शेतकरी चिंतातुर, अवकाळी पावसामुळे शेतकरी व फळ बागायत दारांचे मोठया प्रमाणात नुकसान
21-Mar-2023
Total Views |
पेण : अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि फळ बागायत दारांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, जांभुळ, करवंद यांसह अनेक फळभाज्यांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील या नुकसानी नंतर त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याची अपेक्षा असते आणि ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला योग्य प्रकारे मिळावे यासाठी प्रशासनाकडून पंचनामे देखील केले जातात.
मात्र हे पंचनामे करण्याचे काम ज्यांच्याकडे दिले जाते ते कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी शासकीय कर्मचारी मागील पाच दिवसांपासुन आपल्या काही मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने पंचनामे करण्यात आले माहीत मात्र संप मिटल्याने आता तरी त्वरित नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी बागायतदार यांच्या कडून करण्यात येत आहे.
पेण तालुक्यात आंबा, काजू, जांभुळ, करवंद यांसह अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षी आंबा, काजू सारख्या फळ झाडांना भरपूर प्रमाणात मोहोर येऊन चांगले पीक आले होते.मात्र दोन दिवसांपासुन सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे ही फळे गळून पडत आहेत.
अवकाळी पावसामुळे फळझाडांना मोठा फटका बसत आहे. अतिशय मेहनत करून झाडाला बहर येऊन फळ पिकुन तयार होईपर्यंत हे शेतकरी या फळझाडांना जिवापेक्षा जास्त जपत असतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी वेळ आल्यास कर्ज घेऊन खते, बी बियाणे यांचा वापर करून ही फळझाडे जपली जातात. असे असतानाच एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि या शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते या संकटामुळे पेण तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.