मनाला चांगले वाटेल असे काहीतरी केल्याने व शोधल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्हाला रोगाशी लढण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळेल...
वैद्यकीय क्षेत्रात आजच्या माहितीनुसार, सिरोसिस किंवा यकृताच्या कर्करोगाविषयी, यकृत पूर्णपणे त्याच्या पूर्वीच्या, निरोगी स्थितीत परत येण्याचा कोणताही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असा मार्ग दिसत नाही. डॉक्टरांच्या यकृताचे उपचारात्मक धोरण किंवा उद्दिष्ट हे निगडित असे कोणतेही आक्षेपार्ह घटक काढून टाकणे, रोगाची पुढील प्रगती रोखणे, जंतुसंसर्ग रोखणे आणि आवश्यक लागणारी काळजी प्रदान करणे, हे आहे. यकृत रोगाच्या प्रगतीमुळे अनेक जणांनी अनुभवलेल्या शारीरिक गुंतागुंतीमुळे वैद्यकीय शास्त्राच्या निराशावादी रोगनिदानाची पुष्टी होऊ शकते. उपचाराचे दुष्परिणाम किंवा रोगग्रस्त यकृताचे शारीरिक परिणाम जसे की, नकोशा वेदना, मळमळ आणि थकवा यामुळे आपले आरोग्य परत मिळेल, अशी आशा राखणे, रुग्णांना आणखी कठीण होते. बर्याच जणांचा असा समज आहे की, जर त्यांनी जास्त प्रमाणात मद्यपान केले किंवा ड्रग्ज वापरले, तरच त्यांना यकृताचा आजार होऊ शकतो. तसे नसून तुम्हाला यकृताचा आजार जन्मापासून येऊ शकतो, तो विषाणूमुळे होऊ शकतो, तुम्ही जे खाता-पिता त्यातून होऊ शकतो.
विविध प्रकारच्या विषांच्या संपर्कात आल्याने किंवा अज्ञात कारणांमुळे यकृताचा त्रास होतो. १०० पेक्षा जास्त यकृताच्या विविध प्रकारांच्या रोगांपैकी फक्त एक आजार अल्कोहोलमुळे होतो. कॅनडामध्ये, दारू न पिता यकृताचा आजार (नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग) हा सर्वात सामान्य आढळणारा यकृताचा आजार आहे, जो सात दशलक्ष कॅनेडियन लोकांना झालेला दिसून आला आहे. तथापि, तुम्ही नेहमी पुढील आशादायक संभाव्य विचारांचा विचार करू शकता. यकृत रोगाचा सामना करण्यासाठी, तुम्हाला आधीपासूनच माहिती दिली जाते की, तुम्हाला निरोगी आहार घेणे आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. दारूसारखी व्यसने सोडणे आणि मांसाहार कितीही आवडत असला, तरी कमी करणे आवश्यक आहे. याशिवाय डॉक्टरांकडून वेळोवेळी उपचार घेणे गरजेचे आहे. बर्याच वेळा कठोर निर्बंध पाळावे लागत असल्याने अनेक जण डॉक्टरांकडे जायचे टाळतात.
आधुनिक वैद्यकीय संशोधनातून असे दिसून येते की, सकारात्मक विचार तुमच्या गंभीर समजल्या जाणार्या हृदयरोगांच्या उपचार प्रक्रियेसदेखील मदत करू शकतात? सकारात्मक विचार कशा प्रकारे मदत करू शकतात, याचे स्पष्टीकरण समजावून घेतले पाहिजे. तुम्ही सुदृढ आरोग्य आणि आनंद यांच्यातील नाते व संबंध याबद्दल ऐकले असेलच. यानुसार यकृत खराब झालेल्या लोकांना ही सकारात्मक विचारांनी अकल्पित मदत केली जाऊ शकते. तणाव, राग आणि नैराश्य यकृताची स्थिती बिघडवते. हृदयविकार असलेल्या लोकांना सुखी जीवनासाठी काम करून अनेक फायदे मिळतात. परंतु, यकृताचा आजार असल्यास असा सराव करणे कठीण आहे. टोरोंटो विद्यापीठाच्या संशोधकांनी कमीत कमी दोन वर्षांपासून यकृतरोग झालेल्या ३०० महिलांची मुलाखत घेतली. त्यांनी विचारले की, रोगाला रोखण्यासाठी व तो पुन्हा उद्भवू नये म्हणून त्या काय करीत आहेत? ६० टक्के महिलांनी विश्वासाने स्पष्ट केले की, त्यांचा सकारात्मक व प्रसन्न राहण्याच्या दृष्टिकोन त्यांना निरोगी राहण्यास मदत करतो.
