सेवाव्रताचा आनंददायी कल्पवृक्ष : बाळकृष्ण भागवत

    18-Mar-2023   
Total Views |
 
Balkrishna Bhagwat
 
 
दातृत्व आणि कर्तृत्वाची अद्भुत क्षमता असलेले बाळकृष्ण वासुदेव भागवत. बाळकृष्ण यांचा जीवनपट म्हणजे माणसाची श्रीमंती काय असू शकते, याचे जीवंत उदाहरणच. दि. 19 मार्च, 1933 साली जन्मलेल्या बाळकृष्ण भागवत यांचा आज 90वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने जगावे आणि ‘सेवारूपे जगावे’ असे जीवनसूत्र असलेल्या बाळकृष्ण यांच्या विचार कर्तृत्वाचा इथे मांडलेला आलेख...
 
वडिलोपार्जित संपत्ती लौकिकाचा वारसा चालवणारे अनेकजण भेटत असतात. पण, वडिलोपर्जित मैत्रीचा वारसा चालवून माणुसकीच्या नात्यांची श्रीमंती राखणार्‍या बाळकृष्ण भागवत यांचे कर्तृत्वच स्वयंसिद्ध! त्यांचे आयुष्य म्हणजे दातृत्वाचा एक आलेखच आहे. दानशुरता म्हटली की, पैसे, जमीन वस्तू वगैरे दान करणारे लोक संस्था दृष्टिपथात येतात. पण, बाळकृष्ण यांची दानशुरता ही अष्टावधानी आणि बहुआयामी म्हणायला हवी. त्यामुळेच त्यांना नुसते ‘बाळकृष्ण’ न म्हणता ‘बाळकृष्ण काका’ म्हणू. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणत विश्वकल्याणाची इच्छा करणारी आहे.
 
ती कशी तर बाळकृष्ण काका शिक्षक. ज्ञानोपसना करणे आणि अध्यापन करणे यावर त्यांची आंतरिक निष्ठा. त्यामुळेच की काय, डहाणू, पालघर आणि इतरही वनवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिकावे, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत. या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा कशी उत्तीर्ण करावी, यासाठी ते या परिसरात जाऊन मुलांची परीक्षेची तयारी करून घेत. अनेक दशके अव्याहतपणे त्यांचे हे शैक्षणिक सेवाकार्य सुरूच होते, तर शहरी भागांत अनेक विद्यार्थी हुशार असतात. त्यांना शिकायचे असते, पण आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शिकता येत नाही आणि संधीही मिळत नाहीत. बाळकृष्ण या अशा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणारे दानशूर व्यक्ती शोधतात. या विद्यार्थ्यांशी त्यांना जोडून देतात. सत्पात्री दान करू शकलो, याचा आनंद दानशुरांना आणि खडतर नकारात्मक परिस्थितीमध्येही समाजाच्या मदतीने शिकू शकतो, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये येतो. या कार्यातून बाळकृष्ण काकांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
समाजात जे काही आहे ते वाईटच आहे, असा धोशा लावणारे लोक आपण पाहत असतो. तसेच, रूढी-रितीरिवाज यांना केवळ यांत्रिक पद्धतीने पाहणारे तर बहुसंख्यच असतात. पण, सगळ्याच सामाजिकतेकडे समाजोत्थानाच्या दृष्टीने पाहावे ते बाळकृष्ण काकांनीच! जगभरात सगळ्याच कुटुंबात वाढदिवस, विवाह, मंगलकार्य, वाडवडिलांचे स्मृतिदिन विशेष स्वरूपात पाळले जातात. या सगळ्यामध्ये कुटुंबाचा एक भावनिक बंध असतो. पापपुण्याच्या कल्पनाही या सगळ्यांशी बर्‍यापैकी जोडलेल्या असतात. गावजेवण घालूनपंगतींवर पंगती उठवल्या जातात. खूप अनावश्यक खर्च केला जातो. बाळकृष्ण काकांनी या सगळ्यासंदर्भात समाजाला एक आवाहनच केले की, ”आपल्या कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस, विवाह, वर्धापन दिन, वाडवडिलांचे स्मृतिदिन, मंगलकार्ये इत्यादी निमित्ताने देणगी द्यावी, ती खर्‍या गरजूपर्यंत पोहोचणारच.” त्यांच्या या आवाहनालासमाजाने भरभरून प्रतिसाद दिला. समाजातील अनेक लोक बाळकृष्ण काकांच्या शब्दाखातर दान करू लागले.
 
