...ही तर ‘टूलकिट’पत्रकारिता!

    21-Mar-2023   
Total Views |
Saba Naqvi inadvertently ends up tweeting pro-Rahul Gandhi toolkit

 
सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नव्हे, तर राजकीय अजेंड्यांचेही केंद्र. त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचे, पक्षनेतृत्वाचे विचार हे नेटकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या ‘आयटी सेल’ कंबर कसून असतात. म्हणजे या ‘आयटी सेल’ आणि त्यामागचे चेहरे हे फारसे चर्चेत नसले तरी ‘नरेटिव्ह सेटिंग’मध्ये त्यांचा विशेष हातखंडा! मग अशावेळी साहजिकच त्या त्या राजकीय विचारसरणीला मानणार्‍यांनाही या खेळात हाताशी घेतले जाते. पण, यामुळे स्वत:ला ‘निष्पक्ष पत्रकार’ म्हणविणारे मात्र या नादात उघडे पडतात एवढेच! असाच किस्सा स्वत:ला ‘मुक्त पत्रकार’ म्हणविणार्‍या आणि भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणार्‍या सबा नक्वीबद्दलही घडला.सबा नक्वींनी नुकतेच त्यांच्या ट्विटरवरून काँग्रेसच्या ‘आयटी सेल’ने त्यांच्याबरोबर शेअर केलेली अख्खी ‘टूलकिट’च चुकून शेअर केली. ही ‘टूलकिट’ म्हणजे काय तर थोडक्यात काय बोलायचे, कसे बोलायचे त्यासाठी संदर्भाचे, कार्यक्रमाचे मुद्दे. सबा नक्वींनीही नुसतेच राहुल गांधींच्या समर्थनार्थ काढलेले चित्र ट्विट करण्याबरोबरच ही ‘टूलकिट’ही चुकून शेअर केली आणि त्यांचे पितळ उघडे पडले. मुद्दा त्यांनी राहुल गांधींचे समर्थन केले याचा नाहीच, पण एरवी ‘मी कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही, माझे विचार मुक्त आहेत’ अशी फसवी प्रतिमानिर्मिती करायची आणि दुसरीकडे काँग्रेसच्या ‘टूलकिट’नुसार सोशल मीडियावर राहुल राग आलापायचा, ही कुणीकडची पत्रकारिता? त्यामुळे सबा नक्वी आणि त्यांच्यासारख्या रिकामटेकड्यांनी आपण काँग्रेस पक्षासाठी काम करणारे पूर्णवेळ पत्रकार आहोत, हे एकदाचे जगजाहीर करून मोकळे व्हावे, अन्यथा समाजमाध्यमांवर जनतेची दिशाभूल करणे तरी थांबवावे.म्हणा, आता नेटकरीही तितकेच हुशार! एखाद्याच्या पोस्ट्स वाचून त्यांनाही साहजिकच अंदाज येतो की, ही व्यक्ती अमुक एका पक्षाच्या विचारसरणीकडे झुकलेली आहे. त्यामुळे अशा स्वत:ला निर्भिड, निष्पक्ष म्हणविणार्‍यांनी ही पोपटपंची मुळात थांबवावी. काँग्रेसचीच विचारधारा, मग ती कशी का कसेना, गांधी-खर्गे कोणाच्या का नेतृत्वात असेना, आम्हाला मान्य आहे, अशी सोशल मीडियावर एकदाची दवंडी पिटावी आणि मग खुश्शाल काँग्रेस समर्थनाच्या ‘टूलकिट’च्या फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्यभर जगावे!
 
गुरुद्वारांमध्ये खलिस्तानी जिहाद
 

पाकपुरस्कृत खलिस्तानी अमृतपाल सिंग अद्याप फरार आहे. त्यामुळे साहजिकच पंजाबमधील तणावपूर्ण स्थिती अद्याप निवळलेली नाही. पण, आता या प्रकरणी पोलिसांनी अमृतपालच्या निकटवर्तीयांच्या सुरू केलेल्या अटकसत्रानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते पाहता, अमृतपालही खलिस्तानी भिंद्रनवाले आणि दिलवर सिंगच्या पावलांवर पाऊल ठेवूनच, पंजाबमध्ये अस्थितरतेची आग धगधगती ठेवत असल्याचे स्पष्ट होते. भिंद्रनवालेने ज्याप्रमाणे गुरुद्वारांचा खलिस्तानी कारवायांसाठी वापर करत, शीखांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला, तसेच उद्योग या अमृतपालकडूनही सुरु होते. अमृतपालने काही गुरुद्वारांमध्ये आपल्या माणसांना निवारा दिला. एवढेच नाही, तर या प्रार्थनास्थळांमध्ये शस्त्रास्त्रेही लपविली. ज्याप्रमाणे काही मदरशांमध्ये कट्टरतावादी, जिहाद्यांना प्रशिक्षित करून दहशतवादाच्या दरीत ढकलले जाते, तोच ‘नापाक’ पॅटर्न या अमृतपालनेही अवलंबला. ‘खडकूस’ अर्थात मानवी बॉम्ब म्हणून तरुणांना लढण्यासाठी अमृतपालने त्यांची माथीही भडकाविली. तसेच, राज्यातील व्यसनमुक्ती केंद्रांमध्येही अमृतपालने शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन भविष्यात अमृतपालचे दुसरा भिंद्रनवाले म्हणून खलिस्तानच्या आंदोलनाला पुनरुज्जीवित करण्याचे काळे मनसुबेच अधोरेखित होतात. आश्चर्यजनक बाब म्हणजे, प्रार्थना, मन:शांतीसाठी असलेल्या असलेल्या गुरुद्वारांचे जिहादी मदरसे बनविण्याचाच हा कट होता, जेणेकरुन गुरुद्वारांच्या आड पोलिसी कारवाईला अडथळा निर्माण करता येईल. गुरुद्वारात शस्त्रास्त्रे असतील, आंदोलने केली तर पोलीसही कदाचित एक पाऊल मागे घेतील. पण, ते ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या वेळीही झाले नाही आणि आताही खलिस्तान्यांची ही आशा फोल ठरावी. तसेच व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार घेणारे, शारीरिक-मानसिकदृष्ट्या खचलेले तरुणही या अमृतपालच्या निशाण्यावर होते. यावरून खलिस्तान आंदोलन कसे ‘जिहादी पॅटर्न’च्या पाऊलखुणांवर आकार घेत होते, हे लक्षात यावे. म्हणूनच केंद्रातील सरकारने अमृतपालची ही विषवल्ली आणखीन फोफावण्यापूर्वीच ते मुळापासून ठेचून काढण्यासाठी कठोर पावले उचलली. पोलिसांनी पंजाबमध्ये खलिस्तानींचे नाकतोंड दाबले, पण आवाज कॅनडा-लंडनमध्येही झाला. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवरही खलिस्तानींच्या मुसक्या आवळण्याचीही तितकीच गरज आहे. 





 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची