मुंबई : “या शतकात जरी लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका एकट्याच झाल्या असल्या, तरीही दुसर्या आशा भोसलेही झाल्या नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे,” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दि. २४ मार्च रोजी सायंकाळी २०२१ सालचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ’भारतरत्न’ सचिन तेंडुलकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यानंतर, ‘आवाज चांदण्यांचे’ या आशा भोसले यांच्या सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.
सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर आणि आर्या आंबेकर यांनी कार्यक्रमात गीते सादर केली.यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “आज आशाताईंचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली. मी धन्य झालो. १९५१ साली एका चित्रपटात गेट-वेच्या पार्श्वभूमीवर गायलेल्या गीताच्या ‘कोरस’मध्ये आशाताई होत्या. आज याच गेट-वेवर महाराष्ट्रातील ‘सर्वोच्च पुरस्कार’ त्यांना मिळतो आहे. ‘व्हर्सेटाईल’ या शब्दाची व्याख्या म्हणजे आशाताई. त्यांनी आजपर्यंत २० भाषांमध्ये गाणी गायली. त्यांनी एका दिवशी सात गाणी गाण्याचा विक्रमही केला आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज आशाताईंना ‘महाराष्ट्रभूषण’ प्रदान करताना मला मुख्यमंत्री झाल्याचे सार्थक वाटतेय. सत्तेची खुर्ची मिळवणे सोप्पे, पण लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणे हे आशाताईंनी सोप्पे केले. त्यांच्यामुळे पुरस्काराची उंची वाढली. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न. रेडिओवरची त्यांची गाणी ऐकत आपण आपले आयुष्य व्यतित केले. मधुबालापासून काजोलपर्यंत सर्वांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.”‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना आशा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व रसिकांना आदर व प्रेमाचा नमस्कार करत त्या म्हणाल्या, “माई-बाबा आणि दीदींच्या आशीर्वादाने मी इथवर आले.
महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाने पुरस्कार प्रदान केला आणि महाराष्ट्राच्या मुलीचे कौतुक केले आणि म्हणूनच हे माझ्यासाठी ’भारतरत्न’ आहे.”त्या पुढे म्हणाल्या की, ”आज आपल्याकडे त्या तोडीचे गीतकार आहेत की नाही, याची मला कल्पना नाही, पण संगीत-दिग्दर्शक बिलकुल नाहीत. माझ्यामागे सरकार असल्याने इथवर येऊ शकले. परंतु, मला वाटते कलाकारांना रसिकांनीच बनवले. त्यांच्या साथीने बरेच काही करू शकेन.”आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “पहिल्यावेळी गायले तेव्हा मी थरथरत होते. नाही गायले तर घरी जाऊन मार पडेल म्हणून गावे लागले. मला गझल गाणे थोडे कठीण वाटायचे, तसेच आर. डी. बर्मन यांची गाणी कठीण वाटायची. पण, रसिकप्रेक्षकांची साथ असेल तर अजूनही ९० वर्षे गात राहीन.”
सुधीर मुनगंटीवार यावेळी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की, “१९२४ साली गेट-वेचे लोकार्पण झाले, पण त्याचा सोहळा खरा आज झाला. हे आपले ’कोहिनूर’ आज इथे एकत्र आहेत. आज आशाताईंना ऐकताना पटते, हा तर सरस्वतीचा आवाज, ज्यामुळे ८० वर्षांचा माणूसही तरुण होतो.”