समाजाची वैचारिक अणुऊर्जा

    21-Mar-2023   
Total Views |
Madhav Hari Joshi
 
अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून डोंबिवलीचे माधव हरी जोशी यांची ख्याती. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी क्षेत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...

‘नरोरा अ‍ॅटोमिक पॉवर प्रोजेक्ट’, ‘ककरापारा अ‍ॅटोमिक पॉवर प्रोजेक्ट’, ‘तारापूर अ‍ॅटोमिक पॉवर प्रोजेक्ट’ (५०० मेगावॅट) देशातील या तिन्ही मोठ्या आणि महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पांची रचना करण्याचे कार्य माधव हरी जोशी यांनी केले आहे. हे तिन्ही प्रकल्प उभे राहण्यासाठी त्यांनी आयुष्याची २० वर्षे खर्ची घातली. एक-एक प्रकल्प रचना निर्मितीसाठी जवळजवळ चार ते सात वर्षे सातत्याने त्यांनी काम केले. हे काम म्हणजे केवळ काम नव्हते, तर नवनिर्मितीच्या आनंदासाठी त्यांनी केलेले ते प्रयत्न होते. ते लक्ष्य होते, ध्येय होते. घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी, तेही १०० टक्के यशस्वी करण्यासाठी प्रत्येक क्षण त्यांनी मेहनत केली, अभ्यास केला. अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून माधव जोशी आज जगभरात प्रसिद्ध आहेत.

 देशभरात अणुऊर्जा प्रकल्पाच्या नियमनासाठी आणि नवप्रकल्पासाठी ‘अ‍ॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड’ ही अत्यंत महत्त्वाची शासकीय समिती आहे. २००७ पासून माधव या समितीवर विशेषतज्ज्ञ म्हणून नियुक्त आहेत. अणुऊर्जा प्रकल्प म्हणा किंवा पुढे रासायनिक क्षेत्रातील कार्य म्हणा, माधव यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष प्रयोग करून अभ्यास करून नवनवीन संकल्पना मांडणारे संशोधनपर अनुबंध रेखणारे माधव जोशी.‘आयुष्याच्या विद्यापीठात परिस्थितीशी संघर्ष करून मिळालेले शिक्षण हे जगण्याच्या प्रत्येक वाटेवर माणसाला विजय मिळवून देण्यास सिद्ध असते,’ हे विधान माधव यांनी सत्यात उतरवले. अत्यंत ‘नाही रे’ परिस्थितीमध्ये, गरिबी आणि गरिबीच्या अनुषंगाने येणारी प्रत्येक समस्या अनुभवत त्याचे वार सहन करत माधव घडले. मात्र, ते घडणे परिस्थितीवर विजय मिळवून आयुष्य घडवणारे होते, हे नक्कीच!
 
 
मूळ कुलाबा जिल्ह्यातील पाली येथील जोशी कुटुंब. कामानिमित्त पुण्याला स्थायिक झाले. हरी जोशी आणि मनोरमा जोशी यांना दोन अपत्ये. त्यापैकी एक माधव. हरी हे दवाखान्यात कंपाऊंडर होते, तसेच ते भिक्षुकीही करत. पण, उत्पन्न तुटपुंजे. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलांना नवीन कपडे अभावानेच मिळत. शालेय, महाविद्यालयीन जीवनात सहलीचे शुल्क भरू शकत नाही, म्हणून माधव सहलीला जाऊ शकले नाहीत. अपवाद पुण्यातील एका सहलीचा. दहा बाय दहाच्या घरात जोशी कुटुंबाचा संसार. घरची गरिबी असल्यामुळे एका आण्याचे मोलही महत्त्वाचे होते. एकदा माधव यांना दुकानदाराने दोन आणे जास्त दिले. १९५८ साल असावे. दोन आणे जास्त आले म्हणून माधव यांना आनंद झाला. धावतपळत घरी येऊन ते वडिलांना म्हणाले,“बाबा, मला दुकानदाराने दोन आणे जास्त दिले.” माधव यांना वाटले बाबा खूश होतील. घरात एक आणाही महत्त्वाचा असताना फुकटात दोन आणे मिळाले. पण, झाले उलटेच. हरी माधव यांना म्हणाले, “आताच्या आता दुकानात परत जा आणि पैसे परत कर. फुकटचे पैसे घेऊन आनंद वाटतो तुला?” हरी खूप रागिष्ट होते.
 
चुकीला माफी नसायचीच. त्यामुळे वडिलांचा शब्द मानून माधव यांनी पैसे परत केले. त्या दिवसापासून एक समीकरण मनात घट्ट बसले, कष्टाशिवाय आणि दुसर्‍याचे पैसे यावर कधीही हक्क सांगू नये. माधव यांचे नातेवाईक पालीला राहायचे. पुण्याहून पालीला जाताना वाटेत लोणावळालागायचे. लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरातले सुंदर बंगले पाहून माधव यांना प्रश्न पडे, अशीही घरे असू शकतात? आपले घर दहा बाय दहाचे. मात्र, या बंगल्यामध्ये दहा बाय दहापेक्षाही जास्त मोठे स्नानगृह असेल. आपण कधीतरी अशा बंगल्यात राहू शकू का? बालपणी हा पहिला प्रश्न त्यांच्या मनात आला आणि त्याच वेळी त्यांनी ठरवले की, ‘हो. आपणही आयुष्यात अशा बंगल्यात राहायचेच आणि तो मिळावा यासाठी खूप शिकून मोठे व्हायचे.’ पण, त्यावेळी तसे पाहायला गेले, तर माधव यांना शिक्षणाचे महत्त्व नव्हतेच. अगदी परीक्षेच्या दिवशी पेपर लिहायला जाण्याआधीही खेळत असत. शाळेत शिक्षक शिकवत तेवढाच अभ्यास करत. अशातच लहानपणी ते संघ शाखेत जाऊ लागले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक बौद्धिक, खेळ यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत गेले. या काळात ते वडिलांना मदत म्हणून दवाखान्यात जात.
 
हरी कंपाऊंडरचे काम करत त्यांना मदत करत. माधव यांचे मामा गोविंद बेहरे हे गावात नाटक आयोजित करत. त्यावेळी नाटकमंडळींना जेवण पुरवण्याचे काम ते माधव यांच्या आईला देत. त्यावेळी माधव आईला स्वयंपाक बनवण्यास मदत करत. नाटक संपल्यावर म्हणजे मध्यरात्री ते जेवण घेऊन नाटक कंपनीत जात. लहानपण असे कष्टातच गेले. पण, आपण मोठे व्हायचे आणि या कष्टाच्या बदल्यात चांगले आयुष्य जगायचे, असे त्यावेळेही त्यांच्या मनात येई. पुढे त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठात ते दुसरे आले. ‘कानपूर आयआयटी’ला पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हे सगळे करत असताना त्यांनी सामाजिक भान जपले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना सामाजिक जाणिवेतून भरघोस आर्थिक साहाय्य केले. हे सगळे करताना ’राष्ट्रहित प्रथम’ ही भावना जपली. असे अणुउर्जा प्रकल्पातील स्थापत्य विशेषतज्ज्ञ माधव जोशी. ते म्हणतात की, “प्रत्येक कार्य करताना त्यात जीव ओतून कार्य करायला हवे. राष्ट्र आणि सामाजिक बांधिलकी मानून ते कार्य करायला हवे.” माधव जोशी यांसारखे विद्वत्जन समाजाला प्रेरणा देत असतात. समाजाची वैचारिक अणुऊर्जाच असतात.




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.