वयोमर्यादा उलटलेल्या तरुणांचे ‘एमपीएससी’ने अर्ज दाखल करावेत
12-Mar-2023
Total Views | 66
31
ठाणे : “कोरोना आपत्तीच्या काळात ‘एमपीएससी’ची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या तरुण-तरुणींना गट ‘ब’ आणि गट ‘क’ परीक्षेचे अर्ज करण्यासाठी लिंक खुली करावी,” अशी मागणी भाजपचे आ. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे नुकतीच केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘ब’ व गट ‘क’मधील पदांसाठी ८ हजार, १७५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी येत्या दि. ३० एप्रिल रोजी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी दि. २१ फेब्रुवारीपर्यंत अजर्र् स्वीकारण्यात आले होते. मात्र, या परीक्षेसाठी तांत्रिक कारणांमुळे वयोमर्यादा उलटलेल्या शेकडो तरुण-तरुणींना आपले अर्ज सादर करता आलेले नाहीत, याकडे आ. निरंजन डावखरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच, कोरोना आपत्तीच्या काळात परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची भूमिका अगदी सकारात्मक आहे. राज्याच्या शासन निर्णयानुसार, दि. १ मार्च, २०२० ते दि. १७ डिसेंबर, २०२१ दरम्यान वय अधिक ठरणार्या उमेदवारांना दि. ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत प्रकाशित होणार्या जाहिरातीत संधी देण्यात येणार आहे. परंतु, शासन निर्णयात झालेल्या तांत्रिक चुकीमुळे दि. १७ डिसेंबर, २०२१ नंतर वय ओलांडणारे विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. तरी या अपात्र उमेदवारांवर अन्याय न होता, त्यांना गट ‘ब’ व गट ‘क’ परीक्षेत संधी मिळावी, यासाठी संबंधित परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक दोन दिवसांसाठी खुली करावी, अशी मागणी भाजप आ. निरंजन डावखरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेत केली आहे.
शासनाच्या सर्व विभागांत माजी सैनिक नियुक्तीची मागणी
राज्य सरकारच्या विविध विभागांत सेवेसाठी इच्छुक असणार्या माजी सैनिकांना केवळ सुरक्षारक्षकाची नोकरी दिली जात असल्याच्या मुद्द्याकडेही आ. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे लक्ष वेधले. तसेच, राज्य सरकारच्या विविध विभागांत माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर माजी सैनिकांची नियुक्ती करण्याची मागणीदेखील त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.