फुल‘सुंदर’ निशा

    24-Mar-2023   
Total Views |
 
Nisha
 
 
सौंदर्योपचाराच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबांत आनंदाचे ‘रंग’ भरून थेट ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत किताब पटकावणार्‍या नववी पास निशा फुलसुंदर या मध्यमवर्गीय गृहिणीची ही चित्तरकथा...
 
ठाण्यातील शिवाईनगर येथे राहणार्‍या निशा यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री गावी झाला. घरात अठराविश्वे दारिद्य्र असलेल्या एका शेतकर्‍याची मुलगी असलेल्या निशाचे बालपण तसे कष्टदायक गेले. लहानपणी कसली मौज नाही की हौस नाही. कसेबसे दोन घास खाऊन कुटुंबाचा गाडा हाकणारे तिचे वडील म्हणायला ’जगाचे पोशिंदे’ मात्र, ते स्वतःची व कुटुंबाची कशीबशी गुजराण करून दिवस ढकलत होते. तेव्हा, ताप आला तरच दूध आणि बिस्किट मिळे, अशा परिस्थितीत निशा यांनी इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतले. यौवनात पदार्पण करीत असतानाच 2004 साली शहरातील स्थळ आल्याने निशा यांचे लग्न झाले आणि जुन्नरच्या छोट्याशा खेड्यातून निशा मुंबई लगतच्या ठाणे नगरीत आल्या.
 
लग्नानंतरही ’ती’च्या खडतर आयुष्यात विशेष फरक पडला नाही. आयुष्याचा दुसरा अध्यायही गरिबीतच गिरवावा लागणार असल्याची खुणगाठ तिने मनाशी बांधली. सासरी कुटुंबाचा गाडा हाकत असतानाच त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. कुटुंब वाढले, पण आमदनी वाढली नव्हती. आता त्यांचा मुलगा बारावीमध्ये, तर मुलगी आठवीमध्ये शिकत आहेत. काही वर्षांतच सासरच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी निशा यांच्या शिरावर आली. शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळत नव्हती, म्हणून मग त्यांनी 2014 साली ‘ब्युटी पार्लर’चा कोर्स केला. त्यानंतर 2015 मध्ये त्याच पार्लरमध्ये नोकरी सुरु केली. जेमतेम चार- पाच वर्षे नोकरी केल्यानंतर बर्‍याच जणांच्या ओळखीमुळे त्यांनी आपल्या सौंदर्योपचार कलेच्या विश्वासावर पार्लरमधील नोकरीला रामराम ठोकून ’होम सर्व्हिस’ देण्यास सुरुवात केली. ‘फेशियल’, ‘हेअरकट’, ‘आयब्रोज’, ‘थ्रेडिंग’, ‘व्हॅक्सिंग’ अशा चेहरा, केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविणार्‍या सेवा देण्यात हातखंडा असल्याने आणि ओळखी वाढल्यामुळे निशा यांना कामेही मिळू लागली. महिलांच्या केवळ बाह्यसौंदर्याची नाही, तर मानसिक, भावनिक स्वास्थ्याची काळजी निशा घेत असल्याने त्यांचे ‘क्लाएंट’ही सुखावतात. शिवाय स्वतः निस्सिम स्वामीभक्त असल्यामुळे निशा यांचे 80 टक्के ‘क्लाएंट’ स्वामींचे भक्त आहेत. ही एकप्रकारे स्वामी समर्थांचीच कृपा असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
 
कौटुंबिक गरजा तसेच व्यवसायातील सर्व जबाबदार्‍या पार पाडत असताना त्या स्थानिक पातळीवर होणार्‍या मंगळागौर, हळदीकुंकू आदी छोट्या-छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागल्या. बालपणापासूनच कलेची आवड होती. त्यामुळे हळूहळू त्यांनी ’फॅशन शो’ मध्ये सहभाग घेण्यास प्रारंभ केला. या व्यासपीठाने त्यांना एवढा छान अनुभव आला की, आपणही खूप काही करू शकतो, असा आत्मविश्वास बळावला. 2022 साली एका सौंदर्य स्पर्धेत त्यांनी चक्क ‘मिसेस इंडिया ब्युटीफुल फेस’ आणि 2023 साली ‘आयकॉन टॉप फाईव्ह क्लासिक’ तसेच ’ब्युटीफुल आईज’ असे किताब पटकावले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांनीही निशाचे कौतुक केल्याचे त्या सांगतात. या सर्व प्रवासात मैत्रिणींची मोलाची साथ लाभली. किंबहुना, त्या सर्वजणींनी सर्व स्तरावर प्रोत्साहन दिल्याचे आवर्जून नमूद करताना, “मला आयुष्याच्या प्रवासात काही हात सोडून जाणारे भेटले. काही नकळत योग्य मार्ग दाखवणारेही भेटले. त्याच प्रवासात योग्य मार्ग दाखवणार्‍या सुखदुःखात साथ देणार्‍या मैत्रिणीही भेटल्या. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि अनुभव घेऊन सौंदर्यातील नवनवीन कसब शिकत गेले,” असे निशा सांगतात.
 
सौंदर्योपचाराच्या व्यवसायासोबत विविध सौंदर्य स्पर्धा तसेच स्थानिक उपक्रमांमध्ये आपल्यातील कला सादर केली. प्लास्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी एका उपक्रमात निशा यांनी नणंदेच्या मदतीने स्वतः शिवलेला वर्तमानपत्रांचा अफलातून पेहराव घालून स्पर्धेत सादरीकरण केले होते. या उपक्रमात वर्तमानपत्रांच्या कल्पक वापराचे कौतुक तर झालेच, किंबहुना स्पर्धेत निशा यांनी चक्क पुरस्कार पटकावला. एका मध्यमवर्गीय गृहिणीसाठी हा सन्मान मोलाचा होता. अशी मजल दरमजल सुरु असताना अनेकदा उच्चभ्रू वर्गातून हिणवले गेल्याची खंत त्या बोलून दाखवतात. ‘तुम्ही मिडल क्लास आहात’, ‘कमी शिकलेली असल्यामुळे तू भविष्यात पुढे जाऊ शकणार नाहीस’ असे बोलून अपमानित केले गेले. पण, निशा खचल्या नाहीत, स्वतःला घडवत स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी जिद्दीने त्यांची वाटचाल सुरु आहे. चेहर्‍याच्या सुंदरतेपेक्षा मनाची आणि चांगल्या विचारांची सुंदरता ज्याच्याकडे असते ते कधीच कुणाला कमी लेखत नाहीत. अनेकांना वाटतं, अबला स्त्री काही करू शकत नाही, पण ती सर्व काही करू शकते. स्त्री सार्‍या विश्वाची सैर करते. गृहकृत्यदक्ष गृहिणी बनून घराला घरपण देत अनेकजणी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. तेव्हा, भविष्यात कुटुंबाचा उत्कर्ष करण्यासोबतच समाजातील अबलांसाठी उत्तम व्यासपीठ उभारण्याचा मानस निशा व्यक्त करतात.
 
“ज्या महिला त्यांची इच्छा असूनही पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांनी हार न मानता स्वतःमधील आत्मविश्वास जपायला हवा. स्वप्न साकार करण्यासाठी न डगमगता कार्यरत राहिल्यास यश नक्कीच मिळेल,” असा संदेश त्या होतकरू महिलावर्गाला देतात. अशा या फुल’सुंदर निशा’ यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.