भारताचा मूळ राष्ट्रीय प्रवाह कोणता? वनवासी हिंदू आहेत की अन्य कुणी? अस्सल भारतीय परंपरा, संस्कृती, संस्कार, रितीरिवाज यांचे दर्शन कुठे होईल? निसर्ग, वनातील पशु-पक्षी यांच्यासोबतची तादात्म्यता कुठे अनुभवायला मिळेल? निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना सहजपणे निर्माण झालेली मनाची शुद्धता, निर्मळता अनुभवत असतानाच ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ची उदात्त अनुभूती कुठे प्राप्त होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत? एकच करा, ‘ऑस्कर’ विजेता अवघ्या 41 मिनिटांचा लघुपट ‘दि एलिफंट व्हिस्परर्स’ बघा. या 41 मिनिटांत तुम्हाला वरील प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच, पण भारताबाबत ’होठोंपे सच्चाई रहती है, जहां दिलमें सफाई रहती है...’ ही केवळ कविकल्पना नव्हती तर वास्तव होते आणि आजही वनवासी समाजाने यासारखी असंख्य जीवनमूल्ये प्राणपणाने जतन केली असल्याचे पाहून आपली छाती अभिमानाने नक्कीच फुलून येईल.
नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांमध्ये यंदा दोन भारतीय कलाकृतींंनी एक इतिहास रचला आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू...’ या गाण्याला उत्कृष्ट संगीतासाठी, तर ’दि एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंटरीला उत्कृष्ट लघुचित्रपटाचा ‘ऑस्कर’ मिळाल्याने सर्वच भारतीयांची छाती 56 इंची झाली आहे. आतापर्यंत भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास यावर आधारित एखादी चित्रपट वा अन्य कलाकृती बनवणे मागासपणाचे आणि बुरसटलेल्या विचारांचे लक्षण मानले जायचे. पण, आता काळ बदलला आहे. भारतीय संस्कृतीचा सन्मान करणारी कलाकृती बनवली, तरच ती चालेल, नाहीतर जोरदार आपटेल, असे एक समीकरण आता बनू पाहत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात झालेल्या या बदलाचे प्रतिबिंब आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील उमटत असल्याची प्रचिती आणून देणारी ही घटना म्हणावी लागेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची विजयध्वजा डौलाने फडकावणार्या या दोन्ही कलाकृतींमध्ये एक कमालीचे साम्य आहे ते म्हणजे, या दोन्ही कलाकृती वनवासी जनजीवनाशी थेट संबंधित आहेत. त्यातील ’नाटू नाटू...’ हे गाणे ज्या चित्रपटातील आहे, तो ‘आरआरआर’ हा चित्रपट 1922च्या दरम्यान रम्पा विद्रोहाच्या माध्यमातून आंध्र प्रदेशातील वनवासी बांधवांना संघटित करणारे अल्लुरी सीताराम राजू आणि प्रसिद्ध जनजाती क्रांतिकारक कोमराम भीम यांच्या प्रेरणास्पद जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा जरी काल्पनिक असली, तरीदेखील या दोन्ही क्रांतिकारकांचा पराक्रम मात्र वास्तविक होता. ब्रिटिशांच्या विरोधात आंध्र प्रदेशातील सुदूर वनक्षेत्रात राजू व कोमराम भीम यांच्या नेतृत्त्वाखाली वनवासी बांधवांनी जे अभूतपूर्व शौर्य दाखवले, त्याची काही प्रमाणात झलक या चित्रपटात खूपच प्रभावीपणे सादर करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे इंग्रजांनी दाबून टाकलेल्या वनवासींच्या गौरवशाली इतिहासातील हे दोन नायक प्रथमच एवढ्या प्रभावीपणे एका मोठ्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात या चित्रपटाने खूपच मोलाची भूमिका बजावली आहे.
‘दि एलिफंट व्हिस्परर्स’ हा लघुपट तर अप्रतिमच...! संपूर्णपणे वनवासी जीवनावर आधारित असलेल्या या लघुपटाने भारतातील समृद्ध अशा वनवासी जीवनाचे यथार्थ दर्शन अत्यंत प्रभावीपणे सादर केले आहे. तसे पाहायला गेले, तर ही एक डॉक्युमेंटरी आहे. त्यामुळे त्यात कथानक आणि फारसे संवाद नाहीत. तामिळनाडूतील 140 वर्षांच्या जुन्या थेप्पाकडू या जंगली प्राण्यांसाठी बनवण्यात आलेल्या कॅम्पमध्ये दाखल झालेल्या हत्तीच्या एका छोट्या पिल्लाची ही कथा आहे. रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला ‘रघू’ हा हत्ती आणि त्याचा वनखात्याकडून सांभाळ करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका दाम्पत्याची ही एका अर्थाने प्रेमकथा. तामिळनाडूमधील ‘कट्टुनायकन’ या जनजातीमधील बोम्मन आणि बेली हे ते दाम्पत्य. कॅम्पमध्ये मरणासन्न अवस्थेत दाखल झालेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या रघूची जबाबदारी या दोघांवर येते. अत्यंत गंभीर अवस्थेतील हा रघू जगणे अशक्य असल्याची सर्वांची खात्री असताना केवळ लळा, जिव्हाळा, सेवा, प्रेम या बळावर हे दाम्पत्य या हत्तीला कसे नवजीवन देते, हे या लघुपटाचे सार.
