अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपुरातील सागवान लाकूड
सुधीर मुनगंटीवार : २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन
22-Mar-2023
Total Views |
चंद्रपूर : अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे काम युध्दपातळीवर सुरू असून चंद्रपूर येथून १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड अयोध्येला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
भव्य स्वरुपात काढण्यात येणार्या या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तसेच अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.भारतीय जनता पक्ष महानगर व ग्रामीणच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार २२ मार्च रोजी गुढीपूजन व १ कोटी रामनाम जाप लिखाण पुस्तिकेच्या वितरणाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. रामनाम जापाच्या या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राम मंदिरासाठी मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणार आहेत. तसेच काष्ठ (सागवान) पूजन समारंभात २९ मार्चला या पुस्तिका प्रभू श्री रामाला समर्पित केल्या जातील, असेही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, या पूर्वी चंद्रपूरमधून मोठया प्रमाणात, अयोध्या मंदिरासाठी रामशिला पाठविल्या होत्या. आता १ कोटी रामनाम जपाचे लिखाण करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रामभक्तांना हिंदू नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्राप्त होत आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.