स्पेनमधील वाढती मुस्लीम लोकसंख्या आणि वाढती असुरक्षितता...

    27-Mar-2023   
Total Views |
Spain's growing Muslim population and growing insecurity


संपूर्ण युरोपमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे अभ्यासकांना आढळून आले आहे. स्पेनमधील ‘इस्लामिक कमिशन ऑफ स्पेन’च्या सचिवाने, गेल्या ३० वर्षांमध्ये स्पेनमधील मुस्लिमांची संख्या दहा पटींनी वाढली असल्याचा दावा केला आहे. अनधिकृत आकडेवारीनुसार स्पेनमध्ये ३० लाख मुस्लीम राहत आहेत. पण, या वाढत्या मुस्लीम लोकसंख्येबरोबर वाढती असुरक्षिततता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


यापूर्वी स्पेनमध्ये मुस्लिमांकडे केवळ स्थलांतरित म्हणून पाहिले जात होते. पण, आता त्या समाजाने स्पॅनिश नागरिकांमध्ये महत्त्वाची जागा मिळविली आहे. मोरोक्को, पाकिस्तान, बांगलादेश, सेनेगल, अल्जेरिया येथील मुस्लीम स्पेनमध्ये मोठ्या संख्येने आहेत. स्पेनमधील बहुसंख्य मुस्लीम हे त्या देशातील औद्योगिक भागात वास्तव्यास आहेत. कॅटलोनिया, माद्रिद, व्हॅलेन्सिया आदी भागात या मुस्लिमांच्या प्रामुख्याने वस्त्या आहेत. तसेच एकट्या स्पेनमध्ये मुस्लिमांच्या तब्बल ५३ संघटना आहेत. तसेच सुमारे दोन हजार मशिदी त्या देशात आहेत. त्या देशातील मुस्लीम लोकसंख्या वाढत असताना केवळ ४० मुस्लीम दफनभूमी त्या देशात आहेत. युरोपच्या दक्षिण भागात असलेल्या स्पेनमध्ये उत्तर आफ्रिकेमधून मोठ्या प्रमाणात मुस्लीम दाखल होत असल्याने, त्या देशात मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. मुस्लिमांचे स्पेनमध्ये स्थलांतर होत असल्याने आणि त्या समाजाचा जन्मदर जास्त असल्याने, मुस्लीम लोकसंख्या वाढत असल्याचे दिसते. या सर्वांचा युरोपच्या सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक जीवनावर एकूणच विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. केवळ स्पेनमध्येच नव्हे, तर फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, इंग्लंड आदी देशांमध्येही मुस्लीम लोकसंख्येत वाढ झाली आहे. स्थलांतरितांना रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले असले तरी युरोपमध्ये मुस्लीम लोकसंख्या सातत्याने वाढताना दिसते. त्यामुळे मुस्लिमांची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या प्रश्नांना कसे तोंड द्यायचे, ही समस्या भविष्यकाळात युरोपमधील देशांना भेडसावणार आहे.


‘हिंदू राष्ट्र’ लिहिलेले ध्वज लावल्याबद्दल अटक


बिहारमधील लहेरियासराई या गावामध्ये गेल्या २३ मार्च रोजी ‘हिंदू राष्ट्र’ लिहिलेले ध्वज काही ठिकाणी लावल्याबद्दल दरभंगा पोलिसांनी चौघा जणांसह अन्य अज्ञात १०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या प्रकरणी दरभंगा शहरातील विश्व हिंदू परिषदेचे नेते राजीवकुमार मधुकर यांना अटक केली आहे. ‘ऑल इंडिया मुस्लीम बेदारी कारवान’ या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नजरे अलाम याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटक केली. बिहार सरकारने केलेली ही कारवाई मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी केली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेने केली आहे.दरभंगा पोलिसांकडे जो गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री राजीवकुमार मधुकर यांच्यासह अन्य तिघांचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘हिंदू राष्ट्र’ असे लिहिलेले ध्वजरुपी फलक लहेरियासराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौलगंज वसाहतीत लागल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी कारवाई केली.


समाजमाध्यमांवर ‘हिंदू राष्ट्र’ असे लिहिलेले ध्वज झळकल्याचे वृत्त पसरताच ‘ऑल इंडिया मुस्लीम बेदारी कारवान’ संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणविणार्‍या अलाम याने जिल्हा दंडाधिकार्‍यांना पत्र लिहून, या भागातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, हे ध्वज त्वरित काढून टाकावेत, अशी मागणीही केली.दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी केवळ ‘हिंदू राष्ट्र’ लिहिलेले फलक लावल्याबद्दल पोलिसांनी केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. हिंदू समाजाविरूद्ध करण्यात आलेली ही कारवाई निव्वळ मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्याच्या एकमात्र हेतूने करण्यात आली असल्याचेही मिलिंद परांडे यांनी स्पष्ट केले.विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी या घटनेसंदर्भात बोलताना, पोलिसांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची बिहारमधील पाळेमुळे खणून काढण्याऐवजी बिहार सरकारकडून राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना अटक केली जात आहे, असे म्हटले आहे. ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पना राजकीय नाही. ती भू-सांस्कृतिक आहे. त्यामुळे ‘हिंदू राष्ट्र’ हे कोणत्याही धर्माविरूद्ध नाही, हे लक्षात घ्यायला हवे, असे स्पष्ट करून या प्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांविरूद्ध ज्या तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्या त्वरित मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषद करीत आहे, असे मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे.त्याचवेळी राज्यामध्ये शेकडो गोवंशाची हत्या करणार्‍यांविरूद्ध राज्य सरकार तेवढ्याच तत्परतेने कारवाई करणार का, असा प्रश्नही विश्व हिंदू परिषदेने बिहार सरकारला विचारला आहे.