हत्तींसाठी बनवण्यात आलेला हा कॅम्प घनदाट जंगलात असल्याने संपूर्ण लघुपट या जंगलाभोवतीच केंद्रित होतो. विस्तीर्ण पसरलेले अरण्य आणि या हिरव्यागार अरण्याच्या सान्निध्यात फुलणारी ही कुठलेही सलग कथानक नसलेली कहाणी. या कहाणीत बोम्मन, बेली आणि रघू ही तीनच पात्र असल्याने जो काही संवाद आहे, तो या तिघांमधीलच आहे. रघूचा अल्लडपणा, पाण्यात मनसोक्त पोहण्याचा त्याचा आनंद, एकमेकांवर काढला जाणारा लटका राग, रघूची जबाबदारी दुसर्या कर्मचार्यावर सोपवल्यानंतर बोम्मनच्या जीवाची झालेली घालमेल, याचवेळी ‘अम्मू’ नावाची नव्याने दाखल झालेली छोटी हत्तीण, रघूपासून दूर जाताना तिची झालेली अवस्था, हे सर्व प्रसंग लघुपटात खूपच प्रभावीपणे मांडले आहेत.
हे सर्व प्रसंग सादर करत असताना लघुपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस यांनी ‘कट्टुनायकन’ जनजातीचे चित्रणदेखील उत्तम पद्धतीने सादर केले आहे. रघूचा सांभाळ करत असताना बोम्मन व बेली या दोघांचे जुळलेले बंध, पारंपरिक पद्धतीने झालेले त्यांचे लग्न, या लग्नात सजलेले रघू आणि अम्मू, वनवासींचे पारंपरिक नृत्य या प्रसंगांमधून वनवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचे आपल्याला दर्शन होते. वनवासी समाजाने जपलेली जीवनमूल्येदेखील या लघुपटात मांडण्यात आलेली आहेत. आपल्या गरजा भागविण्यापुरते आवश्यक तेवढेच निसर्गाकडून घेण्याचा जो एक सहज स्वभाव वनवासी समाजाचा आहे, तो झाड न तोडता केवळ आवश्यक तेवढ्या फांद्या तोडतानाच्या प्रसंगातून दाखवण्यात आला आहे. मुळातच जंगलात राहणार्या सर्व प्राण्यांना वनवासी समाज आपला सहचर मानतो. वनात राहणार्या प्राण्यांना प्रेम दिले, तर तेदेखील आपल्याला तेवढेच प्रेम देतात, असे प्रत्येक जनजाती मानतो. त्यामुळेच आपल्या पहिल्या पतीला वाघाने खाऊनदेखील बेलीचे प्राण्यांवरील प्रेम तसूभरही कमी झाल्याचे दिसत नाही. ‘हत्तींची माता’ म्हणून परिचित झाल्याने तिला वाटणारा अभिमान तिच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येतो. एकूणच जगभरात हत्तींची प्रतिमा उपद्रवी म्हणून आहे. मात्र, हत्ती किती प्रेमळ असतात, हे त्यांच्या सान्निध्यात जे येतात त्यांनाच माहीत असल्याचे वास्तव बेली आपल्या नातीच्या नजरेस आणून देते. हत्तीच नव्हे, तर संपूर्ण प्राणिमात्रांविषयी ममत्त्वाचा भाव निर्माण करण्यातही हा लघुपट कमालीचा यशस्वी ठरतो.
या लघुपटात वनवासी समाजाचे जे चित्रण केले आहे, ते भारतातील कुठल्याही वनवासी क्षेत्राला लागू पडते. प्रत्येक प्राण्याला या जंगलात राहण्याचा आपल्या एवढाच अधिकार असल्याची उदात्त भावना वनवासी समाजातच आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. कारण, निश्चित अशी जीवनमूल्ये जगणारा हा समाज आहे. दुर्दैवाने भारतीय किंवा हिंदू जीवनमूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणार्या या समाजाबाबत तो हिंदू नसल्याचा दुष्प्रचार सध्या होताना दिसत आहे. मात्र, या लघुपटात जनजाती समाजाच्या परंपरा या हिंदू परंपराच असल्याचे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. प्रस्थापित ‘नरेटिव्ह’च्या विरोधात जाऊन हिंदू समाजाचे अभिन्न अंग असणार्या जनजाती समाजाचे वास्तव चित्र दाखवण्यास खूप मोठे धाडस लागते, ते धाडस दाखवल्याबद्दल निर्माती कार्तिकी गोन्साल्विस यांचे अभिनंदन.
या लघुपटाला ‘ऑस्कर’ मिळाल्याने भारतातील जनजाती समाजजीवन, परंपरा आणि जीवनमूल्ये यांचे एक सकारात्मक चित्र जगासमोर गेले आहे. हा सार्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. यानिमित्ताने जनजाती समाजाची स्पंदने समजून घेण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी, अशी अपेक्षा आहे.
-महेश काळे