त्यांनी केलेले दान बाळकृष्ण काका नि:स्वार्थी आणि खरोरच भरीव समाजकार्य करणार्‍या संस्थांपर्यंत पोहोचवतात. ‘वंचित विकास’, ‘सह्याद्री आदिवासी बहुविधी सेवा संघ’, ‘दधीची देहदान मंडळ’, ‘वात्सल्य ट्रस्ट’, ‘नाना पालकर स्मृती समिती’ बोरिवली शाखा, ’नवनिर्माण चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘अस्मिता’, ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’, ‘चाईल्ड व्हिजन अ‍ॅण्ड एज्युकेशन’, ’वनवासी विकास प्रकल्प’तलासरी, ‘विवेकानंद केंद्र’ कन्याकुमारी, ‘सिद्धी सृष्टी एज्युकेअर फाऊंडेशन’ अशा अनेक संस्थांपर्यंत या दानशूर लोकांच्या सद्भावनांसहित दान बाळकृष्ण काकांनी पोहोचवले आहे. देणगी संस्थेकडे सुपूर्द केल्यानंतर संस्थेकडून देणगी मिळाल्याची पावती घेऊन ती त्या संबंधित दानशूरांना न चुकता देतात. आजकाल सगळ्याच मोठ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये देणगी संकलनासाठी कमिशन किंवा वेतनतत्वावरही एखाद्या माणसाची नेमणूक केलेली असते. देणगी मिळवण्यासाठी एखाद्या संस्थेत भेट दिली, तर त्या खर्चाचा व्हाऊचरही जोडला जातो. मात्र, बाळकृष्ण काका ही सेवा विनाशुल्क नि:स्वार्थीपणे अनेक दशके करत आहेत. त्यासाठी होणारा प्रवास पत्रव्यव्हार संपर्क सगळेच स्वखर्चाने. संस्था काकांना मोबदला देण्याचा प्रयत्न करतात, पण काका नकार देतात. कारण, त्यांच्या मते हे समाजकार्य आहे आणि समाजाचे म्हणजे आपलेच! त्यामुळे त्यासाठी शुल्क स्वीकारू नये. काकांचे म्हणणे आहे-
 
खाली पात्र किसीका
अपनी प्यास बुझाकर भर देने से
मेने अक्सर यह देखा है
मेरी गागर भर जाती हैं
 
असो. त्यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांवर उत्तम प्रभुत्व. या अर्जित गुणाचा उपयोगही त्यांनी समाजकार्यासाठी केला. 25 वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय कमी शुल्कात भाषा विषय शिकवले. या विषयांची कलात्मक साहित्याकरित्या गोडी लावली. मराठीतून हिंदी, हिंदीतून मराठी, इंग्रजीतून हिंदी आणि हिंदीतून इंग्रजी अशा प्रकारे हजारो पृष्ठांचा अनुवाद केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाच्या कॅसेटस ऐकून ती सगळी भाषणं शब्दांत उतरवली. पसायदान ओवीबद्ध हिंदी अनुवाद, आरती भारतमातेची समछंद मराठी हिंदी अनुवादही केला आहे. अनुवाद करतानाची पण भूमिका आहे ती स्वदेश, स्वसंस्कृती प्रेमाचीच! भाषांवर प्रभुत्व असलेले बाळकृष्ण काका उत्तम वक्ता आहेत. आम्ही धर्मनिष्ठ की विज्ञाननिष्ठ, वाचन आणि व्यक्तिमत्व विकास, वासुदेवबळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरूषांची चरित्रे, कालिदास दर्शन अशा विविध 35 विषयांवर ते व्याख्यान देतात. हेतू हाच की, समाज जागृत व्हावा. आपल्या कृतीतून ते समाजाला काही ना काही संदेश देत असतात. जसे टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवायच्या, तर त्या संकल्पनेतून काका संगणकीय वापरानंतर निरुपयोगी झालेल्या एकपाठी कोर्‍या कागदाच्या वह्या बनवतात आणि गरजू विद्यार्थ्यांना देतात. अनेक अल्पशिक्षित निरक्षर लोकांना बँकेचे अर्ज किंवा तत्सम सरकारी अर्ज भरता येत नाहीत, तर बाळकृष्ण काका त्यांना त्यासाठी मदत करतात.
 
प्रशासकीय स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित असतात, तर बाळकृष्ण काकांनी महापालिका, वीज वितरण, पोलीस, निवडणूक आयोग, एसटी आणि बस या सगळ्या यंत्रणांशीकधी पत्रव्यव्हार, तर कधी स्वसंपर्क करून ते प्रश्न मार्गी लावले आहेत. माणसांशी आत्मिय संपर्क-संवाद साधण्याची सहज सिद्धी प्राप्त असलेले काका अनेक वर्षे गोरेगाव भागवत संमेलन भरवतात. महाराष्ट्रभर आणि राज्याबाहेरही त्यांचे सखेसोयरे आहेत बरं!
 