लोक ’हिपॅटायटीस सी’सारख्या आजाराच्या गरजा कशा पूर्ण करतात आणि पूर्ण आयुष्य कसे जगतात? एक सकारात्मक, उपचार करण्याची वृत्ती अनेकांना हे आव्हान पूर्ण करण्यास मदत करते. सोप्या शब्दांत सांगावयाचे, तर नकारात्मक भावना तुमच्या शरीरातून बरे होण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा जणू काढून टाकते. असे म्हणतात की, तुम्ही करू शकता, असा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही कदाचित खरंच काहीही करू शकता. पण, जर तुमचा विश्वास असेल की, तुम्ही करू शकणार नाही, तर तुम्ही नक्कीच करणार नाही. मनातील विश्वास हा एक प्रज्वलित करणारा दिवा आहे, जो तुम्हाला घनघोर अंधारातून बाहेर काढतो.‘हिपॅटायटीस’ सारख्या जीवनाची दिशाच बदलणाराआजार असलेल्या अनेक लोकांसाठी, सकारात्मक दृष्टिकोन ही केवळ एक क्षणिक ऊर्मी नसते, ती त्यांना दिवसभर सातत्याने मिळावी लागते. सकारात्मक विचार हे ऊर्जा निर्माण करणार्या सृजनाची प्रक्रिया असते. म्हणून सकारात्मक विचार करा, जे आरोग्याचे संवर्धन करतात, ज्यामुळे शेवटी सकारात्मक परिणाम मिळतात. सकारात्मक विचार हे एक शक्तिशाली उपचार साधन आहे.
आपल्या सर्वांना ते वापरणे शक्य आहे. परंतु, आपल्यापैकी काहीजणांनाच त्याचा पूर्ण वापर करता येतो. सहनशीलता, प्रसन्नता, आत्मसन्मान आणि स्वाभिमान या गुणांशिवाय भौतिक शरीराला बरे करणे कठीण काम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शास्त्रीय संशोधनातील प्रकाशनानुसार, सकारात्मक विचार हे प्रत्येक व्यक्तीने शिकता येण्याजोगे कौशल्य आहे. यकृताच्या आजाराशी संबंधित ‘इंटरनेट’ संदेश आणि ‘चॅट बोर्ड’ सकारात्मक विचारसरणीला तारणहार मानणार्या अनेक व्यक्तींनी पोस्ट केलेल्या यशोगाथांनी भरलेले आहेत. काही जण त्यांच्या आजारपणाला त्यांना सापडलेला नवीन अध्यात्माचा मार्ग मानतात, तर काहींना असे जाणवले की, यामुळे त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व कळले आणि लाभलेल्या त्या दिवसाची प्रशंसा करण्यास प्रवृत्त केले. प्रसन्नता हे खरे जगण्याचे साधन आहे, असे वैयक्तिक संवाद आपण नेहमीच ऐकत असतो.
बहुतेकदा वैद्यकीय लोक सहमत आहेत की, सकारात्मक विचार सुरू केल्याने जगण्याची गुणवत्ता आणि बरे व्हायची शक्यता अधिक वाढेल. हा तसा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. पुराव्यांवरून असे सूचित होते की, मनाला चांगले वाटेल असे काहीतरी केल्याने व शोधल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्हाला रोगाशी लढण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळेल. यकृताच्या आजाराशी लढा देत असलेल्या व्यक्तीला रोगप्रतिकारक शक्तीची अत्यंत आवश्यकता असल्याने, एखाद्याचे विचार सक्षम करण्याचे मार्ग शोधणे, त्यांच्या जीवनाला आणि शरीराला निरोगी दिशेने घेऊन जातील. यकृताच्या आजाराच्या थकव्यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचारशक्ती हे एक उपयुक्त साधन ठरू शकते. यकृत प्रत्यारोपण केल्यावर आवश्यक असणारी रोगप्रतिकारक ताकदही त्यामुळे वाढू शकते. तुमचा विश्वास नसला, तरीही सकारात्मक विचारांचा सराव केल्याने कालांतराने सकारात्मक विचार ही सवय बनते. यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी रुग्णाच्या मनाचा आणि इच्छाशक्तीचा समावेश आवश्यक ठरतो. तुमच्या यकृताच्या आरोग्याला चालना देण्यासाठी तुम्ही विश्वासाने जे काही सकारात्मक आणि विधायक करू शकता, ते तुम्हाला दीर्घ, निरोगी आयुष्य जगण्यास मदत करेल.अंतर्मनात अशी जागा शोधा, जिथे आनंद सापडेल आणि आनंद तुमची वेदना नक्कीच नष्ट करेल!
-डॉ. शुभांगी पारकर