प्रवीणसिंह परदेशी यांची BNHSच्या अध्यक्षपदी निवड

    21-Mar-2023
Total Views |

praveen pardeshi



 
मुंबई (प्रतिनिधी): भारतीय प्रशासकीय सेवेत ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणुन काम केलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजेच बिएनएचएस (BNHS) या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे सध्या बिएनएचएसच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते. बिएनएचएसच्या गव्हर्निंग कॉन्सिलने एकमताने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत गव्हर्निंग कॉन्सिलचे सदस्य रोहन भाटे , उषा लचुंगपा, डॉ.अनिश अंधेरिया , केदार गोरे , पिटर लोबो , कुलोज्योती लाखर , डॉ रघुनंदन चुंडावत , डॉ. आसद रहमानी, डॉ. शुभालक्ष्मी, डॉ.परवेश पांड्या, उपाध्यक्ष श्लोका नाथ, कोषाध्यक्ष कुंजन गांधी यांचा समावेश होता.
भारतातील वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणुन बिएनएचएसची ओळख आहे. १८८३ पासुन म्हणजेच गेली १४० वर्ष निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर या संस्थेचे मोठे काम आहे. भारतातील प्राणीविज्ञान, जैवविविधता क्षेत्रात संशोधन आणि संवर्धनाचे काम करणारी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) ही सर्वांत प्राचीन संस्था आहे. पक्षी व वन्यजीव संशोधन, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीवर आधारित कृतीद्वारे निसर्गाचे संवर्धन आणि प्रामुख्याने जैवविविधता वाचवणे हे संस्थेचे ध्येय आहे. बिएनएचएस ही धोक्यात असलेल्या प्रजाती आणि अधिवासांच्या संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणारी, स्वतःचे स्वातंत्र्य शास्त्रीय मत असलेली भारतातील अत्यंत प्रमुख अशी वैज्ञानिक संस्था आहे.
“प्रवीणसिंह परदेशी यांना पूर्वीपासूनच वन्यजीव प्रेमी म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी जगातील अनेक देशांमधील वन्यजीव व्यवस्थापनाचा खोलवर अभ्यास केला आहे. परदेशी यांच्या नियुक्ती मुळे निसर्ग संवर्धन व संशोधन क्षेत्रात बिएनएचएस संस्था आता एका नव्या शिखरावर जाऊन पोहचेल ह्याबाबत शंका नाही”, असे मत संस्थेचे मानद सचिव किशोर रिठे यांनी व्यक्त केले आहे.
“बिएनएचएस सारख्या भारतातील अग्रगण्य संस्थेत आता परदेशी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा संस्थेस नवीन शिखरावर पोहचण्यासाठी नक्कीच होणार आहे”, असे मत बिएनएचएसचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केले आहे.
 
प्रवीणसिंह परदेशी यांच्याविषयी -

• प्रवीण परदेशी १९८५ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत.
• परदेशी यांनी प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत विविध पदं भूषवली आहेत.
• परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात (UNO) ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलंय.
• त्यांनी मुंबई महापालिकेत २०१९ मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती.
• त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसेच महसूल या महत्त्वांच्या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे.
• प्रवीण परदेशी यांनी केंद्रात पंतप्रधान कार्यालयात गठित राष्ट्रीय क्षमता आयोगाच्या सदस्यपदी काम पाहिले आहे.
• तसेच नुकतेच त्यांची राज्याच्या निती आयोगाच्या म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन- मित्र (Maharashtra Institute for Transformation- MITRA) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.