अमृतपालबाबत पंजाब सरकार गंभीर नाही : भाजप नेत्याचा आरोप


स्वयंघोषित खलिस्तानी नेता आणि ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा गेल्या काही दिवसांपासून फरार असून पोलीस त्याचा देशात सर्वत्र शोध घेत आहेत. पण, ज्या पंजाबमधून हा खलिस्तानवादी फरार झाला, त्या राज्याचे पोलीस अमृतपाल सिंगबाबत गंभीर नाहीत, असा आरोप हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केला आहे. पंजाबमधील आम आदमी सरकारला अमृतपाल सिंग यास अटक करावी, असे गांभीर्याने वाटतच नाही, असे हरियाणाच्या या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. अमृतपाल सिंग यास पोलिसांच्या बेपर्वाईमुळे अटक होऊ शकली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अमृतपाल सिंग याचा पोलीस जालंधरमध्ये शोध घेत होते आणि फरार अमृतपाल सिंग शहाबाद येथे आलेल्या नातेवाईकाच्या घरी भोजन करीत होता, अशी माहिती त्यांनी दिली. “आम्ही शहाबाद येथे पोहोचेपर्यंत अमृतपाल तेथून पळून गेला होता,” असे अनिल वीज यांनी सांगितले. अमृतपाल हा शहाबाद येथे असल्याची माहिती आम्ही पंजाब पोलिसांना दिली, पण ही माहिती मिळाल्यानंतर दीड दिवसांनी पोलीस तेथे पोहोचले. यावरून पंजाब पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो. पंजाब पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असे अनिल वीज यांनी सांगितले. पंजाबमधील आम आदमी सरकारने जी ढिलाई दाखविली, त्यामुळे अमृतपालला फरार होण्यास मदत झाली, असे हरियाणाच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.


अमृतपाल सिंगने अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर त्याला लगोलग अटक करणे पंजाब पोलिसांना शक्य होते. पण, पंजाब पोलिसांनी काही कृती केली नाही आणि आता अमृतपाल सिंग पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. खरे म्हणजे अमृतपाल सिंगसारख्या खलिस्तानवाद्याच्या मुसक्या आवळणे पंजाब पोलिसांना सहज शक्य होते. पण, त्या सरकारने तसे काही केले नाही. पंजाब सरकारचे वर्तन असे संशयास्पद का राहिले, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. पंजाबमध्ये पुन्हा अस्थिर वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी असे करणे गरजेचे आहे.

तख्त श्री पटनासाहिब गुरूद्वारा प्रबंधक समितीतर्फे ब्रिटनमधील हल्ल्याचा निषेध


खलिस्तानी अतिरेक्यांकडून ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका या देशातील भारतीय वकिलाती आणि हिंदू मंदिरांवर जाणूनबुजून हल्ले केले जात आहेत. हिंदू आणि शीख समाजात दुही निर्माण करण्याच्या हेतूने हे सर्व चालले आहे. पण, तख्त श्री पटनासाहिब गुरूद्वारा प्रबंधक समितीने खलिस्तानी अतिरेक्यांच्या या कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या पदाधिकार्‍यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून भारतीय वकिलातींवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. पंजाबमध्ये जेव्हा दहशतवादाने उग्र रूप धारण केले होते, त्या काळातही अशा घटना कधी घडल्या नव्हत्या, याकडे या समितीने लक्ष वेधले आहे.
जे अतिरेकी शीख तरुणांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते शीख समाजाची जागतिक पातळीवर जी प्रतिष्ठा आहे त्यास तडा पोहोचवीत आहेत. वकिलाती आणि हिंदू मंदिरांवर हल्ले करून त्यांना कोणता हेतू साध्य करायचा आहे, असा प्रश्नही या समितीने विचारला आहे.
 
स्वयंघोषित खलिस्तानी अमृतपाल सिंग यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर विदेशातील दूतावासांवर हल्ले होण्याच्या, निदर्शने करण्याच्या घटना वाढल्या आहेत. हा योगायोग आहे, असे म्हणता येणार नाही. भारतविरोधी शक्ती अशा हल्ल्यांमागे आहेत हे उघड आहे. श्री पटनासाहिब गुरूद्वारा प्रबंधक समितीने जसा या प्रकारांचा निषेध केला तसाच निषेध सर्वच गुरूद्वारा प्रबंधक समित्यांनी करून या खलिस्तानी दहशतवाद्यांना एकटे पडायला हवे. फुटीर शक्तीचा बीमोड करण्यासाठी सर्व शीख समाजाने आवाज उठवायला हवा.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.