, प्राध्यापक ते अभिनेत्री, निवेदिका, योगशिक्षिका अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाविषयी..
 
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका असणार्‍या डॉ. निधी पटवर्धन या सूत्रसंचालिका, निवेदिका, कलाकार, समाजसेविका, मराठीच्या अभ्यासिका, सुगरण, योगप्रशिक्षिका आणि ‘महाराष्ट्राची सुपरवुमन’ एवढ्या प्रांतांत लिलया स्वच्छंद विहार करतात.रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखसारख्या निसर्गसंपन्न गावात डॉ. निधी यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे बालपण गेले. त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठीमध्ये विशेष श्रेणीमध्ये पूर्ण केले. त्या ‘नेट’ परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाल्या. ‘साठोत्तरी मराठी साहित्यातील व्यक्तिचित्रांची वाड्.मयीन चिकित्सा’ या विषयामध्ये शिस्तबद्धपणे संशोधन करत त्यांनी पीएच.डी पदवी संपादित केली. ज्येष्ठ लेखक माधव कोंडविलकर यांच्या सहवासातील बालपण आणि डॉ. सुरेश जोशी यांचे अतोड अध्यापन, तसेच कलागुण जोपासताना मिळणारे सहकारी यातून निधी खर्‍या अर्थाने घडत गेल्या.

ज्या महाविद्यालयात शिक्षण झाले त्याच महाविद्यालयात अध्यापनाची सुरुवात करून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासारख्या प्रतिथयश महाविद्यालयात त्यांना प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. या संधीचे सोने करत महाविद्यालयाला एका विद्यापीठाच्या दर्जापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य न करता, स्वत: गावात जाऊन, तसेच शासनाच्या सहकार्याने त्यांनी मराठी भाषाप्रचारासाठी कार्य केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘लॅन्ग्वेज अ‍ॅडव्हायझरी कमिटी’मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच, राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शालेयस्तरावर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य केले आहे. शालेय मराठी शब्दकोशांचे महत्त्व त्यांनी ‘शब्दकोश’ म्हणजे काय, हे माहितीच नसलेल्या मुलांना समजावून सांगितले. शालेय स्तरावर मुलांकरिता कार्य करत असतानाच त्या सध्या ‘पीएच.डी’च्या मुलांना मार्गदर्शन करत आहेत. स्वत: अभ्यास करून ‘पीएच.डी’ केल्यामुळे अभ्यासातील सातत्य आणि संशोधनपूर्णता संशोधक मुलांमध्ये रुजवण्याचे कार्य त्या करतात.

मराठी भाषेमध्ये संशोधन करताना त्या केवळ ‘पीएच.डी’वर थांबल्या नाहीत, तर मराठी बोलीभाषांचा, संस्कृतींचा अभ्यास त्या सातत्याने करत राहिल्या. रोमानिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी ‘लिंग्विस्टीक’ या विभागात ‘भाषाविज्ञान शिकताना विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी आणि उपाय’ यावर शोधनिबंध सादर केला. तसेच पुण्यात पार पडलेल्या प्राच्यविद्या परिषदेतही त्यांनी मराठी भाषेवर शोधनिबंध सादर केला होता. या परिषदेत उत्तम शोधनिबंध सादरीकरणाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.आजकाल मुलांना नेमके कुठल्या विषयात संशोधन करायचे, असा प्रश्न पडतो. परंतु, डॉ. निधी या रोजचे व्यवहार, सामाजिक बंध यातून संशोधनाचे विषय निवडतात, हेच खर्‍या संशोधकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. देवरुखमधून रत्नागिरीमध्ये आल्यावर समुद्रीभागातील दाल्दी मुस्लिमांच्या बोलीभाषेचाही त्यांनी अभ्यास केला. आपले विभक्ती प्रत्यय आणि त्यांच्या बोलीभाषेतील प्रत्ययातील फरक निरीक्षणातून ऐकून त्यांनी एक दस्तावेज होईल, असे संशोधन केले.

अध्यापन करताना मुलांची हजेरी घेताना ‘येस म्याडम’ या उच्चारावरून ‘या’ मुलांची संस्कृती वेगळी आहे, हे ताडून या वनवासी मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. खासकरून त्यांची ‘भिलोरी’ बोली शिकण्यासाठी त्या नंदुरबारमध्ये पाड्यात राहिल्या होत्या. तिथे राहून बोलीसोबत त्यांनी सांस्कृतिक अभ्यासही केला. विविध भाषा शिकताना सट्ट्याची भाषा शिकून ‘भाषा आणि जीवन’मध्ये त्यांचा लेखही प्रसिद्ध झाला आहे.एवढेच नाही, तर पाठीशी कोणीही ‘गॉडफादर’ नसताना, त्या ‘महाराष्ट्राच्या सुपरवुमन’ ठरल्या. तसेच ‘झी मराठी’च्या ‘रुचिरा सन्मान’ स्पर्धेत बाजी मारत महाराष्ट्राच्या सुगरण ठरल्या. सांगली येथे झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्यस्पर्धे’तही त्या सहभागी झालेल्या आणि त्यात त्यांना गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळाले होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग निर्मित ‘सोनाटा’ या व्यावसायिक नाटकातही त्यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

आयुष्य एकसुरी ठेवून निरस होतं, असं मानणार्‍या डॉ. निधी आयुष्यात विविध पैलू जगतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य सांगताना ‘योग’ हेच त्यांचं उत्तर असतं. त्यांनी नुकतेच ककासंवि, रामटेक येथून ‘एम. ए योगशास्त्र’ पूर्ण केले. केवळ शिकून न थांबता, त्या योगप्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्या आयुष मंत्रालय प्रमाणित योगशिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेला ‘पिंटी’ हा कथासंग्रह मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे, तर ‘चिंतनफुले’ हा त्यांचा ललितलेख संग्रह प्रसिद्ध झालेला आहे.शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेतील बक्षिसांपासून पुरस्कारांची सुरू झालेली मालिका ‘दांडेकर चषक’, ‘मिस युनिव्हर्सिटी’ करत भारत सरकारच्या ‘नेहरू युवा पुरस्कारा’पर्यंत आलेली आहे.पूर्वाश्रमीच्या योगिता भागवत ते डॉ. निधी पटवर्धन असा झालेला गुणनिधीसमुच्चय प्रवास हा ‘योगनिधी’ अविरत चालावा, यासाठी शुभेच्छा...!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.