मुंबई : जुन्या पेन्शन मागणीसाठी सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली होती. या संदर्भात राज्य सरकारने याविषयावर गंभीरपणे विचार करत असल्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने या सर्व प्रकरणावर समिती स्थापन करून सर्वोतोपरी अभ्यास करत आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
जुन्या आणि नव्या पेन्शनमध्ये मोठी आर्थिक तफावत रहाणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेणार असल्याचे सांगितले आहे. याद्वारे राज्य सरकारची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजीही घेणार आहे. गेल्या सात दिवसांच्या संपाचा रजा ह्या उपलब्ध रजांतून वजा करणार असल्याचे आश्वासन सरकारने घेतले आहे. ज्या ज्या कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्या मागे घेणार आहे, असे आश्वासन राज्य सरकारने दिली आहे. या प्रकरणी आंदोलकांनी व संपकऱ्यांनी राज्य सरकारच्या संवेदनशीलतेचे आभार मानले आहेत. उद्यापासून कामावर हजर रहावे, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतले आहे.
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आणि गारपीट नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे आणि मदतकार्य पोहोचेल, यासाठी तातडीने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. संघटनेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही तातडीने अतिदक्षता विभाग आणि गरजू रुग्णांच्या सेवेत हजर रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी मांडलेल्या भूमिकेचेही त्यांनी आभार मानले.