खलिस्तानवाद्यांचा देशीविदेशी उच्छाद आणि कारवाईचा बडगा

    20-Mar-2023   
Total Views |
Strict action should be taken against Khalistanists
 

खलिस्तानवाद्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कायदा-व्यवस्था राखण्याची जबादारी पार पाडण्यात भगवंत मान सरकारला अपयश येत असल्यास खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.

भारतात पंजाबमध्ये खलिस्तानी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याचे दिसत असतानाच भगवंत मान यांच्या सरकारने उशिरा का होईना, स्वत:ला खलिस्तानवादी म्हणविणार्‍या अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. खरे म्हणजे ही फुटीर प्रवृत्ती मान सरकारने कधीच चिरडून टाकायला हवी होती. पण, अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या २३ फेब्रुवारी रोजी अमृतसरमधील अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केला. त्या पोलीस स्टेशनमध्ये अमृतपाल सिंग याच्या दोन साथीदारांना अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपांवरून डांबण्यात आले होते. पण, अमृतपाल सिंग आणि साथीदारांनी त्या पोलीस स्टेशनवर हल्ला करून त्यांची सुटका केली. पंजाबमधील कायदा-व्यवस्था किती ढासळली आहे, हे त्या घटनेवरून दिसून आले. पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याच्या घटनेने पंजाब सरकारचे नाक कापले गेले.

एखाद्या धूमकेतूप्रमाणे दुबईहून २०२२ मध्ये पंजाबमध्ये प्रकटलेल्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आणि स्वयंघोषित खलिस्तानवादी अमृतपाल सिंग याच्या फुटीरतावादी कारवायांबाबत केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी पंजाब सरकारला सावध केले होते. अखेर काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली. ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या ७८ समर्थकांना अटक करण्यात आली. या कारवाईत अमृतपाल सिंग हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचे सांगण्यात येते. पोलीस या अमृतपाल सिंगच्या मागावर आहेत. भारतात खलिस्तानवादी असे डोके वर काढत असतानाच ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये हे खलिस्तानवादी भारतविरोधी प्रचार करण्यात गुंतले आहेत, अशीच एक घटना नुकतीच लंडनमध्ये घडली. लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीपाशी जमलेल्या खलिस्तान समर्थकांपैकी एकाने त्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतील भारताचा राष्ट्रध्वज खाली खेचण्याचे संतापजनक कृत्य केले.

उच्चायुक्त कार्यालयासमोर जमलेले खलिस्तानी हातात खलिस्तान लिहिलेले ध्वज घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्‍या व्यक्तीस प्रोत्साहन देताना दिसत होते. ‘आम्हाला न्याय हवा’, ‘आम्ही अमृतपाल सिंग याच्या पाठीशी आहोत’, अशा आशयाचे फलक खलिस्तानवादी झळकावत होते. खरे म्हणजे भारतीय उच्चायुक्त कार्यालयास ब्रिटिश सरकारने योग्य ते संरक्षण देणे अत्यावश्यक होते. स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना अशी काही घटना घडणार आहे, याची साधी कानोकान खबरही लागू नये, म्हणजे हद्दच झाली!लंडनमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या घटनेबद्दल नवी दिल्लीत असलेल्या ब्रिटिश उपउच्चायुक्त ख्रिस्तियाना स्कॉट यांना परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून घेतले आणि लंडनमध्ये घडलेल्या घटनेबद्दल त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. ब्रिटिश उच्चायुक्त राजधानी दिल्लीत नसल्याने उपउच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले होते. मात्र, ब्रिटिश उचायुक्तांनी ट्विट करून लंडनमध्ये जी घटना घडली, त्याबद्दल चिंता व्यक्त केली. झालेला प्रकार पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लंडनमधील घटनेला जबाबदार असणार्‍यांचा शोध घेण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटले भरण्यात यावेत, असे भारताकडून उपउच्चायुक्तांना सांगण्यात आले. १९६१च्या ‘व्हिएना’ करारानुसार, काही मूलभूत जबाबदार्‍या पाळणे आवश्यक असल्याची आठवणही यावेळी भारताने करून दिली.

लंडनमधील भारतीय दूतावासावर हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती. खलिस्तानवादी समर्थकांनी यापूर्वीही असे हल्ले केले होते. काश्मीरचे विशेषाधिकार रद्द केल्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्याबद्दल पाकिस्तानी निदर्शकांनी ‘इंडिया हाऊस’वर हल्ला करून नासधूस केली होती. दिल्लीमधील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी खलिस्तानवादी निदर्शकांनी लंडनमध्ये हिंसक निदर्शने केली होती. खलिस्तानी अतिरेकी गटांविरूद्ध कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे भारताने ब्रिटनला सांगूनही असे प्रकार घडत आहेत. अमृतपाल सिंग आणि त्याच्या मागे असलेल्या खलिस्तानवादी तत्वांना विदेशातून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत असल्याचे उघडच आहे. स्वतंत्र खलिस्तान व्हावा असे वाटणार्‍या तत्वांना पाकिस्तानसारखे देश मदत करीत असल्याचे उघड आहे. भारताने एका खलिस्तानी चळवळीचा अनुभव घेतला आहे. त्याची मोठी किंमत देशाला आणि पंजाबला भोगावी लागली आहे. हे लक्षात घेऊन वेळीच या खलिस्तानवाद्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कायदा-व्यवस्था राखण्याची जबादारी पार पाडण्यात भगवंत मान सरकारला अपयश येत असल्यास खलिस्तानवाद्यांचा बीमोड करण्यासाठी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.