हा माणसं जोडण्याचा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेत नोकरीला असलेले वासुदेव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी. अत्यंत समाजशील दाम्पत्य. घरी खर्‍या अर्थाने आर्थिक तंगी. इतकी की यामुळे वासुदेव अकरावीनंतर पुढचे शिक्षण घेऊ शकले नाहीत. वासुदेव आणि लक्ष्मी यांनी माणुसकीची श्रीमंती कधी सोडली नाही. छोट्याशा घरात गावातली पोरं शिक्षणासाठी, नोकरीसाठी यायची. तुटपुंज्या पगारात लक्ष्मीबाई कोंड्याचा मांडा करून संसार चालवायच्या. वासुदेव यांनी त्याकाळी शेकडो लोकांना मुंबईत नोकरीला लावले असेल. अनेकांचे पालकत्व स्वीकारून विवाह लावून दिले. नोकरीला लागलेल्यांचा पहिला पगार झाला की ते आठवणीने वासुदेवयांच्याकडे येत. वासुदेव त्यांना सांगत “पगार झाला ना? आता समाजासाठी तुला वाटेल ती देणगी दे.” त्यावेळी ‘ब्राह्मण सेवा संघ’ संस्थेच्याअंतर्गत ते समाजसंघटनेचे काम करत. देणगी दिली की ती लागलीच संघटनेकडे देत आणि पावती घेऊन ती संबंधित व्यक्तीस देत. यामध्ये त्यांना काय मिळत असे? पण, समाजाची संघटना असावी, त्या माध्यमातून सशक्त प्रगतीशील समाज उभा राहावा, हे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नापुढे कुटुंबात गरिबीमुळे उभे राहिलेला प्रश्न त्यांच्यासाठी नगण्यच असे. अशा समाजशील, संवेदनशील कुटुंबातले बाळकृष्ण काका! आपण पाहतो की पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना बालवाडीतील शिक्षकांचे नाव आठवत नाही. मात्र, काकांना 1940च्या दशकात ते बालस्वयंसेवक असताना त्यांचे संघशिक्षक कोण होते, हे आजही ते तितक्याच आनंदाने, अभिमानाने सांगतात. संघशिक्षक भावे, किर्लोस्कर, वसंत हजरनिस, बाळ गोडबोले यांनी बालपणी त्यांच्यावर काय संस्कार केले, हे ते आजही उत्साहाने सांगतात.
 
बाळकृष्ण काका हे रा. स्व. संघाचे स्वसंयसेवक. संघाच्या विविध पदांच्या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. 1950 साली ते रा. स्व. संघाच्या प्रथम वर्षाला गेले होते. तेव्हा रामभाऊ म्हाळगी,सुधीर फडके यांचा सहवास त्यांना लाभला. तळजाई येथील संघ शिबिरामध्ये नाना ढोबळे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. पुढे काकांनी वयाच्या 43व्या वर्षी शिक्षकाची नोकरी करता करताच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हिंदी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवले. हे सगळे करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येक क्षण स्वतःसोबतच समाजाच्या प्रगतीसाठी खर्ची घातला. त्यांच्या सेवाकार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. जसे, सेवारत्न पुरस्कार, अध्यापन सुवर्ण महोत्सव, ब्राह्मण सेवा संघ, संस्कार व्याख्यानमाला, नाना पालकर स्मृती समिती, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, भारतीय शिक्षण मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान पुरस्कार इत्यादी. वयाच्या 90व्या वर्षीही काकांच्या स्मृती अतिशय तल्लख असून त्यांच्या आवाजातला उत्साह तरुणांना लाजवणारा आणि त्यांची वैचारिक कृतिशीलता समाजाला थक्क करणारी आहे. बाळकृष्ण काकांसारखे लोक सेवाव्रती आनंदाचे झाड असतात. जे झाड समाजाला कायमच आपुलकीची आणि आशेची संधीची सावली देते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘सज्जन समाजशक्ती’तर्फे बाळकृष्ण काकांना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा!
 
देहदान चळवळीचे दीपस्तंभ
 
2001 साली गुरूदास तांबे यांच्यासोबत बाळकृष्ण भागवत दधीची देहदान मंडळाशी जोडले गेले. मृत्यूपश्चात देहदान हा एक अतिशय वेगळाच आणि तितकाच महत्त्वाचा विषय. प्रत्येक माणसाचे आपल्या शरीरावर प्रेम असते आणि शब्दातीत भावना जोडलेल्या असतात. मृत्यूनंतर काय, हा प्रश्न सगळ्यांना कधीना कधी पडतोच या सगळ्या अनुषंगाने मोक्षावर विश्वास असलेल्या आपल्या भारतीय समाजाला मृत्यूपश्चात देहदान करायला लावणेहे कठीण काम. पण, बाळकृष्ण भागवत यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वे क्षेत्र परिसर या कार्याच्या जागृतीसाठी निवडले. या विषयावर विविध माध्यमातून जनजागृती केली. सुमारे 575 लोकांनी मृत्यूपश्चात देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तशी कायदेशीर प्रक्रियाही केली. हे या चळवळीतले मोठे यश आहे. त्याचे श्रेय बाळकृष्ण काकांना निश्चितच जाते!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.