एका फसलेल्या सभेत...

    27-Mar-2023   
Total Views |
Public meeting of Uddhav Thackeray in Malegaon


मालेगावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी जाहीर सभा पार पडली. सभेची चर्चा तशी जोरदार झाली. कारण, मालेगावात मुस्लीमबहुल भागात सभेला आवताण देणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत होते. बॅनर्सही मराठी किंवा हिंदीत नाही, तर चक्क उर्दू भाषेत. त्यावर संजय राऊतांनी उर्दू भाषेचे समर्थन करत, देशात उर्दूला बंदी आहे का, असा प्रश्न केला. तसेच, अनेक लेखक, साहित्यिकांनीही उर्दूत लिखाण केल्याचे त्यांनी सांगितले. मुळात ठाकरे गटाला आता मराठीऐवजी उर्दू किती प्रिय आहे, हे काही वेगळे सांगायला नको. उर्दूत कॅलेंडर, निमंत्रण आणि आता सभेला लोकांना बोलावण्यासाठी उर्दूत बॅनर लावल्याने फार काही वेगळे घडणार नाही. सध्या सुरू असलेल्या रमजान पर्वामध्ये पार पडलेल्या या सभेला नाशिकहून लोकं गाड्यांमध्ये भरून नेल्याच्याही वार्ता समोर आल्या. ज्या अद्वय हिरे यांनी सभेचे आयोजन केले, ते आधी भाजपत होते, हे ठाकरे कदाचित विसरले असावे. अनेक पक्ष फिरून त्यांनी आता ठाकरेंचा झेंडा हाती घेतला. आश्चर्य म्हणजे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवण्याची शपथही त्यांनीच घेतली होती. त्यामुळे आधी धोका देऊन नंतर नशिबाने मिळालेलं मुख्यमंत्रिपद आता पुन्हा मिळेल हे केवळ स्वप्न राहिले आहे, हे कोणीतरी त्यांना सांगावे लागेल. कारण, ना पक्ष राहिला आणि ना धनुष्यबाण! याही सभेत अपेक्षेप्रमाणे मार्गदर्शन कमी आणि सभेत टोमणेबाजीच पाहायला मिळाली. खुर्च्यांची मांडणी अशी करण्यात आली, ज्यामुळे कॅमेर्‍यांना अधिकची गर्दी दिसून येईल. महिलांच्या विषयावर बोलताना नवनीत राणा, कंगना राणावत, केतकी चितळे यांना दिला गेलेला त्रास मात्र सोयीस्कर विसरले. बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार तब्बल सहा वर्षं काढून घेण्यात आला होता, हे उद्धव हिंदुत्वासारखेच विसरून गेले. गद्दार आणि खोक्यांच्या स्वप्नरंजनात रंगलेले उद्धव ठाकरे अनेक मुद्दे सोयीस्कररित्या विसरले. मविआत सोबत नसताना ठाकरेंनी स्वतंत्र मालेगाव जिल्हा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. सभेमध्ये संगमनेरहून आलेल्या एकाने तर उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या साक्षीने रोजा सोडला म्हणे! त्यामुळे आणखी काही बोलणे बरे नाही...


सज्जड नव्हे, तर नरम दम!

 
उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींना धारेवर धरले खरे. परंतु, ही धार धारदार नव्हे, तर बोथट होती. अगदी मिळमिळीत स्वरूपात दिलेल्या उत्तराने तिकडे राहुल गांधींनीही कदाचित स्मितहास्य केले असेल. कारण, काँग्रेस उद्धव यांच्याकडे नाही, तर उद्धव यांनी काँग्रेसच्या पायाशी लोळण घेतली, हे राहुल जाणून आहे. पत्रकार परिषदेत राहुल चांगले बोलले असं त्यांनी बोलून मग राहुल यांच्यावर टीका केली. सभेत उद्धव यांनी, “मी जाहीरपणे राहुल गांधींना सांगतोय, सावरकर आमचं दैवत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी लढायचे असेल, तर सावरकरांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही,” असा नरम दम दिला. त्यामुळे मविआत राहून हिंदुत्व सांभाळतानाची त्यांची होणारी दमछाक स्पष्टपणे दिसून आली. परंतु, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या दणक्यानंतर आता चहूबाजूंनी ठाकरेंचीच गोची झालेली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे मविआच्या गुंत्यातून आपली गाठ अलगदपणे सोडवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा प्रश्न पडणेही साहजिकच. उद्धव यांच्या विचारांमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये फार मोठी तफावत असल्याचे त्यांनी राहुल गांधींना दिलेल्या आव्हानावरून दिसून आले. किमान समान कार्यक्रमात सावरकरांचा मुद्दा समाविष्ट नव्हता, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले, तर सत्ता गेली तरी बेहत्तर, परंतु विचार सोडणार नसल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव यांना लगावला. त्यात आता फडणवीस-शिंदे सरकार राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. त्यामुळे राहुल यांनी कितीही सावरकरांसाठी अपशब्द वापरले तरीही महाराष्ट्राचे मन कधीही जिंकू शकणार नाही. सभेची चर्चा कमी आणि ती लाल रंगाची पर्स, माईकखालील कुरेशी नाव आणि उर्दूतील बॅनरची चर्चा सोशल मीडियावर अधिक रंगली. लहान असताना मी सावरकरांच्या जन्मगावी सावरकर वाड्यात गेलो होतो, असे सांगून उद्धव यांनी स्वतःच्या अपयशाची कबुली दिली. परंतु, लहानपणानंतर मोठेपणी त्यांना तिथे जावेसे वाटले नाही, ही शोकांतिका. उद्धव यांच्यासाठी सावरकर दैवत असेल, तर सावरकरांचा सातत्याने अपमान करणार्‍या राहुल यांच्यासोबत आघाडी करण्यात इतका रस का, याचेही उत्तर त्यांनी सभेतून द्यायला हवे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.