काशिविश्वनाथ मंदिरास १००हून अधिक वेळा भेट देणारे योगी आदित्यनाथ पहिले मुख्यमंत्री


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच शनिवार, दि. १८ मार्च रोजी काशिविश्वनाथ मंदिरास भेट देऊन साग्रसंगीत पूजा केली. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या सहा वर्षांच्या कालखंडात काशिविश्वनाथ मंदिरास १०० वेळा भेट दिली आहे. २०१७ मध्ये सत्ता स्वीकारल्यानंतर बाबा विश्वनाथाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी सरासरी २१ दिवसांनंतर योगी आदित्यनाथ हे काशीला भेट देत असल्याचे दिसून येते. गेल्या १८ मार्च रोजी मुख्यमंत्री आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या वाराणसी दौर्‍यावर आले होते. ही त्यांची ११३वी वाराणसी भेट होती. राज्यातील जनतेच्या आणि देशाच्या कल्याणासाठी त्यांनी षोडोपचार पूजा करून बाबा विश्वनाथास साकडे घातले.


आपल्या प्रत्येक काशी भेटीत ते तेथे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री घेत असतात आणि प्रत्यक्ष पाहणी करतात. काशिविश्वनाथ मंदिराचे पुजारी नीरजकुमार पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेल्यावर्षी ९ सप्टेंबर या दिवशी योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीस शंभरावी भेट दिली, तर मंदिरास त्यांची ८८वी भेट होती. तेव्हापासून गेल्या १८ मार्चपर्यंत त्यांनी १२ वेळा विश्वनाथ मंदिरास भेट दिली, असेही पांडे यांनी सांगितले. सनातन धर्म आणि बाबा विश्वनाथ यांच्याप्रती असलेली योगी आदित्यनाथ यांची दृढनिष्ठा यावरून दिसून येते, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘काशीचे कोतवाल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कालभैरव मंदिरासही योगी आदित्यनाथ यांनी १०० वेळा भेट दिली आहे. राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळत असतानाच जनतेच्या कल्याणासाठी बाबा विश्वनाथाचे नित्यनेमाने आशीर्वाद घेणारे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव सर्व हिंदूधर्माभिमानी घेतल्यावाचून राहणार नाहीत!

हिंदू महिलांवर ‘हिजाब’ची सक्ती!

कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींनी ‘हिजाब’चा आग्रह धरल्यावरून त्याविरूद्ध राज्यात विविध ठिकाणी जे आंदोलन झाले, ते ताजे असतानाच आता त्या राज्यातील तुमकूर येथील सणासमारंभाचे आयोजन करणार्‍या एका कंपनीने त्यांच्याकडे काम करणार्‍या हिंदू मुलींवर ‘हिजाब’ परिधान करण्याची सक्ती केल्याचे उदाहरण घडले आहे. अशा कंपनीकडून दुर्बल घटकातील मुलींची निवड करण्यात येत असल्याने मालकांचे ऐकण्याशिवाय अशा महिलांपुढे अन्य कोणताच पर्याय उरत नाही. हिंदू महिला कर्मचार्‍यांना ‘हिजाब’ परिधान करण्यात सांगण्यात येत असल्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटली आहे. केवळ ‘हिजाब’चाच आग्रह धरला जातो, असे नाहीतर या महिलांना कुंकू न लावण्यासही सांगण्यात येते. सणसमारंभांचे आयोजन करणार्‍या या कंपनीकडे मुस्लीम ग्राहकही असतात. त्यामुळे अशा ग्राहकांना खूश करण्यासाठी आपल्याच कंपनीच्या हिंदू महिला कर्मचार्‍यांवर अन्याय केला जात असल्याचे दिसून येत आहे. या घटनेसंदर्भात समाजमाध्यमांवर चर्चा झाल्यानंतर बजरंग दलाने या प्रकारासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला.


बजरंग दलाने स्थानिक प्रतिनिधी, त्या महिलांचे पालक आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. हिंदू महिलांनी ‘हिजाब’ परिधान करण्यास मान्यता दिली आणि कुंकू लावले नाही, तर त्यांना प्रतिदिन ८०० ते एक हजार रुपये रोजगार देण्याचे आश्वासन अशा कंपन्यांकडून या महिलांना देण्यात येते. अशा महिलांना प्रामुख्याने मुस्लीम समाजाच्या समारंभात काम करण्यासाठी पाठविण्यात येते. पण, ज्या महिला असे करण्याची तयारी दर्शवित नाहीत, त्यांची ३०० ते ४०० रुपयांवर बोळवण केली जाते, असे बजरंग दलाचे समन्वयक मंजू भार्गव यांनी म्हटले आहे. संबंधित ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीने अशा महिलांचे फोटो ऑनलाईन टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. एका चॅनेलने या सर्व प्रकारावर प्रकाशझोत टाकल्यानंतर हिंदू समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पैशासाठी कष्ट करणार्‍या हिंदू महिलांना कशी प्रलोभने दाखवून धर्माविरूद्ध आचरण करण्यास लावले जाते, याचे तुमकूरचे उदाहरण हिंदू समाजास सतर्क करणारे आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.